‘एसटी’ची गती थोडी वाढली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2021 04:25 AM2021-07-28T04:25:55+5:302021-07-28T04:25:55+5:30
कोल्हापूर : पावसाने घेतलेली विश्रांती आणि पुराचे पाणी ओसरू लागल्याने कोल्हापुरात एसटी बसेसच्या सेवेची गती थोडी वाढली आहे. पुणे, ...
कोल्हापूर : पावसाने घेतलेली विश्रांती आणि पुराचे पाणी ओसरू लागल्याने कोल्हापुरात एसटी बसेसच्या सेवेची गती थोडी वाढली आहे. पुणे, सांगली, मिरज, आदी मार्गांवर बसेस सुरू झाल्या आहेत. रेल्वेसेवा सुरू होण्यासाठी आणखी दोन दिवसांची प्रतीक्षा कोल्हापूरकरांना करावी लागणार आहे.
कोल्हापूर जिल्ह्यामध्ये महापूर आल्याने पुणे- बंगळुरू राष्ट्रीय महामार्गासह राज्य आणि विविध ठिकाणी अंतर्गत मार्ग हे वाहतुकीसाठी बंद झाले. त्यामुळे एसटी बसेसची सेवा ठप्प झाली. मात्र, गेल्या तीन दिवसांपासून जोरदार पावसाने विश्रांती घेतल्याने पुराचे पाणी ओसरू लागले. त्यामुळे राष्ट्रीय महामार्गासह काही राज्य, अंतर्गत मार्ग वाहतुकीसाठी खुले झाल्याने कोल्हापूर शहरातील मध्यवर्ती बसस्थानकातून पुणे, सांगली, मिरज, कागल, गडहिंग्लज, गारगोटी, राधानगरी, मलकापूर, तर इचलकरंजी येथून पुणे, मुंबई बससेवा सुरू झाली आहे. अद्याप पुराचे पाणी आणि चिखल असल्याने जिल्ह्यातील अनेक अंतर्गत रस्ते बंद आहेत. दोन दिवसांत ते खुले होतील. त्यानंतर एसटी सेवेची गती वाढणार असल्याचे विभागीय वाहतूक अधिकारी शिवराज जाधव यांनी मंगळवारी सांगितले. दरम्यान, हातकणंगले तालुक्यातील रुकडीजवळील रेल्वे पुलावर पुराचे पाणी आल्यामुळे गेल्या चार दिवसांपासून कोल्हापूर स्थानकातून धावणाऱ्या आठही रेल्वे सलग पाचव्या दिवशी रद्द करण्यात आल्या आहेत. रेल्वेसेवा पूर्ववत सुरू होण्यासाठी आणखी दोन दिवस लागणार असल्याची शक्यता पुणे विभागीय रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य शिवनाथ बियाणी यांनी व्यक्त केली.
चौकट
शंभर खासगी बसेस सुरू
राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक सुरू झाल्याने मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद, अहमदनगर, लातूर, नांदेड या मार्गांवर मंगळवारी एकूण शंभर खासगी आराम बसेस सोडण्यात आल्या. नागपूर सेवा दोन दिवसांत सुरू होण्याची शक्यता असल्याचे कोल्हापूर जिल्हा खासगी आराम बस असोसिएशनचे अध्यक्ष सतीशचंद्र कांबळे यांनी सांगितले.