राज्य स्पर्धेमुळे नाट्य चळवळीला गती

By admin | Published: November 17, 2016 11:59 PM2016-11-17T23:59:52+5:302016-11-18T00:34:07+5:30

प्रशांत जोशी : लोकाश्रय मिळाला तरच नाटक टिकणार

Speed ​​of dramatic movement due to state competition | राज्य स्पर्धेमुळे नाट्य चळवळीला गती

राज्य स्पर्धेमुळे नाट्य चळवळीला गती

Next


कलानगरी बिरुदावली मिळविणाऱ्या कोल्हापुरात नाट्य कलाही रुजली, बहरली. संगीतसूर्य केशवराव भोसले, बालगंधर्व यांच्या संगीत नाटकांपासून चालत आलेली परंपरा आजच्या समकालीन आणि बदललेल्या अभिरुचीपर्यंत येऊन थांबते. १९९० च्या दशकानंतर थंडावलेली कोल्हापूरची नाट्य चळवळ २०११ साली राज्य नाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीपासून पुन्हा जोमाने सुरू झाली. यंदा या स्पर्धेत २० हून अधिक संघांनी सहभाग घेतला आहे. या पार्श्वभूमीवर ही स्पर्धा पुन्हा एकदा कोल्हापुरात सुरूकरण्यासाठी योगदान दिलेले प्रतिज्ञा नाट्यरंगचे प्रशांत जोशी यांच्याशी
साधलेला हा थेट संवाद...
राज्य स्पर्धेमुळे नाट्य चळवळीला गती
प्रशांत जोशी : लोकाश्रय मिळाला तरच नाटक टिकणार
प्रश्न : कोल्हापुरातील राज्य नाट्य स्पर्धेची चळवळ थंडावण्याचे कारण काय?
- कोल्हापूरला फार मोठी नाट्य परंपरा लाभली आहे. १५-२0 वर्षांपूर्वी हौशी आणि व्यावसायिक रंगभूमीही जोमाने सुरू होती. त्यावेळी राज्य नाट्यमध्ये ३०-३५ संघ सहभागी व्हायचे. मात्र, स्पर्धेदरम्यान घडलेल्या काही अप्रिय घटनांमुळे राज्य नाट्य स्पर्धेची प्राथमिक फेरी कोल्हापुरात व्हायची बंद झाली. बघता-बघता दहा वर्षे कशी गेली, हे कळले नाही. त्यामुळे ही चळवळ थंडावली. तरीही या कालावधीत जुन्या संस्थांचे प्रयत्न त्यांच्या पातळीवर सुरू होते. तरुणाईही या क्षेत्रात काही करण्यासाठी धडपडत होतीच.
प्रश्न : राज्य नाट्य स्पर्धा पुन्हा सुरू व्हाव्यात यासाठी तुम्ही बरेच प्रयत्न केलेत, त्याविषयी काही सांगाल?
- मूळचे कोल्हापूरचे असलेले आशुतोष घोरपडे हे सांस्कृतिक खात्याचे सचिव होते. त्यांच्याशी माझी भेट झाली. त्यावेळी राज्य नाट्य स्पर्धेचाच कालावधी सुरू होता. तेव्हा मी त्यांच्यासमोर कोल्हापुरात पुन्हा राज्य नाट्य स्पर्धा सुरू करता येईल का, असा प्रस्ताव मांडला. त्यावर घोरपडे यांनी २०११ सालची राज्य नाट्य स्पर्धेची अंतिम फेरी कोल्हापुरात घेणार का? अशी विचारणा केली. अंतिम फेरी केवळ मुंबईत होत असते, त्यामुळे हा प्रस्ताव आल्यानंतर मी मिलिंद अष्टेकर यांच्याशी चर्चा करून त्यांना होकार कळविला आणि पहिल्यांदाच कोल्हापुरात स्पर्धेची अंतिम फेरी पार पडली. दहा वर्षे खंड पडल्यानंतर सुरू झालेल्या या स्पर्धेला प्रसारमाध्यमांनीही उचलून धरले आणि रसिकांनाही बऱ्याच वर्षांनी दर्जेदार नाटके पाहण्याची संधी मिळाल्याने ही स्पर्धा अलोट गर्दीत पार पडली. प्रेक्षकही पुन्हा एकदा नाटकांकडे वळले, पण त्यात कोल्हापूरचा एकही संघ नव्हता. पुढील वर्षी म्हणजे २०१२ साली आशुतोष घोरपडे यांनी राज्य नाट्यची प्राथमिक