जागेअभावी २१ गावांमध्ये स्माशनभूमीच नाही
By admin | Published: April 19, 2017 12:55 AM2017-04-19T00:55:37+5:302017-04-19T00:57:26+5:30
जिल्ह्यातील चित्र : मंजूर निधीही रद्द करण्याची नामुष्की; दानशूरांच्या पुढाकाराची गरज
समीर देशपांडे --कोल्हापूर --गेल्या पाच वर्षांमध्ये कोल्हापूर जिल्हा परिषदेने स्मशानशेड बांधणीकडे विशेष लक्ष दिले आहे. त्यासाठी मोठा निधीही जाणीवपूर्वक उपलब्ध करून देण्यात आला. मात्र, २१ गावांमध्ये स्मशानासाठी जागाच उपलब्ध नसल्याने या ठिकाणी अनेक वेळा मंजूर झालेला निधीही रद्द करावा लागला आहे.
गेल्या पाच वर्षांत जिल्ह्यातील एक ही गाव स्मशानशेडशिवाय राहू नये, यासाठी जिल्हा परिषदेने नियोजन केले. प्रतिवर्षी निधीही दिला; परंतु १०३० ग्रामपंचायतींच्या गावांपैकी
२१ गावांमध्ये स्मशानभूमीच नाही. काही ठिकाणी जागा उपलब्ध आहे परंतु तेथे वाद आहे. मात्र, २१ गावांमध्ये जागाच नसल्याने एकीकडे तिथल्या ग्रामस्थांची कुचंबणा होतच आहे. दुसरीकडे जिल्हा परिषदेकडे निधी असतानाही जागा नसल्याने तो खर्च करत येत नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
ज्या २१ गावांमध्ये सार्वजनिक जागा उपलब्ध नाही. त्यातील काही गावांना गायरानच शिल्लक नाही. परिणामी स्मशानभूमीच नाही. बहुतांशी ग्रामस्थांची स्वत:ची शेती असल्याने आपापल्या शेतामध्ये अंत्यसंस्कार करण्याला प्राधान्य दिले जाते; परंतु ज्यांची शेती नाही त्यांची मात्र पंचाईत होते. अखेर भाऊबंदातील कुणाची तरी जमीन असेल तर तेथे अंत्यसंस्कार करण्यात येतात. स्मशानासाठी दोन-तीन गुंठ्यांची जागा आवश्यक असते. मात्र, आपल्या शेतातील जागा देण्यासाठी ग्रामस्थ तयार होत नाहीत. रोज उठून आपल्या शेतात अंत्यसंस्कार नकोत, अशी त्यामागची भूमिका असते. त्यामुळे या कामासाठी जागा देण्यासाठी शेतकरीही तयार होत नाहीत. त्यामुळे ही २१ गावे स्माशनभूमीशिवाय राहिली आहेत.
एकदा का जागा मिळाली की लगेच तिथे स्मशानशेड मंजूर करण्यात येते. तसेच संरक्षक भिंतीसाठीही निधी दिला जातो. सुधारित शवदाहिन्यांचाही पुरवठा होतो.
चार कोटी ७० लाखांची कामे
गेल्यावर्षी जिल्हा परिषदेने मोठी रक्कम स्मशानशेड बांधण्यावर खर्च करण्याचे नियोजन केले होते. १०० गावांत शेड बांधण्यासाठी साडेतीन कोटी रुपयांची कामे मंजूर करण्यात आली, तर मोठ्या आठ गावांमध्ये प्रत्येकी १५ लाख, असे एक कोटी २० लाख रुपये मंजूर केले होते.
स्मशानभूमी नसलेली गावे
तालुकागावाचे नाव
आजराचिमणे
चंदगडकरंजगाव
चंदगडबसर्गे
गडहिंग्लजबिदे्रवाडी
गडहिंग्लजदुगुनवाडी
गडहिंग्लजजांभूळवाडी
गडहिंग्लजशिप्पूर तर्फ आजरा
गडहिंग्लजतेगीनहाळ
करवीरआंबेवाडी
पन्हाळाबोंगेवाडी
पन्हाळावेखंडवाडी
पन्हाळाकोदवडे
पन्हाळापणोरे
पन्हाळावाळवेकरवाडी
पन्हाळाअमृतनगर
राधानगरीबरगेवाडी
राधानगरीफराळे
राधानगरीकेळोशी बु.
शाहूवाडीअमेणी
शिरोळसंभाजीपूर
शिरोळघालवाड