मुस्लीम समाजातून रक्तदानास उत्स्फूर्त प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2021 04:16 AM2021-07-09T04:16:06+5:302021-07-09T04:16:06+5:30
कोल्हापूर : बहुजन समाजाच्या प्रत्येक उपक्रमात, सणवार-उत्सवात तसेच आंदोलनात हिरिरीने सहभाग घेणाऱ्या कोल्हापुरातील मुस्लीम बांधवांनी गुरुवारी रक्तदानसारख्या लोकोपयोगी कामात ...
कोल्हापूर : बहुजन समाजाच्या प्रत्येक उपक्रमात, सणवार-उत्सवात तसेच आंदोलनात हिरिरीने सहभाग घेणाऱ्या कोल्हापुरातील मुस्लीम बांधवांनी गुरुवारी रक्तदानसारख्या लोकोपयोगी कामात तितकाच उत्स्फूर्तपणे भाग घेतला. ‘लोकमत रक्ताचं नातं’ या उपक्रमांतर्गत राज्यभर सुरू असलेल्या रक्तदान शिबिरात मुस्लीम समाजातील ५२ रक्तदात्यांनी रक्तदान करून या चांगल्या कामाशी जोडून घेतले.
राज्यातील रक्ताची टंचाई लक्षात घेऊन ‘लोकमत’ समूहाने आवाहन करताच समाजाच्या पुढाकाराने आयोजित केलेले कोल्हापुरातील या पहिल्याच रक्तदान शिबिराबाबत मोठी उत्सुकता होती. समस्त मुस्लीम समाजाच्यावतीने गुरुवारी येथील मुस्लीम बोर्डिंगच्या सभागृहात सकाळी दहा ते दुपारी दोन यावेळेत हे शिबिर पार पडले. अठरा वर्षांपासून साठ वर्षे वयोगटातील व्यक्तींनी रक्तदानात भाग घेतला. तीस ते पस्तीस व्यक्तींना रक्तदान करण्याची इच्छा असूनही वय, वजन, रक्तदाब, मधुमेह या कारणाने रक्तदान करता आले नाही. एक मुस्लीम युवती उत्स्फूर्तपणे आपल्या वडिलांसोबत रक्तदानास आली होती. परंतु तिचे वजन कमी असल्याने तिला नाराज होऊन परतावे लागले.
या शिबिराची सुरवात उद्योजक बी. आय. अत्तार यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली. या वेळी ‘लोकमत’चे वरिष्ठ सरव्यवस्थापक मकरंद देशमुख, संपादक वसंत भोसले, मुस्लीम बोर्डिंगचे चेअरमन गणी आजरेकर, प्रशासक कादर मलबारी, मौलाना मोबीन बागवान, रियाज सुभेदार, माजी नगरसेवक तौफिक मुल्लाणी, कोल्हापूर जिल्हा ॲटोमोबाईल असोसिएशनचे अध्यक्ष अय्याज बागवान, बोर्डिंगचे संचालक रफिक मुल्ला, अल्ताफ झांजी, रफिक शेख, बापू मुल्ला यांच्यासह जाफर मलबारी, माजी नगरसेवक जहॉंगिर पंडित, डॉ. अब्दुल कादर खान, गौस दस्तगीर तांबोळी उपस्थित होते.
शिबिर यशस्वी करण्यासाठी नेहरू हायस्कूल कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य सय्यद अस्लम काझी, ॲग्लो उर्दू हायस्कूलचे मुख्याध्यापक महंमद इसाक मोमीन यांनी विशेष प्रयत्न केले. सर्व रक्तदात्यांना ‘लोकमत’ तसेच शाहू ब्लड बँकेतर्फे प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. शाहू ब्लड बँकेतर्फे गणी आजरेकर व कादर मलबारी यांचा गौरव करण्यात आला.
(फोटो ओळी स्वतंत्रपणे देत आहे.)