स्फोटाचे धागेदोरे शोधण्यासाठी पथक आंध्रप्रदेशकडे रवाना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 2, 2019 04:17 PM2019-11-02T16:17:09+5:302019-11-02T16:19:40+5:30
कोल्हापूर : उजळाईवाडी येथील उड्डाणपुलाखालील स्फोटाचे धागेदोरे शोधण्यासाठी कोल्हापूर पोलिसांचे पथक आंध्र प्रदेशातील अमरावती गावाकडे शुक्रवारी सकाळी रवाना झाले. ...
कोल्हापूर : उजळाईवाडी येथील उड्डाणपुलाखालील स्फोटाचे धागेदोरे शोधण्यासाठी कोल्हापूर पोलिसांचे पथक आंध्र प्रदेशातील अमरावती गावाकडे शुक्रवारी सकाळी रवाना झाले. हुबळी येथून बकेटमधून आलेली स्फोटके व उजळाईवाडीत सापडलेली स्फोटके यांच्यात साम्य आहे. त्या पार्श्वभूमीवर काहीतरी धागेदोरे हाती लागण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
महिन्याभरापूर्वी पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर उजळाईवाडी उड्डाणपुलाखाली स्फोट झाला होता. त्यानंतर तेथे लपवून ठेवलेली स्फोटकेही सापडली होती. ६९ गावठी बॉम्बही पोलिसांनी जप्त केले आहेत. या घटनेनंतर काही दिवसांत हुबळी रेल्वे स्थानकात कोल्हापूरच्या नावाने आलेल्या पार्सलचा स्फोट होऊन यात दोघे जखमी झाले. हुबळी व उजळाईवाडीतील स्फोटकात साम्य आहे.
हुबळीत आलेली स्फोटके आंध्र प्रदेशातील अमरावती गावातून आली होती. ती कोणी पाठवली?, त्यामागील हेतू काय होता?, कोल्हापुरात ती कोणाकडे येणार होती? याची माहिती पोलिसांकडून घेतली जात आहे; त्यामुळे या प्रकरणाचा तपास करण्यासाठी उजळाईवाडी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण व त्यांचे पथक शुक्रवारी सकाळी आंध्र प्रदेशला रवाना झाले.