फेरी सुरू करायची असेल तर किमान दहा संघ दे, असे सांगितल्यानंतर मी कोल्हापुरातील सर्व नाट्य संस्थांशी आणि जुन्या-नव्या रंगकर्मींशी संपर्क साधला. त्यांच्याशी बैठक झाली आणि पहिल्या वर्षी १३ संघांनी स्पर्धेत सहभाग नोंदविला. त्याचवर्षी राज्य बालनाट्य स्पर्धाही कोल्हापुरात पार पडली. त्यात ३२ संघांनी सहभाग घेतला होता. अशाप्रकारे कोल्हापुरात पुन्हा एकदा राज्य नाट्य स्पर्धेला सुरुवात झाली.
प्रश्न : राज्य नाट्य स्पर्धेमुळे ग्रामीण भागातील तसेच हौशी रंगकर्मींना प्रोत्साहन मिळाले आहे का?
- नाज्य नाट्य स्पर्धा सुरू होण्यापूर्वीही ग्रामीण भागातील हौशी कलाकार त्यांच्या पातळीवर नाटकांचे सादरीकरण करतच होते. मात्र, राज्य शासनाची स्पर्धा असल्याने राज्य नाट्यबद्दल सर्वच कलाकारांना आकर्षण असते. त्यात सादरीकरण करणे, ही अभिमानास्पद बाब असते. या स्पर्धेला कोणतेही प्रवेश शुल्क नाही. चांगले नाट्यगृह, नेपथ्य, प्रकाश योजनेच्या सोयी मिळतात. निर्मितीचा खर्च मिळतो, त्यामुळे नाटकासाठी येणाऱ्या अर्थिक अडचणींवर मात करता येते. या रंगमंचावर काम केल्याने आत्मविश्वास येतो. प्रेक्षकांची दाद मिळते आणि पुढीलवर्षी अधिक चांगले सादरीकरण करण्यासाठी प्रोत्साहन मिळते. दरवर्षी किमान आठ ते नऊ संघ हे गडहिंग्लज, आजरा, चंदगड, राधानगरी, भुयेवाडी सारख्या ग्रामीण भागातील असतात. स्पर्धेच्या माध्यमातून दरवर्षी नवनवीन कलाकार घडतात.
प्रश्न : स्पर्धेतील नाटकांना प्रेक्षकांचा कसा प्रतिसाद मिळतो?
- कोल्हापुरात २०११ साली झालेल्या राज्य नाट्यच्या अंतिम फेरीपासून ते आजतागायत कोल्हापूरकर रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद नाटकांना लाभत आहे. अनेक नावाजलेली नाटके रसिकांनी जमिनीवर बसून पाहिली आहेत. नव्या-जुन्या संस्था, नव्या-जुन्या संहिता एकाच रंगमंचावर सादर होतात ही रसिकांसाठी पर्वणीच असते. प्रेक्षकांचा ओघ आणि प्रतिसाद लाभला, तर संघांनाही नाटकांचे सादरीकरण करण्यात आनंद मिळतो.
प्रश्न : राज्य नाट्यमधील नाटकांचे व्यावसायिक रंगमंचावर आगमन होण्यासाठी काय करायला हवे?
- मोजक्या दोन ते तीन संस्था वगळता अन्य संस्था किंवा हौशी कलाकार केवळ राज्य नाट्य स्पर्धेपुरतेच आपले नाटक मर्यादित ठेवतात. स्पर्धेत अव्वल आलेली आणि प्रेक्षकांचा प्रतिसाद लाभलेली नाटके काही वेळा व्यावसायिक रंगभूमीवर सादर होतात. नाट्य चळवळ केवळ राज्य नाट्यपुरती मर्यादित न राहता ती वर्षभर प्रवाही राहिली पाहिजे. यासाठी नाटकांचे सातत्याने सादरीकरण व्हायला हवे. प्रेक्षकांचा मिळणारा प्रतिसाद, नाटकातील कलाकारांसह निर्मिती खर्च, नाट्यगृहाचे भाडे, तिकीट विक्री असे अनेक प्रश्न पुढे उभे राहतात. पूर्वी कलेला राजाश्रय होता. आता लोकाश्रय मिळाला तरच कला टिकणार आहे. त्यामुळे मायबाप रसिक प्रेक्षकांनी कलाकारांच्या या धडपडीला बळ द्यायला हवे.
- इंदुमती गणेश

Web Title: Speed ​​of dramatic movement due to state competition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.