'गृहदालन'ला उत्स्फूर्त प्रतिसाद
By admin | Published: October 9, 2016 12:38 AM2016-10-09T00:38:22+5:302016-10-09T00:56:48+5:30
तीन हजार फ्लॅटची माहिती : राष्ट्रीयीकृत बँकांचाही मोठ्या प्रमाणात सहभाग
कोल्हापूर : शहर परिसरात सुरूअसलेल्या नावीन्यपूर्ण गृहप्रकल्पांची माहिती एकाच छताखाली उपलब्ध व्हावी, बांधकामाविषयी तसेच अर्थसाहाय्यविषयी परिपूर्ण, अचूक माहिती मिळावी आणि ग्राहकांना त्यांच्या पसंतीनुसार घर अथवा फ्लॅट निवडण्याचे स्वातंत्र्य मिळावे या हेतूने क्रिडाई कोल्हापूर शाखेने येथील शाहूपुरी जिमखाना मैदानावर आयोजित केलेल्या ‘गृहदालन २०१६’ प्रदर्शनास शहरवासीयांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. शनिवारी सुटीचा दिवस असल्याने प्रदर्शनस्थळी मोठी गर्दी झाली होती. सकाळच्या सत्रात चार फ्लॅटची नोंदणी झाल्याने संयोजकांसह व्यावसायिकांचाही उत्साह वाढला आहे.
सध्याच्या वैविध्यपूर्ण सेवासुविधा मिळण्याच्या जमान्यात कोल्हापुरातील बांधकाम व्यावसायिकांनी ग्राहकांच्या आवडी-निवडी लक्षात घेऊन गृहप्रकल्प तयार केले आहेत, तर काही प्रकल्प आकार घेत आहेत. बांधकाम क्षेत्र आता मंदीची धूळ झटकून नव्या वळणाकडे झुकले आहे. त्यामुळे सध्याचा काळ गरज पूर्ण करण्यासाठी तसेच गुंतवणूक करण्यासाठी संधी घेऊन आला आहे.
संपूर्ण शहरात तयार झालेले, आकार घेत असलेले तसेच नियोजित असलेल्या गृहप्रकल्पांची माहिती ग्राहकांना प्रदर्शनात मिळते. सुमारे अडीच ते तीन हजार फ्लॅटस् तयार असून, त्यांच्या वैशिष्ट्यांसह संपूर्ण माहिती येथे दिली जाते. त्यामुळे दिवसातील काही तासांत एखादा मनातील फ्लॅट शोधण्याची संधी ग्राहकांना मिळाली आहे. परवडणाऱ्या घरांच्या प्रकल्पांची माहितीही येथे मिळते. विशेष म्हणजे फ्लॅट किंवा रो हाऊस घेण्याकरिता कर्ज क ोणाकडून घ्यावे, त्याचे व्याजदर काय आहेत, त्यासाठी कोणती कागदपत्रे लागतात हे पाहण्यासाठी कोठेही फिरावे लागत नाही. कारण येथे एकाच छताखाली नऊ बॅँका आणि तीन अर्थपुरवठा करणाऱ्या संस्था ग्राहकांच्या सेवेसाठी उपस्थित आहेत. त्यामुळे कर्ज मिळविण्यासाठी होणारी दमछाक या प्रदर्शनामुळे टाळता येते. यंदा प्रथमच राष्ट्रीयीकृत बॅँकांचा सहभाग मोठ्या स्वरुपाचा आहे.
काही बांधकाम व्यावसायिकांनी या प्रदर्शनाच्या अनुषंगाने खास सवलती जाहीर केल्या आहेत. काहींनी रजिस्ट्रेशन शुल्कात, तर काहींनी नो वॅट नो सर्व्हिस टॅक्स नावाने सवलत दिली आहे. ज्यांच्याकडे रेडी पझेशन फ्लॅट व बांधकाम परिपूर्ती प्रमाणपत्र आहेत त्यांना ही सवलत देण्यात येणार आहे. त्यामुळे ग्राहकांना ही पर्वणीच ठरणार आहे. (प्रतिनिधी)
सध्या दसरा-दिवाळीचा सण असल्याने खरेदीसाठीचे वातावरण चांगले आहे. प्रदर्शनामुळे गुंतवणूकदार तसेच गरजू ग्राहकांना फ्लॅटची नोंदणी करण्याची एक संधी आहे. ग्राहकांचा उत्साह आणि प्रतिसाद अतिशय सकारात्मक दिसून येतो. त्यामुळे फ्लॅटसाठी मोठ्या प्रमाणात नोंदणी होतील, अशी अपेक्षा आहे.
-महेश यादव, अध्यक्ष
क्रिडाई कोल्हापूर.
आज (रविवार) प्रदर्शनात
प्रसिद्ध आर्किटेक्ट सुनील पाटील यांचे ग्रीन बिल्डिंग’ विषयावर व्याख्यान.
प्रमुख पाहुणे - मनपा सहायक संचालक नगररचना धनंजय खोत व शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत.
कोल्हापुरातील शाहूपुरी जिमखाना मैदानावर ‘क्रिडाई’तर्फे आयोजित केलेल्या गृहदालन प्रदर्शनास ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. शनिवारी एका गृह प्रकल्पाच्या स्टॉलवर ग्राहकांनी अशी गर्दी केली.