मराठा महासंघाचे वसंत मुळीक कोल्हापूर ‘उत्तर’मधून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2019 10:51 AM2019-09-11T10:51:24+5:302019-09-11T10:52:51+5:30
गेली अनेक वर्षे मी समाजकारण करीत आहे, परंतु आता मी कोल्हापूर ‘उत्तर’विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढवावी, यासाठी कार्यकर्ते प्रचंड आग्रही आहेत. त्यांच्या दबावाचा आणि आग्रहाचा विचार करून मी निवडणुकीला सामोरा जाणार असल्याची घोषणा मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष वसंत मुळीक यांनी येथे केली.
कोल्हापूर : गेली अनेक वर्षे मी समाजकारण करीत आहे, परंतु आता मी कोल्हापूर ‘उत्तर’विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढवावी, यासाठी कार्यकर्ते प्रचंड आग्रही आहेत. त्यांच्या दबावाचा आणि आग्रहाचा विचार करून मी निवडणुकीला सामोरा जाणार असल्याची घोषणा मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष वसंत मुळीक यांनी येथे केली.
शाहू स्मारक भवन येथे कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात मुळीक यांनी उमेदवारीसाठी काँग्रेसला प्राधान्य देणार असल्याचेही स्पष्ट केले. मात्र तेथून उमेदवारी न मिळाल्यास अपक्ष म्हणून उतरण्यासही मागे-पुढे पाहणार नसल्याचेही त्यांनी जाहीर केले. मुळीक म्हणाले, सामान्य माणसाला न्याय मिळवून देणे हेच उद्दिष्ट डोळ्यांसमोर ठेवून मी निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे. गेली तीस वर्षे मी अखिल भारतीय मराठा महासंघाच्या माध्यमातून समाजाचे संघटन करत आहे.
मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्याच्या चळवळीत महत्वाची भूमिका बजावली आहे. मराठा समाजाचे प्रश्र्न मांडतानाही सातत्याने इतर सर्व समाजाला न्याय मिळवून देण्याची भूमिका घेतली आहे. त्यामुळे त्या बळावर निवडणूकीला सामोरे जावे असा प्रयत्न आहे. त्यासाठी प्रथम काँग्रेसकडून तिकीट मागावे, अशी कार्यकर्त्यांची मागणी आहे. जिल्ह्यातील प्रत्येक मतदारसंघात आमचे कार्यकर्ते आहेत. काँग्रेसकडून उमेदवारी न मिळाल्यास कार्यकर्त्यांच्या मनोबलावर आपण अपक्ष म्हणून निवडणुकीला सामोरे जाणार आहोत.’
बबन रानगे म्हणाले, गेली ३० वर्षे समाजकार्यात असलेला सामान्य कार्यकर्ता आमदार होऊ शकतो, हे आपण दाखवून दिले पाहिजे. ‘एक नोट - एक व्होट’ याप्रमाणे मुळीक यांना निवडून आणण्याची जबाबदारी आपली आहे.
इतिहास संशोधक इंद्रजित सावंत म्हणाले, ‘सरकारकडून सामान्य जनतेची फसवणूक केली जात आहे. प्रतिगाम्यांचे विचार रोखायचे असतील तर मुळीक यांच्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला विधानसभेत पाठविणे गरजेचे आहे.
मुस्लिम बोर्डिंगचे कादर मलबारी म्हणाले, ‘आपल्या समाजकार्यातून वसंतराव हे सर्व समाजांच्या तळागाळापर्यंत पोहोचले आहेत. फक्त संघटनेच्या माध्यमातून प्रश्न सुटत नाही, तर ते मार्गी लावण्यासाठी राजकारणात यावे लागते. सामान्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी राजकीय सत्ताही महत्त्वाची आहे.’
शशिकांत पाटील यांनी प्रास्ताविक केले. उत्तम जाधव यांनी आभार मानले. यावेळी आम आदमी पार्टीचे संदीप देसाई, ख्रिश्चन समाजाचे अनंत म्हाळुंगेकर, अनिल पाटील, अमरसिंह पाटील, छावा संघटनेचे किसन लोहार, उत्तम कांबळे, डॉ. संदीप पाटील, मुस्लिम ब्रिगेडचे फिरोज खान यांनी मनोगत व्यक्त केले. मेळाव्यास कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती.