क्रीडा शिक्षक देणार मुक्त ‘खेळा’चे धडे : नव्या वर्षापासून प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2019 01:23 PM2019-11-27T13:23:07+5:302019-11-27T13:25:18+5:30

शहरात जागेची अडचण आहे. मातीत खेळू नकोस, इन्फेक्शन होईल, अशी भीती लहान वयात मुलांना घातली जाते. पालकांनाही वेळ नसल्याने ते आपल्या मुलांना लहान वयातच संगणक व मोबाईलवेडे बनवत आहेत.

 Sports teachers give free 'play' lessons: starting the new year | क्रीडा शिक्षक देणार मुक्त ‘खेळा’चे धडे : नव्या वर्षापासून प्रारंभ

क्रीडा शिक्षक देणार मुक्त ‘खेळा’चे धडे : नव्या वर्षापासून प्रारंभ

googlenewsNext
ठळक मुद्दे कोल्हापूर शहरातील क्रीडा शिक्षकांचा पुढाकार

प्रदीप शिंदे

कोल्हापूर : ‘दिवेलागणीची वेळ झाली, खेळ पुरे, आता घरात या...’, ही हाक काही वर्षांपूर्वी प्रत्येक घरांतून सर्रास ऐकू यायची. घरापुढील अंगणही नाहीसे झाले... आणि अंगणातील अनेक खेळ नुसते आठवणीतच उरले आहेत. टीव्ही, मोबाईलमुळे मैदानी खेळ कमी होत आहेत. त्यामुळे लहान वयातच मुलांना आरोग्य समस्या जाणवू लागल्या आहेत. हीच समस्या सोडविण्यासाठी क्रीडा शिक्षक एकत्र येऊन ‘मुक्त’ खेळाचे धडे देणार आहेत.
शहरात वेगवेगळ्या कारणांसाठी मुलांवर सुरक्षिततेची कुंपणे घातल्याने मुले खेळांपासून दूर जात आहेत. शहरात जागेची अडचण आहे. मातीत खेळू नकोस, इन्फेक्शन होईल, अशी भीती लहान वयात मुलांना घातली जाते. पालकांनाही वेळ नसल्याने ते आपल्या मुलांना लहान वयातच संगणक व मोबाईलवेडे बनवत आहेत.

बदलत्या तंत्रज्ञानामुळे मुलांचे खेळ कमी झाले आहेत. त्यामुळे गल्ली, कॉलनी, मैदानावरील किलबिलाट नाहीसा झाला आहे. लहान मुले आता नुसतीच टेक्नोसेव्ही झाली आहेत. शहरी भागातच नाही तर ग्रामीण भागातील मुलेदेखील मोबाईल गेममध्ये गुंतलेली दिसतात. त्यामुळे मुलांचे जमिनीपासूनचे नातेच तुुटायला लागले आहे. मैदानी खेळ कमी झाले आहेत. त्यामुळे मुलांमध्ये आरोग्य समस्या जाणवू लागल्या आहेत.
कोणत्याही खेळातून कौशल्य, एकाग्रता आणि नेतृत्वपणा या सर्व गोष्टी शिकण्यास मिळतात. तीच गोष्ट रूजविण्यासाठी क्रीडा शिक्षकांनी पुढाकार घेतला आहे.

असे आहेत क्रीडा शिक्षक

क्रीडा शिक्षक प्रदीप साळुंखे, रघुनाथ पाटील, अमित शिंत्रे, रवी पाटील, शैलेश देवणे, रंगराव पाटील, दिलीप साखळकर यांनी पुढाकार घेतला आहे. यासाठी क्रीडा अधिकारी अरुण पाटील मार्गदर्शन करणार आहेत.

  • मुक्त खेळ

नव्या वर्षापासून या उपक्रमास सुरुवात होणार आहे. ३ ते १० वर्षांपर्यंतच्या मुलांना मोफत प्रवेश दिला जाणार आहेत. यामध्ये तुम्ही काहीपण खेळा, पण मनसोक्त खेळा हीच अट असणार आहे. सागरगोटे, काचापाणी, भातुकली, गोट्या, विटी-दांडू, पकडापकडी, चोर-पोलीस यासारखे खेळ असणार आहेत. प्रत्येक रविवारी शहरातील विविध ठिकाणी सकाळी ७.३० ते ९ या वेळेत हे मुक्त खेळ खेळले जाणार आहेत.

 

विविध खेळांमधून आनंदासोबतच व्यायामपण होतो. मात्र, आता मुळातच खेळच खेळले जात नसल्याने मुलांच्या आरोग्याच्या समस्या वाढल्या आहेत. त्या कमी करण्यासाठी क्रीडा शिक्षक एकत्र आलो आहोत.
- प्रदीप साळोखे, क्रीडा शिक्षक

शाळा सुरू झाली की, सकाळी क्लासनंतर शाळा, मग पुन्हा सायंकाळी क्लास, सुट्टीचा क्लास, त्यामुळे मुले खेळणेच विसरले आहेत. त्यांना पुन्हा खेळांकडे वळविण्यासाठी हा उपक्रम आम्ही घेतला आहे.
- रघुनाथ पाटील, क्रीडा शिक्षक

Web Title:  Sports teachers give free 'play' lessons: starting the new year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.