कोल्हापूर जिल्ह्यात तुरळक पाऊस, शेतकऱ्यांना जोरदार पावसाची प्रतीक्षा
By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2024 06:54 PM2024-06-27T18:54:40+5:302024-06-27T18:56:41+5:30
शहरात ठिकठिकाणी काही चौकात पाणी साचल्याने वाहनधारकांची कसरत
कोल्हापूर : गेले दोन दिवस वातावरणात बदल झाला आहे. गुरुवारी सकाळी सहा वाजल्यापासून पावसाने जिल्ह्यात हजेरी लावली. शहर आणि जिल्ह्यात तुरळक पाऊस झाला. पावसाने शहरात ठिकठिकाणी काही चौकात पाणी साचले. पावसापासून बचावासाठी रेनकोट आणि छत्री घेऊन नागरिक घराबाहेर पडले. दिवसभर पाऊस आणि ऊन असे वातावरण राहिले. शेतकऱ्यांना सध्या जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे.
गुरुवारी रात्रीपर्यंत राजाराम बंधाऱ्यावर १३ फूट २ इंच पाणी पातळी झाली. तर सरासरी ८.३ मिलीमीटर पाऊस झाला. राधानगरी धरणात २.२९ टीएमसी पाणीसाठा आहे. गुरुवारी सकाळपासून पावसाळी वातावरणासह हलक्या सरी कोसळल्या. धरण क्षेत्रात चांगला पाऊस होत असून, शेतकऱ्यांना आता जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे. शहरात सकाळपासून सुरु झाल्याने पावसाने नागरिकांची तारांबळ उडविली. सकाळी नऊनंतर पावसाने काही ठिकाणी जोर धरल्याने रेनकोट आणि छत्री घेऊनच नागरिक बाहेर पडले. दुपारनंतर मात्र पावसाने थोडी उघडीप दिली. सायंकाळी चारनंतर पावसाच्या तुरळक सरी कोसळल्या. सायंकाळनंतर वातावरणात गारवा निर्माण झाला.
गुरुवारी सकाळी आठ वाजता संपलेल्या चोवीस तासांत सरासरी ८.३ मिलीमीटर पाऊस झाला. सर्वाधिक पाऊस शाहूवाडी तालुक्यात झाला असून, गगनबावडा, भुदरगडसह धरण क्षेत्रात चांगला पाऊस आहे. पाटगाव व कासारी धरण क्षेत्रात १०० मिलीमीटरपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली.
धरणातील पाणीसाठा असा (टीएमसीमध्ये)
राधानगरी २.२९
तुळशी १.३०
वारणा १०. ९०
दूधगंगा ३.७२
कासारी ०.७८
कडवी १.२३
कुंभी ०.८६
पाटगाव १.३७
चिकोत्रा ०.५०
चित्री ०.५१
जंगमहट्टी ०.४४
घटप्रभा १.०५
जांबरे ०.३९
आंबेआहोळ ०.८८
कोदे लघु प्रकल्प ०.०४