कोरोनाला विसरून तरुणाईकडून रंगांची उधळण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2021 04:20 AM2021-04-03T04:20:07+5:302021-04-03T04:20:07+5:30
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने जिल्हा प्रशासनाने रंगपंचमी साजरी करणे टाळा, असे आवाहन केले होते. त्याला प्रतिसाद देत काही नागरिकांनी ...
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने जिल्हा प्रशासनाने रंगपंचमी साजरी करणे टाळा, असे आवाहन केले होते. त्याला प्रतिसाद देत काही नागरिकांनी रंगपंचमी साजरी करणे टाळले; मात्र काहींनी कोरोनाची दुसरी लाट असताना त्याकडे दुर्लक्ष करून रंगांची उधळण केली. त्यामध्ये लहान मुले, तरुणाईचे प्रमाण अधिक होते. लहान मुलांनी सकाळी रंगपंचमी साजरी केली. दुपारी तरुणाई घरातून बाहेर पडली. नागाळा पार्क, ताराबाई पार्क, स्टेशन रोड, शाहुपुरी, राजारामपुरी, बिंदू चौक, गंगावेश, शिवाजीपेठ, मंगळवारपेठ, बुधवारपेठ, रविवारपेठ, लक्ष्मीपुरी, आदी परिसरांसह उपनगरांमधील गल्ली, कॉलनी, सोसायटी, अपार्टमेंटमध्ये रंगोत्सव झाला. पिवडी, विविध रंगांनी रस्ते रंगले होते. काहींनी रस्त्यांमध्ये पाण्याचा शॉवर लावला होता. मोजक्या ठिकाणी ध्वनियंत्रणावरील गाणी वाजत होती. काही युवक, युवती गटाने दुचाकीवरून फिरत रंगांची उधळण करत होते. वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनधारकांवर पोलिसांनी कारवाई केली. उन्हाचा तडाखा वाढल्यानंतर रंगपंचमी खेळणाऱ्यांचे प्रमाण कमी झाले. शहरातील विविध रस्त्यांवरील वर्दळही कमी झाली. सायंकाळी पाचनंतर बाजारपेठांमधील दुकाने काही प्रमाणात सुरू झाल्याने पुन्हा थोडी वर्दळ वाढली.
चौकट
घरातच रंगपंचमी
गेल्या वर्षी लॉकडाऊन असल्याने रंगपंचमी साजरी करता आली नव्हती. यंदा कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव वाढत असल्याने दक्षता म्हणून काही नागरिकांनी आपल्या कुटुंबीयांसमवेत घराच्या दारात, अंगणामध्ये रंगपंचमी साजरी केली.