‘क्रीडाई’चा पुढाकार.. हद्दवाढीचा नव्याने एल्गार..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2021 04:28 AM2021-08-12T04:28:54+5:302021-08-12T04:28:54+5:30

कोल्हापूर : शहराची हद्दवाढ व्हावी म्हणून नव्याने चळवळ उभी करण्याचा निर्णय मंगळवारी क्रीडाई कार्यालयात झालेल्या बैठकीत घेण्यात आला. ही ...

‘Sports’ initiative .. new Elgar of boundary extension .. | ‘क्रीडाई’चा पुढाकार.. हद्दवाढीचा नव्याने एल्गार..

‘क्रीडाई’चा पुढाकार.. हद्दवाढीचा नव्याने एल्गार..

Next

कोल्हापूर : शहराची हद्दवाढ व्हावी म्हणून नव्याने चळवळ उभी करण्याचा निर्णय मंगळवारी क्रीडाई कार्यालयात झालेल्या बैठकीत घेण्यात आला. ही चळवळ टप्प्याटप्प्याने व्यापक करण्याचे, नगरविकास मंत्र्यांकडे पाठपुरावा करण्याचे तसेच ग्रामीण भागात जनजागृती करण्याचे यावेळी ठरले. बैठकीच्या अध्यक्षस्थानी क्रीडाई कोल्हापूरचे अध्यक्ष विद्यानंद बेडेकर होते.

येथील कॉमन मॅन व प्रजासत्ताक सामाजिक संस्था यांच्या पुढाकाराने क्रीडाईच्या कार्यालयात ही बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीत हद्दवाढीची गरज आणि कोल्हापूर क्षेत्र विकास प्राधिकरणाचे कामकाज यावर साधकबाधक चर्चा करण्यात आली.

सुरुवातीला कॉमनमॅनचे बाबा इंदुलकर, प्रजासत्ताकचे दिलीप देसाई, क्रीडाईचे अध्यक्ष बेडेकर, उपाध्यक्ष प्रकाश देवलापूरकर यांनी हद्दवाढीबाबत कोल्हापूरकरांची कशी उपेक्षा केली जात आहे याची माहिती दिली. प्राधिकरणाची स्थापना करून तत्कालिन सरकारने हद्दवाढीची मागणी करण्याचा आवाज बंद केला. परंतु हद्दवाढीला आता कोणताही पर्याय राहिलेला नाही, त्यामुळे ती झालीच पाहिजे आणि त्यासाठी क्रीडाईसारख्या संस्थेने पुढाकार घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.

बैठकीत प्राधिकरणाचाही पंचनामा करण्यात आला. प्राधिकरणाची स्थापना होऊन तीन वर्षे पूर्ण झाली, पण प्राधिकरणाच्या क्षेत्रातील ४२ गावात एका इंचाचाही रस्ता झाला नाही. याउलट परवानगी शिवाय चुकीच्या पद्धतीने बेसुमार बांधकामे होत असून त्याकडे कोणाचेही लक्ष राहिलेले नाही. गावातील नागरिकांना आरोग्याच्या सुविधा नाहीत, स्वच्छ पिण्याच्या पाण्याची सुविधा नाही. घरफाळादेखील महापालिकेपेक्षा जास्त आहे. रस्ते, गटारी, मैदानांचा विकास झालेला नाही यावरही बैठकीत चर्चा झाली.

क्रीडाईसह अन्य विविध संस्था, संघटनांनीदेखील हद्दवाढीच्या चळवळीत सहभागी व्हावे, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली. हद्दवाढीच्या चळवळीचा भाग म्हणून लवकरच नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना हद्दवाढीबाबत निवेदन द्यावे, महापालिकेला पाठपुरव्याबाबत विचारणा करावी, हद्दवाढीच्या प्रस्तावात असलेल्या २० गावातील नागरिकांमध्ये जनजागृती करावी, त्यांना हद्दवाढीचे महत्त्व पटवून द्यावे असे बैठकीत ठरविण्यात आले.

यावेळी क्रीडाईचे सचिव प्रदीप भारमल, खाजानिस गौतम परमार, संचालक सोमराज देशमुख, संदीप मिरजकर, श्रीधर कुलकर्णी, ऋतुराज माने, अमरसिंह निंबाळकर उपस्थित होते.

फोटो क्रमांक - १००८२०२१-कोल-क्रिडाई

ओळ - कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीसंदर्भात मंगळवारी क्रीडाई कार्यालयात बैठक पार पडली. यावेळी विद्यानंद बेडेकर, प्रकाश देवलापूरकर, बाबा इंदूलकर, दिलीप देसाई, उपस्थित होते. (छाया : नसीर अत्तार)

Web Title: ‘Sports’ initiative .. new Elgar of boundary extension ..

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.