ठिबकचा उत्पादनवाढीवर शिडकाव...!
By admin | Published: February 9, 2015 11:26 PM2015-02-09T23:26:59+5:302015-02-09T23:58:46+5:30
पाणी बचत, उत्पादन वाढ : जिल्ह्यात१३ हजार हेक्टरहून अधिक क्षेत्र आले ‘ठिबक’खाली
दत्ता पाटील - म्हाकवे -जमिनीला कायम वाफसा अवस्थेत ठेवण्यासाठी ऊस व फळबागेसह भाजीपाला पिकांमध्ये ठिबक सिंचन पद्धतीचा अवलंब करणे हितावह आहे. त्यामुळे पाण्याची मोठ्या प्रमाणात बचत होऊन रासायनिक खतांचाही अधिक कार्यक्षमतेने वापर करता येतो. त्यामुळे उत्पादनात भरीव वाढ होऊन दर्जेदार उत्पादनही मिळत असल्याचा निष्कर्ष कृषितज्ज्ञांना आला. जिल्ह्यात सुमारे १३ हजार हेक्टरहून अधिक क्षेत्र ठिबक सिंचनाखाली आले. पाणी बचतीसह उत्पादन वाढ, असा दुहेरी फायदा यामुळे होत आहे.ठिबक सिंचन हा शेतीसाठी योग्य पर्याय आहे. जमिनीची प्रत टिकून राहण्यासाठी, मुळांच्या वाढीला, पिकांच्या योग्य वाढीसाठी, पाणीधारण क्षमता वाढून पृष्ठभागावरून पाण्याचे होणारे बाष्पीभवन थांबविण्यासाठी ठिबक पर्याय आहे. मुळांच्या कक्षेतील ओलावा व हवा यांचे संतुलन साधले गेल्याने उत्पादनात २५ ते ३० टक्क्यांपर्यंत वाढ होते. तसेच ४५ टक्क्यांपर्यंत पाणी बचत होते. ठिबक सिंचनामध्ये सूक्ष्मनलिका पद्धत, दाबनियंत्रण असणारी व नसणारी डिपर्स पद्धत, तसेच लॅटरलचे आत ड्रिपर्स असणारी व ड्रिपर्स नसणारी पद्धत कार्यान्वित आहे. जमिनीच्या पृष्ठभागाखाली दाब नियंत्रण असलेली व दाब नियंत्रण नसणारी ड्रिपर्स या दोन्ही पद्धतींचा वापर करता येतो.रासायनिक खते ठिबकद्वारे दिल्याने ही खते थेट पिकांच्या मुळांच्या सहवासात येतात. त्यामुळे खतांचीही ३० टक्क्यांपर्यंत बचत होऊन उत्पादन खर्चावर मर्यादा येते. तण उगवत नसल्याने खुरपणी, आंतरमशागत व तणनाशकांचा खर्चही कमी होतो. दरम्यान, बारकाईने अभ्यास केला असता ठिबक केलेल्या शेतीतून अधिक उत्पादन मिळाल्याचे निष्कर्षाअंती दिसते.
१९९८-९९ पासून सुरू झालेल्या ठिबक सिंचन योजनेला गेल्या दहा वर्षांत शेतकऱ्यांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. शासनाने यासाठी अनुदान देताना पीकनिहाय अनुदानाऐवजी लॅट्रोनच्या संस्थेवर अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे. ही सिंचन पद्धत शेतीच्या भविष्यासह शेतकऱ्यांना उत्पादनवाढीसाठी हितावह ठरणारी आहे.
- मोहन आहोळे, जिल्हा अधीक्षक
हंगामनिहाय पिकाला पाण्याची गरज वेगवेगळ्या प्रमाणात असते. उसासाठी हिवाळ्यामध्ये ठिबक संच दोन ते अडीच तास दररोज सुरू ठेवावा, तर उन्हाळ्यामध्ये साडेतीन ते चार तास तसेच पावसाळ्यात (पावसाने जास्त काळ दडी मारल्यास) आवश्यकतेनुसार एक ते दीड तास ठिबक संच सुरू ठेवावा.
शासनाचे अनुदान, कारखान्याचे प्रोत्साहन