बावडा पॅव्हेलियन बनतेय स्पोर्टस् हब : सतेज पाटील यांच्या फंडातून ५0 लाखांचा निधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2019 12:53 AM2019-03-28T00:53:56+5:302019-03-28T01:04:36+5:30
स्थानिक नागरिक, राजकीय पदाधिकारी आणि महानगरपालिका यांची योग्य साथ मिळाल्यास एखाद्या मैदानाचे कसे कायापालट होते, हे चित्र कसबा बावडा पॅव्हेलियन मैदानाकडे
कोल्हापूर : स्थानिक नागरिक, राजकीय पदाधिकारी आणि महानगरपालिका यांची योग्य साथ मिळाल्यास एखाद्या मैदानाचे कसे कायापालट होते, हे चित्र कसबा बावडा पॅव्हेलियन मैदानाकडे पाहून कळते. पूर्वी नाममात्र असलेले मैदानाचे स्वरूप आता बदलून स्पोर्टस् हब म्हणून ओळखू लागले आहे.
महानगरपालिकेच्या हद्दीत असलेला, पण अजून ग्रामीण भागाशी असलेली नाळ न सोडलेला परिसर म्हणजे कसबा बावडा होय. येथील नागरिकांसाठी बावडा पॅव्हेलियन हे एकमेव खेळण्यासाठी व फिरण्यासाठी मैदान आहे. येथे नियमित सकाळी व सायंकाळी फिरण्यासाठी येणारे नागरिक आणि खेळाडूंनी पुढाकार घेऊन मैदानाचा कायापालट केला. त्याला साथ मिळाली ते आमदार सतेज पाटील यांची.
आमदार पाटील यांनी आपल्या फंडातून सुमारे ५0 लाख रुपयांचा निधी कसबा बावडा पॅव्हेलियनसाठी उपलब्ध करून दिला. नगरसेवकांनीही पाठपुरावा करून महानगरपालिकेच्या वतीने निधी दिल्याने या मैदानाचा कायापालट होत आहे. मैदान म्हणजे तळीरामाचा अड्डाच होता. तो हटविण्याची मोहीम नागरिकांनी घेतली आणि या गोष्टीला आळा घातला. तसेच मैदान सपाटीकरणासह विविध सुशोभीकरणासाठी ऋतुराज पाटील यांनी पुढाकार घेतला आहे.
मैदानात एका बाजूला पावसाचे पाणी साठून दलदल होत असल्याने खेळाडू घसरून पडून त्यांना इजा होत होती. ती कमी करण्यासाठी मैदानात अंतर्गत गटारी बांधण्यात आली आहे. क्रिकेटसाठी तीन चांगले पिचही करण्यात येत आहेत. यासह मंडईच्या पाठीमागील बाजूला असलेली प्रेक्षक गॅलरी करण्यात आली आहे.यासह पॅव्हेलियनसमोर मोठे व्यासपीठ तयार करण्यात आले आहे. बक्षीस समारंभ व सांस्कृतिक कार्यक्रमासाठी हे उपयुक्त ठरणार आहे. यासह मैदानात बास्केट बॉल आणि महाराष्ट्र हायस्कूलमागे लॉन टेनिसचे मैदान तयार करण्यात आले आहे. ज्येष्ठांना बसण्यासाठी आणि लहान मुलांना खेळण्यासाठी लहान बाग तयार करण्यात आली आहे. तसेच मैदानाच्या काही भागांसाठी वॉकिंग ट्रॅकही तयार करण्यात आले आहेत. यासह ओपन जिम तयार असल्याने ते ज्येष्ठांच्या सोईसाठी झाले आहे. तसेच दिव्यांग व्यक्तींसाठी हॉलचे काम या ठिकाणी होणार आहे.
मैदानाजवळ असलेल्या पॅव्हेलियनमध्ये वूडन बॅटमिंटन कोर्ट आहे. या ठिकाणी येणाऱ्या सर्व बॅच हाऊसफुल्ल असतात, हे एक वेगळे वैशिष्ट्ये म्हणता येईल. तसेच अद्ययावत व्यायामशाळाही आहे. माफक दरामध्ये या ठिकाणी व्यायामाचे साहित्य उपलब्ध होत असल्याने सकाळी व सायंकाळी दोन्ही सत्रांत व्यायाम करण्यासाठी मोठी गर्दी असते. पॅव्हेलियनच्या वरील मजल्यावर बॉक्सिंगचे प्रशिक्षण दिले जाते. तसेच मैदाने बंदिस्त करून मुख्य प्रवेशद्वाराजवळ गेट लावावे, जेणेकरून येणाºया दुचाकी व चारचाकी गाड्या मैदानात प्रवेश करणार नाहीत. अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.
नियमित झाडांना पाणी
मैदानात सभोवती येथे नियमित फिरण्यासाठी येणारे खेळाडू व नागरिकांनी मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण केले आहे. याला नियमित पाणी घालण्याचे काम हे नागरिक करतात; त्यामुळे ही झाडे मोठ्या प्रमाणात बहरली आहेत.
कसबा बावडा पॅव्हेलियन मैदान उत्कृष्ट झाले आहे.मध्यभागी क्रिकेटची खेळपट्टी चांगली आहे; मात्र या खेळपट्टीचा वापर आता सरावासाठी करू लागल्याने ती लवकर खराब होण्याची शक्यता आहे; त्यामुळे सरावासाठी बाजूच्या जागेचा वापर करावा.
- सरदार पाटील, कसबा बावडा
कसबा बावड्यातील तरुणांना खेळण्यासाठी पॅव्हेलियन हे एकमेव मैदान आहे. देखभाल-दुरुस्तीमुळे मैदान आता अधिक चांगले झाले आहे; मात्र मैदान आता सभोवती बंदिस्त करावे. मैदानाच्या पश्चिमेकडील बाजूस वृक्षारोपण करावे.
- दिलीप मोरे, कसबा बावडा