श्रीलंकन अधिकारी जि. प.च्या योजनांनी प्रभावित-पाच अधिकाऱ्यांच्या पथकाची भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2018 01:07 AM2018-04-10T01:07:50+5:302018-04-10T01:07:50+5:30
कोल्हापूर : श्रीलंकेमध्ये ९ राज्ये आणि २५ जिल्हे आहेत. कोल्हापूर जिल्हा परिषदेचे काम हे आमच्या एका राज्याचे काम आहे. या ठिकाणी राबविलेल्या विविध योजना आम्हाला मार्गदर्शक आहेत. या योजनांची आम्ही तेथे अंमलबजावणी करू, अशी ग्वाही श्रीलंकेतील साबरगमुआ राज्याचे मुख्य सचिव हेरथ पुलरत्ने यांनी दिली.
या राज्याच्या उच्चपदस्थ पाच अधिकाºयांच्या पथकाने सोमवारी सकाळी कोल्हापूर जिल्हा परिषदेला भेट देऊन महिला सबलीकरणाविषयी प्रामुख्याने चर्चा केली. यावेळी ते बोलत होते.
जि.प.च्या विविध योजना, उपस्थित महिला सदस्यांनी साधलेल्या संवादामुळे पथक प्रभावित झाल्याचे चित्र पाहावयास मिळाले.महाराष्ट्र निवडणूक आयोगाच्या पुढाकारातून श्रीलंका लर्निंग मिशन संस्थेच्या माध्यमातून या दौºयाचे आयोजन केले होते. यावेळी साबरगमुआ राज्याचे सचिव श्रीयानी पद्मलथा, आयुक्त बी. ए. सी. पी. बामुनाराची, सहाय्यक आयुक्त डब्लू.जी.एन.समनकुमारा व एल.एम.पी.डब्लू बंडारा उपस्थित होते. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शौमिका महाडिक, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी या सर्वांचे स्वागत केले.
सुरुवातीला सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन केले. समन्वयक दत्ता गुरव यांनी या दौºयामागील हेतू सांगितला. त्यानंतर डॉ. खेमनार यांनी जि.प.च्या सर्व विभागांतर्फे राबविण्यात येणाºया विविध योजना व उपक्रमांचे सादरीकरण केले. शिक्षण, आरोग्य आणि महिला बचतगट चळवळ याबाबतीत त्यांनी प्रामुख्याने माहिती दिली. त्यानंतर हेरथ पुलरत्ने यांनीही श्रीलंकेबाबतचे सादरीकरण केले. यावेळी झालेल्या चर्चेमध्ये जिल्हा परिषद सदस्या सदस्या प्रा. अनिता चौगुले, डॉ. पद्माराणी पाटील, सभापती डॉ. स्नेहा जाधव, जयश्री तेली यांनी भाग घेतला. कार्यक्रम अधिकारी अनुवा कुंवर यांनी चर्चेमध्ये समन्वय साधला. सूत्रसंचालन प्रा. संजय लोंढे यांनी केले तर आभार अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी इंद्रजित देशमुख यांनी मानले. तत्पूर्वी, या अभ्यासदौरा सदस्यांनी महिला आर्थिक विकास महामंडळाचा आढावा घेऊन महिला उन्नतीसाठी कोल्हापूर जि.प. राबवित असलेल्या उपक्रमाची माहिती घेतली. यावेळी विजय भोजे, राजवर्धन निंबाळकर, विजया पाटील, आकांक्षा पाटील यांच्यासह महिला सरपंच, ग्रामपंचायत सदस्य उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भालेराव, प्रकल्प संचालक डॉ. हरिष जगताप, चेतन वाघ, मालती सगणे, सुनंदा मांदळे, अजय देशमुख, संजय अवघडे उपस्थित होते.
श्रीलंकेत महिलांना २५ टक्के आरक्षण
श्रीलंकेमध्ये पंचायत राज प्रक्रियेमध्ये महिलांना फेब्रुवारी २०१८ मध्ये २५ टक्के आरक्षण दिले आहे. अनेक निवडणुकांसाठी महिला उमेदवार मिळत नसल्याची येथे परिस्थिती आहे. महिला संघटना व स्वयंसेवी संघटनांच्या दबावामुळे हे आरक्षण दिले आहे; परंतु महिलांवर असणाºया जबाबदाºया, सामाजिक आणि धार्मिक बंधने, स्वारस्याची कमतरता अशा अनेक कारणांमुळे राजकीय क्षेत्रामध्ये येण्यामध्ये महिला उत्सुक नसतात अशी वस्तुस्थिती यावेळी हेरथ पुलरत्ने यांनी मांडली.
महिला पदाधिकाºयांनी साधला इंग्रजीतून संवाद
जिल्हा परिषदेमध्ये पहिल्यांदा आंतरराष्ट्रीय अधिकाºयांचे पथक आले होते. या पार्श्वभूमीवर अध्यक्षा शौमिका महाडिक, जि.प. सदस्या डॉ. पद्माराणी पाटील, प्रा. अनिता चौगुले, आकांक्षा पाटील, गडहिंग्लजच्या सभापती जयश्री तेली यांनी थेट इंग्रजीतूनच या पथकाशी संवाद साधल्याने सर्वजण प्रभावित झाले.