जोतिबा यात्रेच्या तयारीला वेग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2017 06:21 PM2017-03-30T18:21:18+5:302017-03-30T18:21:18+5:30

रस्त्यांची कामं अंतिम टप्प्यात, शिखरांचे रंगकाम

The speed at which the Jotiba pilgrimage is ready | जोतिबा यात्रेच्या तयारीला वेग

जोतिबा यात्रेच्या तयारीला वेग

Next

आॅनलाईन लोकमत

कोल्हापूर : दख्खनचा राजा श्री क्षेत्र जोतिबा देवस्थानच्या यात्रेनिमित्त डोंगरावरील तयारीला वेग आला आहे. डोंगरी विकास कार्यक्रम व दत्तक ग्राम योजनेतून डोंगरावरील रस्त्यांची कामे करण्यात आली आहेत. याशिवाय मंदिराच्या शिखरांना रंगरंगोटी, दर्शनरांगांचे बॅरिकेटिंग, पार्किंगच्या ठिकाणांचे सपाटीकरण, चारपदरी रस्त्याचे रुंदीकरण, संरक्षक कठडे अशी विकासकामे सध्या सुरू आहेत.

श्री क्षेत्र जोतिबाची वर्षातील सर्वांत मोठी चैत्र यात्रा १० एप्रिल रोजी होत आहे. या दिवशी महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र आणि गुजरातसह देशभरातून लाखो भाविक डोंगरावर येतात. यात्रेला आता दहा दिवसांचा अवधी उरला आहे. त्यामुळे जोतिबा ग्रामपंचायत, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती, शहर वाहतूकशाखा यांच्या वतीने भाविकांच्या सोयीसुविधांसाठीची विकासकामे सुरू करण्यात आली आहेत.

मंदिराकडे जाणाऱ्या एकपदरी मुख्य रस्त्याचे चौपदरीकरण करण्यात आले आहे. डोंगरी विकास कार्यक्रमांतर्गत पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या निधीतून झालेल्या या रस्त्यामुळे वाहतुकीच्या कोंडीचा मोठा प्रश्न सुटला आहे. शिवाय भाविकांना सहजपणे मंदिराच्या बाह्य परिसरात फि रता येणार आहे.

मंदिरासमोर जाणाऱ्या व्हीआयपी पार्किंग येथे संरक्षक कठड्याचे काम सध्या सुरू आहे. आमदार सतेज पाटील यांनी हे गाव दत्तक घेतले असून, त्यांच्या निधीतून गावातील अंतर्गत गटारी व रस्त्यांची कामे वेगाने सुरू आहेत. सेंट्रल प्लाझा पूर्व-पश्चिम बाजू, मंदिराच्या दर्शनरांगेचा रस्ता, अंतर्गत रस्ते अशी जवळपास २५ लाखांची कामे पूर्ण झाली आहेत.

शिखरांची रंगरंगोटी, सीसीटीव्ही कॅमेरे, स्क्रीन

देवस्थान समितीकडून जोतिबा मंदिराच्या शिखरांचे रंगकाम सध्या सुरू आहे. मंदिरात सध्या १६ सीसीटीव्ही कॅमेरे असून, ते बदलण्यात येणार आहेत. याशिवाय देवस्थान समिती, कंट्रोल रूम या ठिकाणी तीन मोठे स्क्रीन लावण्यात येणार आहेत. वॉकी टॉकी, डोंगरासह पार्किंगच्या जागांवर एक्सा लाईटची सोय असेल.

प्लास्टिकबंदी, खोबऱ्याच्या तुकड्यांची सक्ती

यात्राकाळात डोंगरावर प्लास्टिकवर बंदी घालण्यात येणार आहे. त्यामुळे कोणत्याही व्यावसायिकाने प्लास्टिकच्या पिशव्यांचा वापर करू नये, असे आवाहन करण्यात येणार आहे. जोतिबा मंदिराच्या शिखरावर गुलाल-खोबरे उधळण्याची पद्धत आहे. मात्र गुलालासोबत अखंड खोबऱ्याची वाटी फेकली की ती खाली पडताना भाविकांना जोराचा मार बसतो; त्यामुळे दुकानदारांनी खोबऱ्याचे तुकडे करूनच ते गुलालासोबत द्यावेत, अशी सक्ती करण्यात येणार आहे.

