SSC Result २०२२: कोल्हापूर विभाग राज्यात दुसरा, ९८.५० टक्के निकाल
By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2022 12:44 PM2022-06-17T12:44:06+5:302022-06-17T18:47:01+5:30
गेल्यावर्षी आठव्या क्रमांकावर असणाऱ्या कोल्हापूर विभागाने यंदा मात्र जोरदार मुसंडी मारत दुसऱ्या क्रमांकावर झेप घेतली आहे.
कोल्हापूर : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून इयत्ता दहावीचा निकाल आज, शुक्रवारी ऑनलाईन जाहीर झाला. त्यात ९८.५० टक्के निकालासह कोल्हापूर विभाग राज्यात दुसरा क्रमांक मिळविला. गेल्यावर्षी आठव्या क्रमांकावर असणाऱ्या कोल्हापूर विभागाने यंदा मात्र जोरदार मुसंडी मारत दुसऱ्या क्रमांकावर झेप घेतली आहे. या विभागात कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्याचा समावेश आहे.
गेल्यावर्षी कोल्हापूर विभाग ९९.९२ टक्क्यांसह राज्यात आठव्या क्रमांकावर होता. फेब्रुवारी-मार्च दरम्यान बारावीची परीक्षा झाली. त्यासाठी कोल्हापूर विभागातून १ लाख ३१ हजार २९७ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी १ लाख ३० हजार ८३५ जणांनी परीक्षा दिली. त्यापैकी १ लाख २८ हजार ८८४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. त्यांच्या निकालाची एकूण टक्केवारी ९८.५० टक्के इतका आहे. कोल्हापूर विभागात प्राविण्यासह प्रथम श्रेणीत ६३,६१४ विद्यार्थी, प्रथम श्रेणीमध्ये ४४,६७१ द्वीतीय श्रेणीमध्ये १८०३९ विद्यार्थी आणि उत्तीर्ण श्रेणीमध्ये २५६० जणांनी यश मिळविले.
राज्यात यंदाची कोकण विभागानेच प्रथम बाजी मारली आहे. कोकण विभागातून सर्वाधिक विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत, तर नाशिक विभागाचा निकाल सर्वात कमी लागला आहे. राज्याचा निकाल एकूण ९६.९४ टक्के इतका लागला आहे. दुपारी १ वाजता विद्यार्थ्यांना निकाल ऑनलाइन पद्धतीनं पाहता येणार आहे.
विभागानुसार लागलेले निकाल टक्केवारी...
पुणे: ९६.९६%
नागपूर: ९७%
औरंगाबाद: ९६.३३%
मुंबई: ९६.९४%
कोल्हापूर: ९८.५०%
अमरावती: ९६.८१ %
नाशिक: ९५.९०%
लातूर: ९७.२७%
कोकण: ९९.२७%