श्रीक्षेत्र नृसिंहवाडी येथील परंपरेने रात्री देव गावात आले
By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2024 11:01 AM2024-07-28T11:01:16+5:302024-07-28T11:01:34+5:30
यापूर्वी 2005, 2006, 2019 व 2021 साली देव गावात आले होते. हक्कदार पुजारी खातेदार यांचे घरी पूर्वी 1967 साली देव आले होते.
नृसिंहवाडी - (प्रशांत कोडणीकर) : श्रीक्षेत्र नृसिंहवाडी येथील परंपरेने रात्री देवगावात आले.काल दि.27 रोजी रात्रौ 11.45 वाजता येथील दत्त मंदिरातील टेंबे स्वामी मंदिराच्या कट्यावरील पायरीवर कृष्णा -पंचगंगा नदीचे पाणी पोहचले आणि आनंदाच्या भरात श्री गुरुदेव दत्त चा एकच जयघोष सुरू झाला आणि पंचोपचार पूजे नंतर देव गावात येण्यास निघाले.
यापूर्वी 2005, 2006, 2019 व 2021 साली देव गावात आले होते. हक्कदार पुजारी खातेदार यांचे घरी पूर्वी 1967 साली देव आले होते.
पवित्र कृष्णा व पंचगंगा नदीच्या काठावर वसलेले नृसिंहवाडी हे श्री दत्ताची राजधानी म्हणून सुपरिचित आहे.अनेक राज्यातून भाविक मोठया संख्येने येथे स्नान व दर्शनासाठी हजेरी लावतात. हे पुरातन व जागृत दत्त मंदिर असलेने या मंदिरात आजही मोठया श्रद्धेने प्रथा व परंपरा जोपासल्या जातात. दोन मोठ्या नद्यांचा संगम येथे असलेने निसर्ग सोबत पुराचा सामनाही येथील नागरीकांना करावा लागतो.
येथील 'मनोहर' पादुका पाषाणाच्या व स्थीर असून त्या अचल आहेत. पावसाळ्यात नदीचे पाणी वाढून उत्तरवाहिनी कृष्णा नदी त्या पादुकांना स्पर्श करून पुढे वाहिल्यास येथे 'दक्षिणदवार' सोहळा संपन्न होतो यावेळी अनेक भाविक पापमुक्तीसाठी येथील दक्षिणद्वारात मोठ्या श्रद्धेने स्नान करतात. त्यानंतर येतील परंपरेनुसार दत्त मंदिरातील प प नारायण स्वामी महाराज मंदिरात श्रींची उत्सवमूर्ती दर्शनासाठी ठेवली जाते व तेथे तिन्ही त्रिकाळ पूजा-अर्चा संपन्न होते.
पावसाचे प्रमाण वाढलेस नारायण स्वामी मंदिरातील उंबरठ्यावर नदीच्या पाण्याचा प्रवाह आल्यास तेथील पूजा होऊन उत्सवमूर्ती प.प.वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज मठात आणली जाते व तेथेच पूजा अर्चा संपन्न होते. त्यानंतरही पावसाचा जोर वाढलेस व नदीच्या पाणीपातळीत वाढ झालेस मठा समोरील मोठ्या कट्ट्यावर पाणी आलेस श्रींची उत्सवमूर्ती त्या दिवशी च्या हक्कदार पुजारी चे घरात आणली जाते यालाच देव गावात आले असं म्हंटल जात.ही गावातील व परिसरातील नागरिक मोठी पर्वणी मानतात.
काल दि.27 रोजी रात्रौ 11.45 वाजता येथील दत्त मंदिरातील टेंबे स्वामी मंदिराच्या समोरील कट्यावर कृष्णा -पंचगंगा नदीचे पाणी पोहचले आणि कंबरेभर पाण्यात देवासमोर थांबलेल्या ग्रामस्थानी आनंदाच्या भरात श्री गुरुदेव दत्त चा एकच जयघोष सुरू झाला आणि पंचोपचार पूजे नंतर देव गावात येण्यास निघाले.
रात्री 12 ची वेळ अनेकांच्या घरात पुराचे पाणी आल्याने साहित्याची आवराआवर करून कंटाळलेला जीव असला तरी एकच उत्साह प्रत्येकाच्या मनात दिसत होता की देव गावात आले.
मार्गावरील राडीचे रस्त्याची जागा मनमोहक रांगोळ्या नी घेतली.मंदिर परिसर व गाव गजबजून गेला बँड व घंटेच्या नादाच्या लयीत ब्रह्मवृंद यांच्या पदे व आरत्या यांच्या सुरात पुराच्या विळख्यातील पूर्ण गावच क्षणात धार्मिक झाले. टेंबे स्वामी महाराज यांचे मठात पंचोपचार पूजा होऊन मानकरी दिगंबर खातेदार यांचे घरी देव येण्यास निघाले. गावातील व परिसरातील भाविकांनी दुतर्फा गर्दी केली.
महिलांनी उत्सवमूर्ती ला मंगलारतीने ओवाळले आणि दोन तासांच्या मिरवणूकने पहाटे 3 वाजता उत्सवमूर्ती खातेदार यांचे घरी पोहचली तेथे देखील पूजा आरती होऊन शेजारती करणेत आली.
पुराचे पाणी कमी होऊन मंदिरात जाई पर्येंत तेथेच देवाची पूजा अर्चा मोठ्या उत्साहात संपन्न होणार आहे.
देव गावात येण्याच्या उत्साहाने आनंदित
पुराने त्रस्त असलेले ग्रामस्थ ही मोठ्या संख्येने मोठ्या उत्साहात रात्री 12 वाजता देखील देव गावात येण्याच्या उत्साहाने आनंदित झाले आणि तन मन विसरून गेले.
देव गावात आल्यावरच गाव सोडतात
नदीच्या पुराचे पाणी वाढु लागलेतरी स्थलांतराच्या तयारीत असलेले ग्रामस्थ हे देव गावात आल्यावरच गाव सोडतात.