कोल्हापुरात लोकमत मॅरेथॉनला उत्स्फुर्त प्रतिसाद; अबाल वृद्धांसह हजारो धावपटू झाले सहभागी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2022 01:13 PM2022-03-13T13:13:52+5:302022-03-13T13:15:25+5:30
ऐतिहासिक शहर म्हणून देशभरात ख्याती असलेल्या कोल्हापुरात ‘लोकमत’ आयोजित ‘कोल्हापूर महामॅरेथॉन’स्पर्धेने चढत्या लोकप्रियतेचा रविवारी आणखी एक अध्याय लिहिला.
कोल्हापूर: ऐतिहासिक शहर म्हणून देशभरात ख्याती असलेल्या कोल्हापुरात ‘लोकमत’ आयोजित ‘कोल्हापूर महामॅरेथॉन’स्पर्धेने चढत्या लोकप्रियतेचा रविवारी आणखी एक अध्याय लिहिला. सकाळच्या रम्य वातावरणात पार पडलेल्या महामॅरेथॉन स्पर्धेत हजारो व्यावसायिक धावपट्टूंबरोबरच हौशे नवसे सुद्धा अमाप उत्साहात धावले. ज्यांना धावता आले नाही अशा क्रीडा रसिकांनी धावपट्टूंना प्रोत्साहन देण्यासाठी रस्त्यांच्या दुतर्फा अलोट गर्दी करुन स्पर्धेतील आपलाही अप्रत्यक्ष सहभाग दाखवून दिला. स्पर्धेमुळे कोल्हापूरकरांची रविवारची सकाळ रंगारंग तर बनलीच शिवाय पुढील वर्षाच्या स्पर्धेतील सहभागाची प्रेरणाही देऊन गेली.
‘लोकमत’ परिवाराच्या महामॅरेथॉन स्पर्धेने अगदी अल्पावधीतच कोल्हापूरकरांच्या हृदयात मानाचे स्थान निर्माण केल्याचे तसेच प्रचंड लोकप्रियता मिळविल्याचे रविवार मिळालेल्या प्रतिसादावरुन पुन्हा अधोरेखीत झाले. पाच वर्षाच्या मुलांपासून ते ऐंशी वर्षाच्या वयोवृध्दांपर्यंत, शाळकरी विद्यार्थ्यांपासून ते उद्योजक-व्यावसायिक, व्यापाऱ्यांपर्यंत, प्राध्यापक - शिक्षकांपासून वरिष्ठ शासकीय अधिकाऱ्यांपर्यंत, एनसीसी कॅडेटपासून पोलिस दलातील जवान, अग्नशमन दलातील जवानांपर्यंत, ह्रदय शस्त्रक्रिया झालेल्या रुग्णांपासून ते डॉक्टर्सपर्यंत अशा सर्वव्यापी, सर्व समावेशक सहभागाची नोंद झाली.
कोल्हापूर महामॅरेथॉन केवळ स्पर्धा नव्हे तर सळसळता उत्साह, सर्वांच्या बरोबरीने धावण्याची चिकाटी, जिंकण्याची जिद्द, लक्ष्य गाठण्यातील इर्षा तसेच करमणुकप्रधान कार्यक्रमांनी स्पर्धेला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले. आयकॉन स्टील प्रस्तुत तसेच वारणा दूध संघ प्रायोजित महामॅरेथॉन स्पर्धा कोल्हापूरकरांच्या दिर्घकाळ दिर्घकाळ स्मरणात राहिल. आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेच्या बरोबरीने ‘लोकमत’ परिवाराने कोल्हापूर महामॅरेथाॅनचे आयोजन केले. अत्यंत शिस्तबध्द तसेच नेटके नियोजन, संयोजन, धावपट्टूंच्या मदतीला धावणारे स्वयंसेवक, स्पर्धा मार्गावर दुतर्फा धावपट्टूंना प्रोत्साहन देणारे क्रीडा रसिक, पोलिस बॅंड, ढोल ताशांचा दणदणाट, लेझीप पथकांचे फेर, अल्फान्सो बॅंडची सलामी, हवेत सोडले जाणारे बबल्स, फुलांच्या पाकळ्यांची धावपट्टूंवर होणारी उधळण, आकर्षक आतषबाजी आणि अंगात जोश निर्माण करणारे स्पर्धेचे थीमसाँग महामॅरेथॉन स्पर्धेचे वैशिष्ठ राहिले.
