डेंग्यू , चिकुनगुणियाचा प्रभाव रोखण्यासाठी पथके, उपाययोजना निश्चित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2020 03:43 PM2020-06-10T15:43:01+5:302020-06-10T15:44:16+5:30
कोल्हापूर महानगरपालिका व जिल्हा हिवताप अधिकारी कार्यालय यांच्यामार्फत डेंग्यू व चिकुनगुणिया यासंदर्भात सर्वेक्षण करण्याकरिता पथके स्थापन करण्याचा निर्णय मंगळवारी महानगरपालिकेत झालेल्या बैठकीत घेण्यात आला.
कोल्हापूर : महानगरपालिका व जिल्हा हिवताप अधिकारी कार्यालय यांच्यामार्फत डेंग्यू व चिकुनगुणिया यासंदर्भात सर्वेक्षण करण्याकरिता पथके स्थापन करण्याचा निर्णय मंगळवारी महानगरपालिकेत झालेल्या बैठकीत घेण्यात आला.
दैनंदिन सर्वेक्षणाद्वारे अळीनाशकाचा वापर करून शहरात डेंग्यूची व चिकुनगुणियाची होणारी वाढ कशी रोखता येऊ शकते याबद्दल या बैठकीत नियोजन करण्यात आले. अध्यक्षस्थानी आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी होते. यावेळी जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. विनोद मोरे, आरोग्याधिकारी डॉ. दिलीप पाटील, साहाय्यक जिल्हा हिवताप अधिकारी एम. जी. वड्ड उपस्थित होते.
डेंग्यू, चिकुनगुणिया रोखण्यासाठी नागरिकांचा सहभाग असणे अत्यंत महत्त्वाचे आहे. घरातील पाणीसाठे आठवड्यातून एक वेळा स्वच्छ घासूनपुसून मगच पाणी भरावे. पाणीसाठ्यांना झाकण असावे, घरासभोवतालचा परिसर स्वच्छ ठेवावा, घरातील फ्रिजच्या पाठीमागील बाजूचे ट्रे आठवड्यातून एक वेळ स्वच्छ करावेत; टायर, नारळाच्या करवंट्या, फुटक्या बादल्या, भंगाराचे साहित्य नष्ट करावे, फुलझाडांच्या कुंड्यांमध्ये पाणी साठणार नाही याची दक्षता घ्यावी. घराच्या छतावर तसेच बेसमेंटमध्ये पाणी साठणार नाही याची दक्षता संबंधितांनी घ्यावी, असे आवाहन बैठकीत करण्यात आले.
नागरिकांनी दक्षता घेतली तर डासांची उत्पत्ती रोखण्यास मदत होणार आहे. ज्या ठिकाणी कायमस्वरूपी पाणीसाठे आहेत, तिथे गप्पी मासे सोडावेत, महानगरपालिकेमार्फत दैनंदिन धूरफवारणी सुरू ठेवावी, अशा सूचना यावेळी देण्यात आल्या.
शहरातील सर्व रुग्णालयांमध्ये डेंग्यूसदृश रुग्ण आढळल्यास तत्काळ महानगरपालिका व जिल्हा हिवताप अधिकारी कार्यालय यांना कळविण्याचे आवाहनही यावेळी करण्यात आले आहे.