तेलाचा तडका, सर्वसामान्यांना चटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2021 04:23 AM2021-03-25T04:23:51+5:302021-03-25T04:23:51+5:30
कोल्हापूर : गेल्यावर्षीपासून कोरोनाच्या संसर्गामुळे देशात आर्थिक समस्या निर्माण झाली आहे. मागील दहा महिन्यांपासून लोकांचे रोजगारही हिरावले आहेत, तर ...
कोल्हापूर : गेल्यावर्षीपासून कोरोनाच्या संसर्गामुळे देशात आर्थिक समस्या निर्माण झाली आहे. मागील दहा महिन्यांपासून लोकांचे रोजगारही हिरावले आहेत, तर अनेकांचे संसार उघड्यावर आले आहेत. वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य नागरिकांचे अक्षरश: कंबरडे मोडले आहे. दैनंदिन वापरात येणाऱ्या खाद्यतेलाचे भाव गगनाला भिडल्याने गरीब व मध्यमवर्गीयांचे आर्थिक बजेट कोलमडले आहे.
सध्या खाद्यतेल १४० ते १८४ रुपये किलो दराने मिळत आहे. त्यामुळे काही महिन्यांपूर्वी १३५०-१४५० रुपयांपर्यंत मिळणारा १५ लिटरचा तेलाचा डबा तब्बल २१०० ते २४९० रुपयांवर पोहोचला आहे. त्यात इंधन दरवाढीचाही या दरवाढीवर परिणाम होत आहे. त्यावर नियंत्रण न ठेवता सरकारने वाढ रोखण्याऐवजी बघ्याची भूमिका घेतली. डाळी, कडधान्ये आदींचे दरही १० ते २० रुपयांपर्यंत वाढले आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांचे जगणे असह्य झाले आहे.
तेलाचे किलोचे दर असे...
तेलाचा प्रकार दिवाळीपूर्वीचे दर सध्याचे दर
सरकी १००-११० १४६-१४८
सोयाबीन १००-११० १४८-१५०
सूर्यफूल १३५-१४० १७५-१८४
शेंगदाणा तेल १५०-१५६ १८०-१८४
पामतेल १००-१०५ १४०-१४२
डाळी व कडधान्याचे प्रति किलो दर असे...
डाळी दिवाळीपूर्वीचे दर - सध्याचे दर रुपये
हरभराडाळ ७०-७५ ७५-९०
तूरडाळ १००-११० ११०-१२०
मूगडाळ ९५-१०० १२०
मसूरडाळ ७०-७५ ८०-८५
कडधान्ये
मसुरा ८०-१४० ८०-२६०
मटकी १२० १२० १३०
मूग १०० १२०
चवळी ८०-१०० ८०-१००
हरभरा ६५-७० ७०
काळा वाटाणा ७५-८० ८५-९०
ग्रीन वाटाणा - १६०-१८० १६०-१८०
कोट
डिझेल दरवाढीचा फटका थेट डाळी, कडधान्ये आदींच्या दरावर होतो. त्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून त्यांचे भाव सतत वाढत आहेत.
- अनिल महाजन, धान्य व्यापारी, लक्ष्मीपुरी
कोट
देशात नवीन तेलबियांचे उत्पादन कमी झाले आहे. भारत परदेशातून आयात होणाऱ्या सूर्यफूल, पामतेल, सरकी, सोयाबीन आदी तेलांवर निर्भर आहे. त्यात केंद्राच्या धोरणांमुळे दिवसेंदिवस दरावर परिणाम होत आहे.
- केतन तवटे, तेल व्यापारी, कुंभारगल्ली,