शिरोलीला चिकन गुनियाचा विळखा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2021 04:16 AM2021-06-19T04:16:17+5:302021-06-19T04:16:17+5:30
शिरोली : एकीकडे कोरोनाचे संकट कमी होण्याचे नाव घेत नसताना आता शिरोलीकरांना चिकन गुनियाने पुरते वेढल्याने नव्या संकटाची भर ...
शिरोली : एकीकडे कोरोनाचे संकट कमी होण्याचे नाव घेत नसताना आता शिरोलीकरांना चिकन गुनियाने पुरते वेढल्याने नव्या संकटाची भर पडली आहे. शिरोलीत सध्या हजारोंच्यावर चिकन गुनियाचे रुग्ण असल्याने चिंता वाढली आहे. विशेष म्हणजे येथील अनेक लोकप्रतिनिधींनाही याची लागण झाल्याने ही साथ आटोक्यात आणण्यासाठी प्रशासनाची धावपळ सुरू झाली आहे. शिरोलीमधील प्रभाग क्रमांक पाचमध्ये चिकन गुनियाचे जास्त रुग्ण आहेत. सांधे दुखणे, बोटे आखडणे, ताप आणि कणकण अशा लक्षणांनी शिरोलीकर बेजार झाले आहेत. ही सारी लक्षणे चिकन गुनियासारखी आहेत. शिरोलीत चिकन गुनिया, डेंग्यू आणि व्हायरल तापाचे रुग्ण मोठ्या संख्येने आढळून येत आहेत. त्यामुळे येथील सर्वच रुग्णालये गर्दीने भरली आहेत. एकीकडे कोरोना संसर्गाला रोखण्यासाठी प्रशासनासह सर्वच जण जिवाचे रान करत असताना आता चिकन गुनियाचे नवे संकट उभे ठाकल्याने शिरोलीकर चिंतेत आहेत. एकाला ताप आल्यानंतर कुटुंबातील इतर सदस्यांनाही याची लागण होत असल्याने अनेकजण भीतीच्या छायेत आहेत. येथील यादववाडी, गावभाग, माळवाडी या भागात साथीचे रुग्ण मोठ्या संख्येने आढळून येत आहेत.
यादववाडी भागात हातापायाला सूज येणे, ताप येणे, अंगदुखी अशी लक्षणे असणारे रुग्ण मोठ्या संख्येने आढळले आहेत. दरम्यान, शिरोलीतील अनेक भागात डेंग्यूचे रुग्णही मोठ्या प्रमाणात आढळत असल्याचे चित्र आहे.
चौकट : डासांच्या उत्पत्तीला सध्याचे वातावरण पोषक असल्यामुळे या साथीच्या आजारांना खतपाणी मिळत असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून सांगितले जात आहे. त्यामुळे नागरिकांनी घरासह परिसरातही डासांची उत्पत्ती होणार नाही या दृष्टिकोनातून स्वच्छता ठेवणे गरजेचे बनले आहे.
कोट : चिकन गुनिया सदृश्य तापाची साथ शिरोलीत आली आहे. रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळत आहेत. लक्षणे दिसल्यास रुग्णांनी तत्काळ तपासणी करून घ्यावी. डॉ. योगेश खवरे.
कोट : शिरोलीत चिकन गुनियाचे रुग्ण आढळत आहेत. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या टीमने गावात पाहणी केली आहे. आम्हीही सर्वेक्षण सुरू केले आहे. डॉ जेसिका अँड्र्युज-वैद्यकीय अधिकारी शिरोली
फोटो : १८ शिरोली चिकन गुनिया
चिकन गुनियाच्या रुग्णांचे सुजलेले हात पाय