ssc exam: वेळ वाढवून मिळाल्याने विद्यार्थ्यांतून समाधान
By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2022 12:08 PM2022-03-19T12:08:20+5:302022-03-19T12:10:23+5:30
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या दोन वर्षांपासून ऑनलाईन शिक्षण सुरू आहे. त्यामुळे साहजिकच विद्यार्थ्यांची लेखनाची सवय कमी झाली आहे.
संतोष मिठारी
कोल्हापूर : कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून यावर्षी दहावीची परीक्षा ऑफलाईन स्वरूपात घेण्यात येत आहे. पेपरसाठी मंडळाने १५ ते ३० मिनिटांचा वेळ वाढवून दिला आहे. त्यामुळे परीक्षेत डोक्याबरोबर हातही चालत आहेत. पेपर पूर्ण सोडविण्यावर आमचा भर असल्याचे कोल्हापूर जिल्ह्यातील दहावीच्या परीक्षार्थींनी शुक्रवारी सांगितले.
दहावीची परीक्षा मंगळवारपासून सुरू झाली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या दोन वर्षांपासून ऑनलाईन शिक्षण सुरू आहे. त्यामुळे साहजिकच विद्यार्थ्यांची लेखनाची सवय कमी झाली आहे. अंतिम लेखी परीक्षेत अभ्यास होऊनही पेपर लिहिता आला नाही, पूर्ण सोडविता आला नाही, तर अडचणीचे ठरणार असल्याचे पालक, विद्यार्थ्यांना वाटत होते. ही अडचण लक्षात घेऊन शिक्षण मंडळाने यावर्षी पेपर सोडविण्यासाठी वेळ वाढवून दिला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांमधून समाधान व्यक्त होत आहे.
लिहिण्याची अडचण दूर
दहावीचा अभ्यास पूर्ण झाला. पण, ऑनलाईन शिक्षणामुळे लिहिण्याची थोडी अडचण वाटत होती. मात्र, वेळ वाढवून मिळाल्याने ती दूर झाली आहे. - शुभम डावरे
अर्धा तास जादा वेळ वाढवून मिळाल्याने पेपर सोडविणे अधिक सोयीस्कर झाले आहे. पहिला पेपर आम्ही चांगल्या पद्धतीने सोडवला. - सृष्टी आणि साक्षी गुरव
बोर्डाने वेळ वाढवून दिल्याने आम्हा विद्यार्थ्यांसाठी ते उपयुक्त ठरले आहे. मराठी, हिंदी, इंग्रजी भाषा विषयांच्या पेपरसाठी हे महत्त्वपूर्ण आहे. - वेदिका पाटील
तज्ज्ञ शिक्षक म्हणतात
कोरोनामुळे विद्यार्थ्यांचा लिहिण्याचा वेग कमी झाला होता. आता वेळ वाढवून मिळाल्याने परीक्षा देणाऱ्यांपैकी ९५ टक्के विद्यार्थी पूर्णपणे पेपर सोडवत आहेत. - एच. आर. लोंढे
यावर्षी बोर्डाने विद्यार्थ्यांना ८० गुणांच्या पेपरसाठी ३०, तर ४० गुणांच्या पेपरकरिता १५ मिनिटांचा वेळ वाढवून दिला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचा ताण कमी झाला आहे. - विशाल सासमिले