क्रीडाशिक्षक भरती १२ वर्षापासून बंद, अन् म्हणे दर्जेदार खेळाडू घडवा!
By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2023 04:32 PM2023-01-23T16:32:44+5:302023-01-23T16:33:12+5:30
मग शाळांमध्ये चांगले दर्जेदार खेळाडू कसे घडणार, शिवाय खेळातील तंत्रशुद्ध विकसित कशी होणार
कोल्हापूर : शालेय अभ्यासक्रमात शारीरिक शिक्षणासारख्या विषयाला सरकारने दुय्यम स्थानावर नेवून ठेवले आहे. गेल्या बारा वर्षांपासून क्रीडा शिक्षकांची भरती नाही. संस्थाही कंत्राटी पद्धतीने अशा विषयांच्या शिक्षकांची तात्पुरती नेमणूक करतात. निकषात बसत नाही म्हणून शिवाजी विद्यापीठ कार्यक्षेत्रातील शारीरिक शिक्षण महाविद्यालये बंद झाली.
जर या अभ्यासक्रमासाठी प्रवेश हवा असेल तर पुणे, नागपूर, औरंगाबाद आदी शहरांची वाट कोल्हापुरातील इच्छुकांना धरावी लागत आहे. अशा परिस्थितीत शालेय विद्यार्थ्यांमधून दर्जेदार खेळाडू कसा घडणार आहे, असा सवाल जाणकारांकडून व्यक्त होत आहे.
राज्यभरात सर्वत्र मंगळवारी शारीरिक शिक्षण दिन साजरा होत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील विविध शाळांमधील शारीरिक शिक्षण विषयाची जाणकारांकडून माहिती घेतली. एकूण २००० हून अधिक शारीरिक शिक्षक उपलब्ध होते. जसे निवृत्त होतील तसे पुन्हा त्या रिक्त जागेवर क्रीडा शिक्षकांची भरती होणे अपेक्षित होते;
परंतु गेल्या बारा वर्षांपासून क्रीडा विषय वगळता अन्य विषयाच्या शिक्षकांची भरती होत आहे. व्यथा मांडण्यास संघटना गेल्या तर त्यांची बोळवण केली जात आहे. मग शाळांमध्ये चांगले दर्जेदार खेळाडू कसे घडणार, शिवाय खेळातील तंत्रशुद्ध विकसित कशी होणार, असा सवाल उठत आहे.
- शिवाजी विद्यापीठ कार्यक्षेत्रातील एकही शारीरिक महाविद्यालय सुरू नाही.
- राज्याच्या नवीन आकृतिबंधात क्रीडा विषयास स्थान नाही.
- पवित्र पोर्टलमध्येही शारीरिक शिक्षकांसाठी शैक्षणिक पात्रताच उपलब्ध नाही.
- बारा वर्षांपासून नवीन शारीरिक शिक्षकांची भरती नाही.
- शिवाजी विद्यापीठाकडे बीपीएड, एमपीएड सुरू करण्यासंबंधी पाठपुरावा.
जिल्हा शारीरिक शिक्षक संघटनेकडून यासंबंधी शिवाजी विद्यापीठ आणि राज्य शासनाकडे गेल्या पाच वर्षांपासून काॅलेज सुरू करावे किंवा विद्यापीठात सोय करावी म्हणून पाठपुरावा केला जात आहे. - आर.डी. पाटील, अध्यक्ष, कोल्हापूर जिल्हा क्रीडा व शारीरिक शिक्षक संघ
क्रीडा शिक्षकांची नवीन पिढीच जर तयार झाली नाही, तर दर्जेदार तंत्रशुद्ध खेळाडू कसे निर्माण होणार, याचा शासनाने गांभीर्याने विचार करावा. शालेय शिक्षणात या विषयाला पुन्हा प्राधान्य द्यावे. - प्रदीप साळोखे, क्रीडा शिक्षक