‘स्पीडगन’ला ठरतोय, वाहनांच्या अप्रमाणित नंबर प्लेटचा अडथळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2021 04:21 AM2021-03-14T04:21:28+5:302021-03-14T04:21:28+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : धूम स्टाइलने वाहन चालवताय, तर सावधान...! पुढे ‘स्पीडगन व्हॅन’ आपला वेग टिपतेय... अशी धास्ती ...

Speedgun is a barrier to uncertified vehicle number plates | ‘स्पीडगन’ला ठरतोय, वाहनांच्या अप्रमाणित नंबर प्लेटचा अडथळा

‘स्पीडगन’ला ठरतोय, वाहनांच्या अप्रमाणित नंबर प्लेटचा अडथळा

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : धूम स्टाइलने वाहन चालवताय, तर सावधान...! पुढे ‘स्पीडगन व्हॅन’ आपला वेग टिपतेय... अशी धास्ती वाहनधारकांच्या मनात घर करीत आहे; पण तरीही नियामंची ‘ऐसीतैशी’ असा उद्दामपणा दाखवून वाहन वेगाने न्याल तर पुढे दुर्घटना ही अटळ आहे; पण वाहनाचा वेग रोखणाऱ्या या ‘स्पीडगन’लाही आता वाहनाच्या अप्रमाणित नंबर प्लेटचा अडथळा येऊ लागला आहे. त्याचाच फायदा घेत अशी स्टायलिस्ट, विनानंबर व अप्रमाणित नंबर प्लेट असणारी सुमारे वीस टक्के वाहने बेधडकपणे सुसाट वेगाने धावत या ‘स्पीडगन’च्या टप्प्यातून सहीसलामत सुटत आहेत.

कारवाईच्या धास्तीने वाहनाच्या वेगाला चाप बसवून अपघात कमी करण्याचा कौतुकास्पद प्रयत्न म्हणजे स्पीडगन व्हॅन’ हाच म्हणावा लागेल. अपघाताचे प्रमाण कमी व्हावे या उद्देशाने नोव्हेंबर २०१९ मध्ये राज्य शासनाने प्रत्येक जिल्ह्याला ‘स्पीडगन व्हॅन’ दिली. त्यामुळे प्रत्येक जिल्ह्यात अतिवेगवान वाहनाच्या स्पीडला मर्यादा आल्या. वेगमर्यादेचे उल्लंघन करणारी धावती वाहने एक किलोमीटर दूरवरूनच ‘स्पीडगन’ टिपते. अशा वाहनमालकाला तब्बल एक हजार रुपयांचा फाइन दुसऱ्या दिवशी ई-चालान मेसेजद्वारे नोटीसरूपाने त्यांच्या मोबाइलवर जातो.

कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या दीड वर्षात सुमारे पाच हजारांहून अधिक वाहनांना अशा दद्धतीने दंडाच्या नोटिसा पोहोचल्या; पण सध्या या ‘स्पीडगन’च्या रेंजमधून आता स्टायलिस्ट, विनानंबर व अप्रमाणित नंबर प्लेटची वाहने सहीसलामत सुटत असल्याची नवी डोकेदुखी समोर आली आहे. जर सुसाट धावणाऱ्या वाहनाला प्रादेशिक परिवहन विभागाने (आर.टी.ओ.) प्रमाणित केलेली नंबर प्लेट नसेल तर ‘स्पीडगन’ नाकाम ठरत असल्याचे समोर आले. त्यामुळे अशी सुसाट धावणारी वाहने स्वत:सोबत दुसऱ्या वाहनधारकांनाही अपघातग्रस्त होऊन धोकादायक ठरत आहेत.

वाहतूक पोलीस, आर.टी.ओ. समन्वय आवश्यक

विनानंबर, स्टायलिस्ट अथवा अप्रमाणित नंबरप्लेट असणाऱ्या वाहनांवरील कारवाईसाठी वाहतूक पोलीस व प्रादेशिक परिवहन विभाग (आर.टी.ओ) यांच्यात समन्वयाने विशेष मोहीम सुरू करण्याची आवश्यकता आहे. सर्व वाहनांना आर.टी.ओ. प्रमाणित नंबरप्लेट असेल तरच ‘स्पीडगन’चा उद्देश शंभर टक्के सफल होईल.

कारवाईसाठी एकमेकांकडे बोट

अप्रमाणित नंबर प्लेट असणाऱ्या वाहनांची शोध मोहीम वाहतूक नियंत्रण शाखा व आर.टी.ओ. कार्यालय या दोन्हीही विभागांच्या पुढाकाराने घेणे आवश्यक आहे; पण कारवाईसाठी दोन्हीही विभागाकडून एकमेकांकडे बोट दाखवून जबाबदारी झटकण्याची वृत्ती दिसून येते. त्यामुळे अशी वाहने शोध मोहीम प्रथम सुरू करणार कोण? हा प्रश्न पुढे येत आहे.

कोट...

दादा, मामा, भाई अशा लिहिलेल्या वाहनांच्या नंबरप्लेट बंद झाल्या आहेत. स्टायलिस्ट व अप्रमाणित नंबरप्लेटचा स्पीडगन व्हॅन’ला अडथळा येत आहे. त्यामुळे अशा अप्रमाणित नंबर प्लेटच्या वाहनांवर कारवाईची धडक मोहीम सुरू आहे. वाहनधारकांनी आर.टी.ओ. प्रमाणित नंबरप्लेट वाहनांना लावाव्यात. - स्नेहा गिरी, पोलीस निरीक्षक, कोल्हापूर शहर वाहतूक शाखा.

Web Title: Speedgun is a barrier to uncertified vehicle number plates

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.