रंकाळा परिक्रमेस उत्स्फूर्त प्रतिसाद, २०० हून अधिक नागरिकांचा सहभाग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2020 05:19 PM2020-12-31T17:19:39+5:302020-12-31T17:21:15+5:30
Health Kolhapur- कोल्हापूर येथील रंकाळा संवर्धन व संरक्षण समिती व अंबाबाई भक्त मंडळ (अन्नछत्र) यांनी संयुक्तपणे नववर्षाच्या स्वागताप्रीत्यर्थ आयोजित केलेल्या रंकाळा परिक्रमा उपक्रमास शहरवासीयांतून मोठा प्रतिसाद मिळाला. पर्यावरणवादी कार्यकर्ते तसेच पहाटे रंकाळ्यावर नित्यनियमाने फिरायला येणाऱ्या सुमारे २०० हून अधिक नागरिकांनी यात भाग घेतला. अनेकांना रंकाळ्याभोवती पाच फेऱ्या मारुन सुमारे सव्वातीन तासात २२.०६ किलोमीटरचे अंतर पूर्ण केले
कोल्हापूर : येथील रंकाळा संवर्धन व संरक्षण समिती व अंबाबाई भक्त मंडळ (अन्नछत्र) यांनी संयुक्तपणे नववर्षाच्या स्वागताप्रीत्यर्थ आयोजित केलेल्या रंकाळा परिक्रमा उपक्रमास शहरवासीयांतून मोठा प्रतिसाद मिळाला. पर्यावरणवादी कार्यकर्ते तसेच पहाटे रंकाळ्यावर नित्यनियमाने फिरायला येणाऱ्या सुमारे २०० हून अधिक नागरिकांनी यात भाग घेतला. अनेकांना रंकाळ्याभोवती पाच फेऱ्या मारुन सुमारे सव्वातीन तासात २२.०६ किलोमीटरचे अंतर पूर्ण केले.
ह्यचालूया आरोग्यासाठी, स्वच्छ सुंदर रंकाळ्यासाठीह्ण असा संदेश देण्याकरिता गेल्या पाच वर्षापासून हा उपक्रम राबविला जात आहे. धोंडीराम चोपडे यांनी या उपक्रमाची सुरुवात केली असून दिवसेंदिवस त्यास चांगला प्रतिसाद मिळू लागला आहे.
गुरुवारी पहाटे परिक्रमेची सुरुवात विवेक महाडिक व वीरशैव बँकेचे अध्यक्ष अनिल सोलापुरे यांच्याहस्ते करण्यात आली. यावेळी धोंडिराम चोपडे, अजित मोरे, नाना गवळी, परशुराम बांदिवडेकर, उदय गायकवाड, माहेश्वरी सरनोबत, बजरंग चव्हाण यांनी रंकाळ्याच्या पाच फेऱ्या पूर्ण केल्या. त्यानंतर सहभागी नागरिकांनी काही फेऱ्या पूर्ण करुन आपला सहभाग नोंदविला.
रंकाळा उद्यानात परिक्रमेची सांगता झाली. यावेळी आमदार चंद्रकांत जाधव, माजी आमदार चंद्रदीप नरके, अशोक देसाई यांच्याहस्ते सहभागी नागरिकांना प्रशस्तीपत्रके देण्यात आली. सहभागी झालेल्या सर्वांना अल्पोपाहारही देण्यात आला.
या उपक्रमात आनंदी ग्रुप, प्रदक्षिणा ग्रुप, कोल्हापूर मोटर्स ॲथलेटिक्स ग्रुप व राज्य व राष्ट्रीय पातळीवरील वॉकर्स सहभागी झाले होते. यावेळी अजय कोराणे, उमेश पवार, दिलीप देसाई, सुधर्म वाझे, सुभाष हराळे, संजय मांगलेकर, प्रा. एस. पी. चौगुले यांची उपस्थिती होती. प्रास्ताविक अंबाबाई भक्त मंडळाचे अध्यक्ष संजय साळोखे यांनी केले. राजेंद्र पाटील यांनी सूत्रसंचालन केले. विक्रम जाधव यांनी आभार मानले. गुरुवारच्या उपक्रमाचे आयोजन धोंडिराम चोपडे, राजेंद्र पाटील, संजय साळोखे, अमोल गायकवाड, नाना गवळी, विकास जाधव, अजित मोरे, परशराम नांदवडेकर यांनी केले.