महामॅरेथॉन स्पर्धेबाबत कोल्हापूरकरांमध्ये कमालीची उत्कंठा लागून राहिली होती. ही उत्कंठा रविवारी सकाळपर्यंत टिकून होती. रस्त्याच्या दुतर्फा झालेले अबालवृध्दांची गर्दी, ठिकठिकाणी रस्त्यावर, चौकात ढोलताशांचा गजर हे उत्कंठतेचेच प्रतिक होते. स्पर्धेचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे स्पर्धेतील सहकुटुंब सहभाग हे होते. अनेक कुटुंबे महामॅरेथॉनमध्ये सहभागी झाली होती. कुटुंबातील पती, पत्नी, मुलं यांच्यासह नात्यातील सदस्यही स्पर्धत उतरल्याचे दिसत होते.
सकाळी सहा वाजता पोलिस मैदानावरुन महामॅरेथॉनची सुरवात झाली. सुरवातीचा क्षणही अतिशय उत्कंठावर्धन राहिला. निवेदिकेच्या इशाऱ्याकडे तसेच सुरवातीच्या बिंदूजवळील कमानीवरील घड्याळाकडे धावपट्टूंच्या तसेच उपस्थित क्रीडा रसिकांच्या नजरा खिळून राहिल्या. काऊंटडाऊन जाहीर करत निवेदिकेने पाच...चार...तीन...दोन... एक... स्टार्ट असे सांगताच २१ किलोमिटर अंतराच्या स्पर्धेला सुरवात झाली. पाठोपाठ पंधरा मिनिटांच्या अंतराने १० किलोमिटर, पाच किलोमिटर आणि तीन किलोमिटर अंतराच्या स्पर्धेतील सहभागी धावपट्टूंना सोडण्यात आले. फ्लॅगऑफ होताच धावपट्टूंनी क्षणाचाही विलंब न लावता आपल्या ध्येयाकडे धाव घेतली.
कोल्हापूरच्या क्रीडा परंपरेत लोकप्रिय स्पर्धेचा प्रारंभ पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहूल पाटील, खासदार संजय मंडलिक, आमदार ऋतुराज पाटील, महामॅरेथॉनच्या प्रमुख संयोजिका रुचिरा दर्डा, आयकॉन स्टीलचे सुजय माळी, जय चंदवाणी, वारणा दूध संघाचे कार्यकारी संचालक मोहन येरुडकर, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष शौमिका महाडिक, माजी नगरसेविका जयश्री जाधव, माजी नगरसेवक सत्यजित कदम, लोकमतचे सहायक उपाध्यक्ष मकरंद देशमुख, संपादक वसंत भोसले आदी मान्यवरांच्या हस्ते झाला.
कोराेनानंतरचा पहिलाच मोठा इव्हेंट
दोन वर्षे कोरोना महामारीत गेल्यामुळे क्रीडापट्टू तसेच क्रीडा चाहत्यांमध्ये एक प्रकारची मरगळ आली होती. परंतु अलिकडे ही महामारी कमी झाल्याने तसेच सर्व प्रकारचे शासकिय निर्बंध उठल्यामुळे ‘लोकमत’च्या कोल्हापूर महामॅरेथॉन स्पर्धेने ही मरगळ झटकली. धावपट्टू आणि क्रीडा रसिकांतही कमालीचा उत्साह दिसून आला. दोन वर्षानंतर सर्वजण महामॅरेथॉनच्या निमित्ताने रस्त्यावर उतरले. सर्वांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद पहायला मिळाला.