श्रीपूजक अजित ठाणेकरांसह तिघांवर गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2017 12:54 AM2017-06-12T00:54:31+5:302017-06-12T00:54:31+5:30
अंबाबाईला घागरा-चोली परिधान प्रकरण; कार्यकर्त्यांचे पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : करवीरनिवासिनी अंबाबाई देवीस साडीऐवजी घागरा-चोली परिधान केल्याबद्दल श्रीपूजक हक्कदार नगरसेवक अजित ठाणेकर, वडील बाबूराव ठाणेकर व घागरा-चोली भेट देणारे भक्त योगेश जोशी अशा तिघांवर धार्मिक भावना दुखावल्याबद्दल जुना राजवाडा पोलिसांनी रविवारी गुन्हा दाखल केला. या सर्वाविरोधात गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी जुना राजवाडा पोलीस ठाण्यात जोरदार आंदोलन केले.
अंबाबाई देवीस शुक्रवारी (दि. ९) नियमित पूजेवेळी श्रीपूजक अजित ठाणेकर यांनी पारंपरिक साडीऐवजी घागरा-चोली परिधान केले. या कृत्याबद्दल देशभरातील
भाविकांतून गेले दोन दिवस तीव्र संताप व्यक्त होत होता. रविवारी सकाळी जुना राजवाडा पोलीस ठाण्यात मोठ्या संख्येने सर्वपक्षीय कार्यकर्ते एकत्र आले व या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. यावेळी पोलीस निरीक्षक निशिकांत भुजबळ यांनी सर्वपक्षीय कार्यकर्त्यांना आपली लेखी तक्रार द्या; त्यावर आपण वरिष्ठांशी बोलून व अभ्यास करून गुन्हा दाखल करू, असे आश्वासन दिले. या आश्वासनावर सर्वपक्षीय कार्यकर्त्याचे समाधान झाले नाही. दरम्यान, पोलिसांनी या कार्यकर्त्यांबरोबर एक तास चर्चा केली. ही चर्चा फिसकटल्याने शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय देवणे, संजय पवार यांनी जोपर्यंत ठाणेकर व जोशी यांच्यावर गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत पोलीस ठाण्याच्या चौकात ठिय्या मारू, असे सर्वांना सांगितले. त्यावर सर्वांनी पाऊण तास ठिय्या मारून पोलीस प्रशासन व ठाणेकर, जोशी यांच्या निषेधाच्या घोषणा देऊन परिसर दणाणून सोडला. आंदोलनकर्ते ऐकण्याच्या मन:स्थितीत नसल्याने अखेरीस पोलीस निरीक्षक भुजबळ यांनी शहर पोलीस उपअधीक्षक डॉ. प्रशांत अमृतकर यांना बोलावून घेतले. यावर अमृतकर यांनी आंदोलनकर्त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, आंदोलनकर्ते आपल्या म्हणण्यावर ठाम राहिले. अखेरीस अमृतकर यांनी फिर्याद दाखल करून घेण्याचे आदेश पोलिसांना दिले. आंदोलकांतर्फे क्षत्रिय मराठा संघटनेचे दिलीप पाटील यांनी ठाणेकर व जोशी यांच्याविरोधात फिर्याद दिली.
अजामीनपात्र गुन्हा दाखल
श्रीपूजक नगरसेवक अजित ठाणेकर व वडील बाबूराव ठाणेकर आणि घागरा-चोली देवीस भेट देणारे योगेश जोशी या तिघांवर जुना राजवाडा पोलीस ठाण्यात क्षत्रिय मराठा संघटनेचे दिलीप पाटील यांच्या फिर्यादीनुसार पोलिसांनी २९५ (अ) कलमानुसार धार्मिक भावना दुखावून समाजात तेढ निर्माण करण्याच्या प्रयत्नाबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला.
घोषणाबाजीने परिसर दणाणला
सकाळी १०.३० वाजता शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय पवार, विजय देवणे, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे सदस्य शिवाजीराव जाधव, शहराध्यक्ष दुर्गेश लिंग्रज, अवधूत साळोखे, राजू जाधव, वैशाली महाडिक, तानाजी पाटील, ‘प्रजासत्ताक’चे दिलीप देसाई, क्षत्रिय मराठा समाजाचे दिलीप पाटील, स्वाभिमान संघटनेचे सचिन तोडकर, हिंदू जनजागृतीचे मधुकर नाझरे, जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. प्रकाश मोरे, माजी अध्यक्ष विवेक घाटगे, प्रवीण पालव, विजय नेसरकर, बाबा पार्टे, स्वप्निल पार्टे, आदींनी जुना राजवाडा पोलीस निरीक्षक निशिकांत भुजबळ यांच्याकडे श्रीपूजक अजित ठाणेकर व घागरा-चोली भेट देणारे योगेश जोशी यांच्यावर गुन्हे दाखल करून त्यांना अटक करण्याची मागणी केली. यावेळी आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी करीत पोलीस ठाण्यातच गोंधळ घालत ठिय्या मारला.
देवीची मूर्ती म्हणजे एटीएम नव्हे!
शिवसेनेचे संजय पवार यांनी, आई अंबाबाई ही आमची आई व दैवत आहे. त्यामुळे आमच्या धार्मिक भावना दुखावल्या असून, श्रीपूजक ठाणेकरांसह घागरा- चोली देणाऱ्या जोशी यांच्यावर गुन्हा दाखल करून अटक करा; अन्यथा आम्ही देवीच्या गाभाऱ्यात जाऊन देवीची अवहेलना व देवीला ‘एटीएम मशीन’ समजणाऱ्या पुजाऱ्यांच्या छाताडावर बसू, असे पोलीस निरीक्षक भुजबळ यांना सुनावले.
सिंग, साठेंवर गुन्हा दाखल करा
देवीच्या मूर्तीची विनापरवाना पाहणी करणारे पुरातत्त्व खात्याचे माजी अधिकारी मनेजरसिंग व तत्कालीन सचिव शुभांगी साठे यांच्यावरही गुन्हा दाखल करा. याबाबतचे पुरावे देऊनही गुन्हा का दाखल करीत नाही? असे म्हणणे ‘प्रजासत्ताक’चे दिलीप देसाई यांनी उपअधीक्षक अमृतकर व पोलीस निरीक्षक भुजबळ यांच्यासमोर मांडले. यात त्यांनी लेखी पुरातत्त्व खात्याने साडेचार किलो एमसील व दीड किलो तांब्याची पट्टी देवीच्या मूर्तीवरून काढण्यात आल्याचे पुरावे सादर केले. त्यानुसार श्रीपूजक ठाणेकर यांच्यासह तत्कालीन पुजारी व सिंग यांच्यावर धार्मिक भावना दुखावल्याबद्दल व अवेहलना केल्याबद्दलचा दुसरा गुन्हाही दाखल करावा, अशी मागणी ‘प्रजासत्ताक’चे दिलीप देसाई यांनी लावून धरली.
अजित ठाणेकर यांना अटक करावी: शिवाजीराव जाधव
शुक्रवारी (दि. ९) रोजी भाविक योगेश जोशी हे घागरा-चोली घेऊन पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे व्यवस्थापक धनाजी जाधव यांच्याकडे आले होते. त्यावेळी जाधव यांनी केवळ आपल्याकडे पारंपरिक काठा-पदराची साडी नेसविण्याची प्रथा आहे. त्यामुळे घागरा-चोली नेसवता येणार नसल्याचे स्पष्ट केले होते. तरीही जोशी यांनी अजित ठाणेकर यांना गाठून त्या दिवशी देवीस