रोगापेक्षा इलाज भयंकर, कोल्हापुरातील इचलकरंजीत जलपर्णीवर विषारी औषधाची फवारणी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2023 12:34 PM2023-04-25T12:34:51+5:302023-04-25T12:35:28+5:30

पंचगंगा नदीच्या पात्रात वाढलेली जलपर्णी नष्ट करण्यासाठी रासायनिक तणनाशक फवारणाऱ्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी

Spraying of poisonous drug on aquatic plants in Panchganga riverbed at Ichalkaranji in Kolhapur | रोगापेक्षा इलाज भयंकर, कोल्हापुरातील इचलकरंजीत जलपर्णीवर विषारी औषधाची फवारणी

रोगापेक्षा इलाज भयंकर, कोल्हापुरातील इचलकरंजीत जलपर्णीवर विषारी औषधाची फवारणी

googlenewsNext

कोल्हापूर : इचलकरंजी येथील पंचगंगा नदीच्या पात्रात वाढलेली जलपर्णी नष्ट करण्यासाठी रासायनिक तणनाशक फवारणाऱ्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. उच्च न्यायालय नियुक्त पंचगंगा नदीप्रदूषण नियंत्रण समितीचे सदस्य उदय गायकवाड यांनी विभागीय आयुक्त आणि प्रदूषण मंडळाचे सचिव यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. हा प्रकार म्हणजे रोगापेक्षा इलाज भयंकरचा अनुभव आहे.

पंचगंगा नदीच्या पात्रात इचलकरंजी ते शिरोळदरम्यान प्रक्रिया न करता सोडलेल्या सांडपाण्यामुळे जलपर्णीची मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. प्रदूषणास कारणीभूत असणाऱ्या सर्व घटकांच्या वर कोणतीही कारवाई झाली नाही. मात्र, वाढलेली जलपर्णी काढून टाकून प्रदूषण झालेच नाही, असे दाखवण्याचा उद्देश ठेवून २३ एप्रिल २०२३ रोजी इचलकरंजी येथील पंचगंगा नदीच्या पात्रात वाढलेली जलपर्णी काढण्यासाठी रासायनिक विषारी तणनाशक फवारणी ड्रोनच्या मदतीने करण्यात आली.

हा नदीचा स्राेत नागरिक व जनावरे यांना पिण्यासाठी आहे. तसेच शेतीसाठी पाणीपुरवठा केला जातो. नदीतील पाणी, त्यावरील जलपर्णी, नदीकाठ परिसरात अनेक प्रकारचे किडे, अळ्या, मासे, सरपटणारे प्राणी, पक्षी, प्राणी आदींचा अधिवास असून त्या परिस्थितीमध्ये अनेक अन्नसाखळ्या व अन्नजाळे अस्तित्वात आहे. त्यावर विषारी तणनाशक मारले तर अनेक घटक मृत होऊन ते खाद्य म्हणून इतर कोणत्याही प्राणी- पक्ष्यांनी खाल्ल्यानंतर मृत्यू ओढवू शकतो. तसेच पाळीव जनावरे व नागरिकांनादेखील त्या विषाचा त्रास होण्याची शक्यता आहे.

जलप्रदूषण कायदा, पर्यावरण कायदा, जैवविविधता कायदा, वन्य जीव संरक्षण कायद्यानुसार हा गुन्हा घडला असून त्याबाबत संबंधित अधिकारी व घटक यांच्यावरही गुन्हा दाखल करावा, वापरलेली साधने जप्त करावी, पाण्याचे व वनस्पतींचे नमुने संकलित करून ते फ्लाॅरेन्सिक लॅबकडे पाठविण्यात यावे. तसेच नदीकाठावर तातडीने जनावरे व नागरिकांनी पाणी वापर करू नये, मासेमारी करू नये, मासे व अन्न प्रादुर्भाव झालेल्या बाबींचे सेवन करू नये, असे आवाहन करण्यात यावे, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

इचलकरंजी महापालिका रडारवर

दरम्यान, अशा पद्धतीने जिल्हास्तरीय समितीला विश्वासात न घेता ही फवारणी केल्यामुळे इचलकरंजी महापालिका अडचणीत येण्याची शक्यता आहे. मूळ प्रदूषणमुक्तीसाठी ठोस अंमलबजावणी न करता महापालिकेने राबविलेला वादग्रस्त ठरण्याची शक्यता आहे.

Web Title: Spraying of poisonous drug on aquatic plants in Panchganga riverbed at Ichalkaranji in Kolhapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.