देवगडवासीय ‘रंगतरंग’ने मंत्रमुग्ध

By admin | Published: January 2, 2015 10:14 PM2015-01-02T22:14:32+5:302015-01-02T22:14:56+5:30

किनाऱ्यावर ‘जल्लोष’ : ढोलकीचा ताल, घुंगराच्या आवाजाने किनारा दुमदुमला

Spellbound with 'Rangarang' of Devgad | देवगडवासीय ‘रंगतरंग’ने मंत्रमुग्ध

देवगडवासीय ‘रंगतरंग’ने मंत्रमुग्ध

Next

देवगड : ढोलकीचा हृदयात भरणारा ठेका, इतर तालवाद्यांचे मंजूळ स्वर व देवगडमधील लावण्यवतींच्या पायातील घुंगरांचा घुमणारा आवाज, लावण्यवतींचे सौंदर्य, शिट्ट्यांचा आवाज, त्याला समुद्राच्या पाण्याची असलेली साथ हे दृष्य पाहून हजारो देवगडवासीय मंत्रमुग्ध झाले. एकापेक्षा एक स्थानिक लावण्यवतींनी केलेल्या लावणीवरील नृत्याला रसिकांचा वाढता प्रतिसाद मिळत होता. देवगड किनाऱ्यावर सादर करण्यात आलेल्या ‘रंगतरंग’ कार्यक्रमाने संपूर्ण देवगडवासीय मंत्रमुग्ध झाले.
देवगड येथील ‘जल्लोष २०१५’च्या कार्यक्रमप्रसंगी सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी व नवीन वर्षाचे जल्लोषात स्वागत करण्यासाठी सलग पाच वर्षे हा कार्यक्रम येथील व्यापारीवर्गातर्फे आयोजित करण्यात येतो. उत्स्फूर्त प्रतिसादामुळे दरवर्षी हा कार्यक्रम यशस्वी होत आहे. स्थानिकांना कलेची जाण व्हावी, येथे अधिक पर्यटक यावेत या हेतूने हा कार्यक्रम आयोजित करण्यात येतो.
मुंबईमधील आॅर्केस्ट्राच्या सूत्रसंचालकांनी मालवणी भाषेत साद घालत रंगमंचावर आगमन केले. त्यांनी आपल्या निवेदनातून रसिकांना विनोदी शैलीत हसविले. आॅर्केस्ट्रामधील कलाकारांनी ‘मोरया मोरया’ गाण्याने रसिकांना मुजरा केला. त्यानंतर एकापाठोपाठ एक नृत्ये सादर करण्यात आली. त्यानंतर देवगडची लावण्यवती सुप्रिया ढोके व तिच्या सहकाऱ्यांनी एकापाठोपाठ एक अशा लावण्या सादर केल्या. देवगडचा गायक नीलेश मेस्त्रीने गायिलेल्या गाण्यांनी प्रेक्षकांची मने जिंकली. (वार्ताहर)


आतषबाजीने नववर्षाचे स्वागत
३१ डिसेंबरनिमित्त देवगड किनाऱ्यावर जल्लोष साजरा करण्यात आला. यावेळी ३१ डिसेंबरच्या रात्री फटाक्यांची आतषबाजी आणि डीजेच्या तालावर सरत्या वर्षाला देवगडवासीयांनी निरोप देऊन नवीन वर्षाचे स्वागत केले. या कार्यक्रमाला गालबोट लागू नये म्हणून पोलिसांनीही चोख व्यवस्था ठेवली होती.

Web Title: Spellbound with 'Rangarang' of Devgad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.