कळंबा प्रदूषणमुक्तीला भक्तांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2021 04:28 AM2021-09-15T04:28:53+5:302021-09-15T04:28:53+5:30
ध्वनी, वायू प्रदूषणास फाटा देत टाळ्यांच्या गजरात प्रशासनाने घालून दिलेल्या कोरोना नियमांचे पालन करीत भक्तांनी कृत्रिम कुंडात गणेश विसर्जन ...
ध्वनी, वायू प्रदूषणास फाटा देत टाळ्यांच्या गजरात प्रशासनाने घालून दिलेल्या कोरोना नियमांचे पालन करीत भक्तांनी कृत्रिम कुंडात गणेश विसर्जन करण्यास यंदा प्राधान्य दिले. ‘अवघ्या जगावरचे कोरोनाचे विघ्न दूर करीत पुढच्या वर्षी लवकर या’ अशी प्रार्थना करीत लाडक्या बाप्पाला मंगळवारी साश्रुनयनांनी भावपूर्ण निरोप देण्यात आला.
कळंबा ग्रामपंचायत प्रशासनाने केलेल्या आवाहनानुसार भक्तांनी गणेशमूर्ती ग्रामपंचायत प्रशासनाकडे सुपुर्द केल्या. जवळपास चार हजार गणेशमूर्ती आणि एक टन निर्माल्य संकलित करण्यात आले.
कळंब्यालगतच्या सुर्वेनगर, साळोखेनगर, आपटेनगर, क्रांतिसिंह नाना पाटीलनगर, तपोवन, राजलक्ष्मीनगर, साने गुरुजी वसाहत, जीवबानाना पार्क, कळंबाजेल, रंकाळातलाव, कनेरकरनगर आदी प्रभागांत पालिकेच्या वतीने मुख्य चौकाचौकात कृत्रिम कुंड, काहिलीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्याने बहुतांश नागरिकांनी येथेच गणेशमूर्ती विसर्जित केल्या. सकाळपासून सुरू झालेला विसर्जन सोहळा रात्री उशिरापर्यंत सुरू होता.
चौकट
कळंबा ग्रामपंचायतीचे आदर्शवत नियोजन
कळंबा तलाव प्रदूषणमुक्त ठेवण्याचे आव्हान ग्रामपंचायत प्रशासनाने लीलया पेलले, त्यामुळे एकही मूर्ती तलावात विसर्जित झाली नाही. गावातील धक्क्याच्या धोकादायक विहिरीत संकलित गणेशमूर्ती सोडण्यात आल्या, तर संकलित निर्माल्यापासून खतनिर्मिती करण्यात येणार आहे.
सरपंच सागर भोगम, उपसरपंच शालिनी पाटील, ग्रामविकास अधिकारी डी. व्ही. तेलवी, सदस्यांसह कर्मचाऱ्यांनी यासाठी अथक परिश्रम घेतले, हे विशेष.
फोटो ओळ
एक- कळंबा गावातील गणेशमूर्ती दान उपक्रमास नागरिकांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला. मूर्ती संकलित करताना सरपंच सागर भोगम, ग्रामविकास अधिकारी डी. व्ही. तेलवी आणि ग्रामपंचायत सदस्य.
दोन - उपनगरात पालिकेच्या कुंडात गणेशमूर्ती विसर्जन उपक्रमास नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला आपटेनगर येथे गणेशमूर्ती विसर्जित करताना भाविक