लालपरीची बुधवारपासून तिकीट दरात १० टक्के हंगामी वाढ, दिवाळीच्या तोंडावर प्रवाशांना भुर्दंड बसणार
By सचिन भोसले | Published: November 6, 2023 07:20 PM2023-11-06T19:20:08+5:302023-11-06T19:20:19+5:30
या मार्गावर धावणार जादा बसेस
कोल्हापूर : दिवाळीच्या तोंडावर खासगी वाहनचालकांकडून भाडेवाढ करण्यात आली आहे. त्यातच आता एसटी महामंडळानेही ८ ते २७ नोव्हेंबर दरम्यान १० टक्क्यांनी भाडेवाढ केली आहे. त्यामुळे प्रवाशांना अधिकचा भुर्दंड बसणार आहे. दुसरीकडे प्रवाशांची गैरसोय होऊ नये, यासाठी उद्या, बुधवारपासून महामंडळाकडून पुणे मार्गावर २२० जादा बसेसही सोय करण्यात आली आहे.
दिवाळीच्या पार्श्वभूमीवर एस.टी.महामंडळ दरवर्षीप्रमाणे १० टक्के तिकीट दरात ह्ंगामी वाढ करते. त्यानंतर पुन्हा केलेली भाडेवाढ रद्द करते. यंदा त्याप्रमाणेच वाढ करण्यात आली आहे. विशेष म्हणजे खासगी प्रवासी वाहतुकदारांनीही यापुर्वीच तिकीट दरात वाढ केली आहे. त्यामुळे प्रवाशांना जादाचा भुर्दंड बसणार आहे.
वाढलेले दर असे,
मार्ग - साधी बस सध्याचे दर - नवीन दर
कोल्हापूर-मुंबई- ५७०- ६३५
कोल्हापूर-पुणे- ३३०-३७५ (शिवशाही- ९४०), (शिवाई- ५४०)
कोल्हापूर- सोलापूर- ३७५-४१५
कोल्हापूर- सातारा-१९०-२१०
कोल्हापूर- सांगली- ७०-८०कोल
कोल्हापूर-रत्नागिरी- २००-२२०
कोल्हापूर- सावंतवाडी- २५५-२८०
कोल्हापूर-कणकवली- १७५-१९५
कोल्हापूर-पणजी- ३६०-३९०
कोल्हापूर -छ.संभाजीनगर- ६८०-७५०(शिवशाही- १११०)
कोल्हापूर- अहमदनगर- ५२५- ५७५
कोल्हापूर- गडहिंग्लज- ९०-९५
कोल्हापूर-चंदगड- १७५-१९०
कोल्हापूर-आजरा- १२५-१४०
या मार्गावर धावणार जादा बसेस
राज्य परिवहन मार्ग महामंडळाच्या कोल्हापूर विभागातून मुंबई, पुणे, बीड, परभणी, अक्कलकोट, तुळजापूर, बंगळूरू अशा विविध मार्गावर जादा वाहतुक केली जाणार आहे. ही वाहतुक ९ ते २० नोव्हेंबर दरम्यान होणार आहे. याशिवाय दिवाळीपूर्व वाहतुकीकरीता ९ ते ११ या कालावधीत खास पुणे मार्गावर नियमित २२० बसेसची सोय करण्यात आली आहे. दिवाळीनंतर परतीच्या वाहतुकीचेही नियोजन करण्यात आले आहे. या फेऱ्या ऑनलाईन आरक्षणासाठी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. दिवाळीसह भाऊबीज सणासाठी प्रवासी गर्दीनूसार जिल्हाअंतर्गत ग्रामीण मार्गावर जादा वाहतुक केली जाणार आहे. याचा लाभ प्रवाशांनी घ्यावा.असे आवाहन विभाग नियंत्रक अनघा बारटक्के यांनी केले आहे.