पार्किंगच्या जागांचे सपाटीकरण

दरवर्षीप्रमाणे यंदाही यात्रेदिवशी दुचाकी वाहनांना डोंगरावर प्रवेश देण्यात येणार नाही. केर्लीमार्गे दानेवाडी फाटा, गिरोली, चव्हाण तळे, पठार, नवीन एस.टी. स्टॅँडमागील रस्ता, तळ्याच्या वरच्या बाजूस, तसेच यावेळी प्रथमच यमाई मंदिराच्या पायथ्याशी या सर्व ठिकाणी पार्किंगची व्यवस्था करण्यात आली. डोंगरावर जवळपास २५ हजार चारचाकी वाहने व १५ हजार दुचाकी वाहने बसतील अशी सोय करण्यात येत आहे. त्यासाठी देवस्थान समितीकडून शहर वाहतूक शाखेला एक जेसीबी देण्यात आला असून त्याद्वारे पार्किंगच्या जागांचे सपाटीकरण करण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे.

पिण्याचे पाणी आणि स्वच्छतागृहांची सोय

यात्राकाळात १.२० दशलक्ष लिटर इतके पाणी लागते. सध्या गायमुख येथे यात्रेसाठी पुरेल इतका पाणीसाठा आहे. त्यामुळे पाण्याची काळजी नाही. मंदिराच्या आवारात पिण्याच्या पाण्याची मोठी टाकी आहे. भाविकांची संख्या लक्षात घेऊन यात्राकाळात देवस्थान, महापालिका, आणि ग्रामपंचायत यांची मिळून जवळपास १६० मोबाईल स्वच्छतागृहे पार्किंगच्या जागांसह डोंगरावर विविध ठिकाणी ठेवण्यात येणार आहेत. या सर्व ठिकाणी टँकरने पाणीपुरवठा करण्यात येणार आहे.

अस्वच्छ, अस्ताव्यस्त आणि अतिक्रमण

एकीकडे ही विकासकामे सुरू असताना दुसरीकडे मंदिरासह बाह्य परिसरातही कमालीची अस्वच्छता जाणवली. मंदिराच्या पायऱ्या उतरताना बाजूला तुंबलेल्या गटारी, प्रवेशद्वारातच विखुरलेला कचरा, अस्वच्छता आहे. पायऱ्यांच्या वरच्या बाजूला असलेल्या दुकानदारांनी जवळपास दोन ती फूट पुढे अतिक्रमण केले आहे. रस्त्यांची कामेही अजून सुरू असल्याने ठिकठिकाणी उकराउकरी, खड्डे, खर, मातीचे ढीग असे चित्र आहे. यात्रेला अजून दहा दिवसांचा कालावधी असला तरी तत्पूर्वी या सगळ्या गोष्टींची पूर्तता करून स्वच्छ व सुंदर जोतिबा डोंगर ठेवण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे.

यात्रेनिमित्त सध्या डोंगरावर रस्त्यांची कामे अंतिम टप्प्यात आहेत. ग्रामपंचायतीच्या अखत्यारीत असलेली कामे आम्ही प्राथमिक टप्प्यात पूर्ण करीत आहोत. यात्राकाळात व्यावसायिक स्वत:हून अतिक्रमण हटवून घेतात. ग्रामपंचायत, जिल्हा पोलिस प्रशासन, देवस्थानची संयुक्त बैठक १ तारखेला आहे. त्या दिवशी बहुतांश निर्णय होऊन पुढील आठ दिवसांत त्यांची अंमलबजावणी होईल.
डॉ. रिया सांगळे (सरपंच, जोतिबा)



 

Web Title: The speed at which the Jotiba pilgrimage is ready

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.