संजीवनच्या सीईटी सराव परीक्षेला उत्स्फूर्त प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2021 04:17 AM2021-06-22T04:17:27+5:302021-06-22T04:17:27+5:30
सोमवार पेठ, पन्हाळा येथील संजीवन अभियांत्रिकी महाविद्यालयामार्फत सुरू करण्यात आलेल्या सीईटी सराव परीक्षेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून जवळ-जवळ चार ...
सोमवार पेठ, पन्हाळा येथील संजीवन अभियांत्रिकी महाविद्यालयामार्फत सुरू करण्यात आलेल्या सीईटी सराव परीक्षेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून जवळ-जवळ चार हजारपेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी या परीक्षेमध्ये आपला सहभाग नोंदवला आहे. संजीवन संस्थेच्या २७ व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून या सीईटी सराव परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते.
प्रथम वर्ष अभियांत्रिकी अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेणाऱ्या १२ वी सायन्सच्या विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र शासनाची एमएचटी सीईटी ही परीक्षा द्यावी लागते. या परीक्षेचा सराव व्हावा यासाठी या परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. महाराष्ट्र शासनाच्या होणाऱ्या सीईटी परीक्षेपर्यंत ही सराव परीक्षा दररोज सुरू राहणार आहे. यामध्ये दर १५ दिवसांनी २०० मार्कांची एक परीक्षा घेण्यात येणार आहे.
ज्या विद्यार्थ्यांना या सीईटी सराव परीक्षेमध्ये सहभाग घ्यायचा आहे, त्या विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाच्या प्रवेश प्रक्रिया विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन कॉलेजचे प्राचार्य डॉ. मोहन बी. वनरोट्टी यांनी केले आहे.