स्पॉटलाईट--कोल्हापूरचा उमदा लेखक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2017 11:56 PM2017-03-01T23:56:02+5:302017-03-01T23:56:02+5:30

या नाटकाचे लेखक विद्यासागर अध्यापक हे कोल्हापूरचे. त्यांच्याबद्दल थोडेसे.

Spotlight - Kolhapur Coolman Writer | स्पॉटलाईट--कोल्हापूरचा उमदा लेखक

स्पॉटलाईट--कोल्हापूरचा उमदा लेखक

googlenewsNext

‘साखर खाल्लेला माणूस’ या व्यावसायिक नाटकाचा आज, गुरुवारी कोल्हापुरात प्रयोग आहे. याचे ७0 दिवसांत
५0 प्रयोग झाले. या नाटकाचे लेखक विद्यासागर अध्यापक हे कोल्हापूरचे. त्यांच्याबद्दल थोडेसे.

चित्र, नाट्य आणि कला विषयात सांस्कृतिक कोल्हापूर नेहमीच अग्रेसर राहिले आहे. या आठवड्यात नटश्रेष्ठ जयशंकर दानवे यांच्या स्मृतीनिमित्त अभिनेता प्रशांत दामले यांना कलायात्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यानिमित्ताने दामले यांची भूमिका असलेला साखर खाल्लेला माणूस या नाटकाचा प्रयोगही झाला. हे नाटक लिहिणारे लेखक विद्यासागर अध्यापक असतील. अनुवादक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या उमा कुलकर्णी यांच्यासारख्या लेखिका चित्रांच्या माध्यमातून व्यक्त झाल्या, त्याही कोल्हापुरातच. शिवाय ज्येष्ठ ध्वनिलेखक रामनाथ जठार यांचं नुकतेच निधन झालं. रामनाथांनी त्यांच्या प्रदीर्घ कारकिर्दीत २००हून अधिक चित्रपटांचे ध्वनिमुद्रण केले. कॅमेऱ्याप्रमाणेच ध्वनिमुद्रण यंत्रात आणि तंत्रात अनेक स्थित्यंतरे झाली. बदलत्या परिस्थितीप्रमाणे रामनाथांनीही नवं तंत्र आत्मसात केले.

विद्यासागर अध्यापक या कोल्हापूरच्या लेखकाच्या ‘साखर खाल्लेला माणूस’ या नाटकाचा प्रयोग कोल्हापुरात होत आहे. या नाटकाला व्यावसायिक यश मिळत आहे.
२0१४ मध्ये हे नाटक अध्यापक यांनी कोल्हापुरातील कलावंतांना घेऊन केले. त्याला चांगले यश मिळाल्यानंतर हे नाटक व्यावसायिक रंगभूमीवर यश मिळवीत आहे.
लेखक विद्यासागर हे खरंतर २00७ पासून लेखन क्षेत्रात आहेत. तत्पूर्वी प्रायव्हेट हायस्कूलमधून स्नेहसंमेलनातून त्यांनी नाटकात भूमिका केल्या. पुण्यात एस. पी. कॉलेजमध्ये शिकत असताना फिल्म इन्स्टिट्यूटमधील मित्रांमुळे चित्रपट माध्यमांची ओळख झाली आणि तेथूनच वाहिन्यांच्या वेगवेगळ्या मालिकांचे लेखन करू लागले. यानिमित्ताने चं. प्र. देशपांडे, दिलिप जगताप, श्याम मनोहर यांच्याशी त्यांचा संपर्क आला. १९९८ मध्ये पुरुषोत्तम करंडकमध्ये त्यांच्याच साक्ष मावळत्या सूर्याची या एकांकिकेला दिग्दर्शनाचे पहिले बक्षीस मिळाले. तेथून प्रायोगिक रंगभूमीशी नाळ जोडली गेली. त्यानंतर त्यांनी मॅन प्लस वूमन इज इक्वल टू ड्रामा, मॅन प्लस वूमन प्लस नेबर्स या दोन एकांकिकेला बक्षिसे मिळाली. मग दर्दे डिस्कोला राज्य नाट्य स्पर्धेत बक्षीस मिळाले. यातूनच लता नॉर्वेकर यांच्या संस्थेतर्फे ‘आधी बसू, मग बोलू’ हे त्यांचे नाटक प्रथमत: व्यावसायिक रंगभूमीवर आले. चंद्रकात कुलकर्णी यांनी दिग्दर्शित केलेल्या या नाटकात संजय नॉर्वेकर, तेजस्विनी पंडितसारखे कलाकार होते. नंतर भालचंद्र पानसे यांनी दिग्दर्शित केलेल्या प्रगती एक्सप्रेस नाटकाच्या लेखनासाठी नाट्यदर्पणचा पुरस्कार त्यांना मिळाला.
नाटकासोबतच विद्यासागर यांनी नागेश भोसले यांचा पन्हाळा, संजय जाधव यांचा मनातल्या उन्हात या दोन मराठी चित्रपटांचे पटकथा-संवाद लिहिले. प्रसिद्ध दिग्दर्शक श्याम बेनेगल यांच्या इंग्लिश-हिंदी भाषेतील आगामी रुटस टू फ्रीडम या चित्रपटाचे लेखन त्यांनी पूर्ण केले आहे. हा एक आंतरराष्ट्रीय प्रकल्प आहे. शिवाय माजी जिल्हाधिकारी लक्ष्मीकांत देशमुख यांनी लिहिलेल्या सावित्रीच्या लेकी या सह्याद्री वाहिनीवरील मालिकेचे दिग्दर्शन सागर यांनी केले.
साखर खाल्लेला माणूस नाटकाचे मराठीसोबतच हिंदी, इंग्लिश, गुजराती, कन्नड भाषेत प्रयोग होणार आहेत. शिवाय यावर तेलगू भाषेत चित्रपट बनत आहे. मधुमेह झालेल्या माणसाला हा रोग कसा शिस्त लावतो, हा या नाटकाचा विषय आहे.
- संदीप आडनाईक
कोल्हापूर

Web Title: Spotlight - Kolhapur Coolman Writer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.