Kolhapur: पट्टणकोडोलीतील विठ्ठल बिरदेव यात्रेत भंडाऱ्यात लाखो भाविक न्हाले..!
By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2024 11:50 AM2024-10-22T11:50:14+5:302024-10-22T11:51:24+5:30
अनिल बिरांजे पट्टणकोडोली : भंडारा, खारिक, खोबरे, लोकर यांच्या उधळणीत चांगभलंच्या गजरात लाखो भाविकांच्या उपस्थितीत सोमवारी पट्टणकोडोली येथील श्री ...
अनिल बिरांजे
पट्टणकोडोली : भंडारा, खारिक, खोबरे, लोकर यांच्या उधळणीत चांगभलंच्या गजरात लाखो भाविकांच्या उपस्थितीत सोमवारी पट्टणकोडोली येथील श्री विठ्ठल बिरदेव यात्रेस उत्साहात प्रारंभ झाला. ढोल-कैताळाच्या निनादात श्री विठ्ठल बिरूदेवाच्या नावानं चांगभलंच्या गजरात फरांडे बाबांनी ऐतिहासिक हेडाम सोहळ्याचे दर्शन घडविले.
सकाळपासून ढोल-कैताळाने परिसर दणाणून गेला होता. भंडारा, खारिक, खोबरे, लोकर यांच्या उधळणीने वातावरण भक्तीमय बनले होते. भाकणुकीसाठी विविध राज्यांतून लाखो भाविक मिळेल त्या वाहनाने पट्टणकोडोलीत दाखल झाले होते. दुपारी दोनच्या सुमारास मुख्य धार्मिक विधीस प्रारंभ झाला. गावचावडीत मुख्य मानकरी प्रकाश पाटील व रणजित पाटील यांच्या हस्ते मानाच्या तलवारीचे पूजन केले.
दुपारी तीन वाजता श्री फरांडेबाबा हातात धारदार तलवार घेऊन उभे राहिले. पोटावर तलवारीने वार करत फरांडेबाबा हेडाम खेळत मंदिराची प्रदक्षिणा घालत मंदिरात आले. त्यानंतर भाकणूक झाली. परिवहन विभागाने विविध भागांतून जादा बसेस सोडल्या. हुपरी पोलिस ठाण्याकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
फरांडेबाबांची भाकणूक
नऊ दिवसांत पावसाचे कावड फिरेल, पाऊस काळ चांगला राहील: धारणा चढती राहील, महागाई वाढेल, राजकारणात उलथापालथ होऊन भगवा फडकेल, देशाची समान नागरिक कायद्याच्या दिशेने वाटचाल होईल, भारताची महासत्तेकडे वाटचाल होईल, देवाची सेवा करील त्याची रोगराई दूर होईल, अशी भाकणूक फरांडेबाबा यांनी केली.
सात ते आठ लाख भाविकांची उपस्थिती
महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यांसह आंध्र, तमिळनाडू, गोवा, कर्नाटक राज्यांतून जवळपास सात ते आठ लाख भाविक उपस्थित होते.