कोल्हापुरात एसटीचा अपघात, १५ हून अधिक प्रवासी जखमी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2023 10:34 AM2023-11-27T10:34:26+5:302023-11-27T10:35:09+5:30
रविवारी रात्री ठाण्याहून कोल्हापूरमधील चंदगडला जाणाऱ्या या बसचा अपघात झाला.
- सतीश पाटील
कोल्हापूर : टोप फाटा येथे चालकाचा बसवरील ताबा सुटल्याने एसटी बस उलटून १५ हून अधिक प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत, ही घटना सोमवारी दि.२७ रोजी पहाटे ४ च्या सुमारास घडली.
घटनास्थळावरुन अधिक माहिती अशी की, रविवारी रात्री ठाण्याहून कोल्हापूरमधील चंदगडला जाणाऱ्या या बसचा अपघात झाला. ही बस पहाटे चारच्या सुमारास टोप फाटा बिरदेव मंदिर समोरील वळणावर आली असता या बसच्या चालकाचा बसवरील ताबा सुटल्याने बस ओढ्यावरील पुलाच्या संरक्षण कठड्याला घासली आणि पुढे महामार्गावरील डिव्हायडरवर जाऊन पुढे पूर्वेकडील लोखंडी संरक्षक ग्रिल तोडून कच्च्या रस्त्यावर जाऊन उलटली.
यावेळी बस मधील सर्व प्रवासी गाढ झोपेत होते. अपघात झाल्यावर प्रवाशांनी आरडा ओरडा केला. या अपघातात १५ हून अधिक प्रवासी जखमी झाले आहेत. घटनास्थळी सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज गिरी यांनी तात्काळ जाऊन जखमींना उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात दाखल केले.