एसटीने शहरे जोडली, गावे मात्र अद्यापही नकाशाबाहेरच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2021 04:16 AM2021-07-22T04:16:15+5:302021-07-22T04:16:15+5:30
कोल्हापूर : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा कहर काहीअंशी ओसरल्यानंतर राज्यातील एसटी बसेस पुन्हा रस्त्यावर धावू लागल्या आहेत. मात्र, याला कोल्हापूर ...
कोल्हापूर : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा कहर काहीअंशी ओसरल्यानंतर राज्यातील एसटी बसेस पुन्हा रस्त्यावर धावू लागल्या आहेत. मात्र, याला कोल्हापूर जिल्हा अजूनही अपवाद ठरत आहे. ग्रामीण अंतर्गत भागात एसटी बसेस सुरू झालेली नाही. पर्यायाने या गावातून वडापचाच आधार प्रवाशांना घ्यावा लागत आहे.
राज्य शासनाने कोरोना संसर्गाच्या विविध स्तरानुसार ज्या त्या जिल्ह्याला एसटी बसेस त्या त्या क्षमतेनुसार सुरू करण्यास परवानगी दिली आहे. त्यात कोल्हापूर जिल्ह्याचा चार दिवसांपर्यंत चौथा स्तर होता. त्यानंतर सोमवार (दि. १९) पासून तिसरा स्तर आला. त्यामुळे काहीअंशी ग्रामीण अंतर्गत भागात एसटी बसेस सुरू आहेत. अद्यापही पूर्ण क्षमतेने या बसेस सुरू झालेल्या नाहीत. त्यामुळे अनेक गावांत एसटी बसेस सुरू न झाल्यामुळे वडापचाच आधार घ्यावा लागत आहे. प्रवाशांची मागणी आहे. मात्र, जिल्हा प्रशासनाने घातलेल्या निर्बंधामुळे महामंडळाला या मार्गावर बसेस सुरू करता येईनात. जिल्ह्यातून सर्व तालुक्यांना तासा तासाला मुरगूड, गारगोटी, कागल, पन्हाळा, शाहूवाडी, राधानगरी, आजरा, गडहिंग्लज, चंदगड, इचलकरंजी, जयसिंगपूर आदी भागांत बसेस धावत आहेत. यातील काही तालुक्यांच्या भागात एसटी बसेस काहीअंशी सुरू झाल्या आहेत. मात्र, पूर्वीप्रमाणे त्या पूर्ण क्षमतेने सुरू झालेल्या नाहीत. त्यामुळे प्रवाशांना एसटी बसचा सुखकर प्रवास लाभत नाही. त्यामुळे नाइलाजाने का होईना तालुका, जिल्ह्याच्या ठिकाणी येण्यासाठी वडापचाच आधार घ्यावा लागत आहे.
आगारातील एकूण बसेस -७५०
सध्या सुरू असलेल्या बसेस - ४३०
कोरोनाआधी रोज होणाऱ्या फेऱ्या - ६००
सध्या सुरू असलेल्या फेऱ्या - ३००
कोरोना आधी दिवसाला २ लाख कि.मी. रोज बसेस धावत होत्या
सध्या किती. कि.मी. - ४० हजार
कोरोना आधी दिवसाचे उत्पन्न - सुमारे ७० लाख
कोरोनानंतरचे दिवसाचे उत्पन्न - ३५ लाख
खेडेगावावरच अन्याय का ?
वैद्यकीय उपचारासाठी तालुक्याच्या अथवा शहराच्या ठिकाणी यावे लागते. एसटी बसेस नसल्यामुळे आमच्या हालाला पारावर नाही. मोठ्या गावांच्या लोकसंख्या पाहून एसटी बसेस सुरू कराव्यात.
-विश्वजित पाटील, कागल
तालुक्याच्या ठिकाणी जाण्यासाठी एक तर दुचाकीचा आधार घ्यावा लागतो. नाही तर गावातून खासगी वाहनाचा आधार. तालुक्याच्या ठिकाणच्या एसटी बसस्टँडपर्यंत वडापचा आधार घ्यावा लागत आहे. त्यामुळे ग्रामीण अंतर्गत बसेस सुरू कराव्यात.
-विजय साळवी, गडहिंग्लज
कोट
ग्रामीण भागातून अजूनही एसटी बसेसना प्रतिसाद कमी आहे. जिल्हा प्रशासनाचे निर्बंध अजूनही लागू आहेत. जिल्ह्याचा संसर्ग आणि डेथ रेटही मोठा आहे. तालुक्यापर्यंत फेऱ्या सुरू असून काहीअंशी ग्रामीण भागातही फेऱ्या सुरू केल्या आहेत.
शिवराज जाधव, विभागीय वाहतूक अधिकारी, एसटी महामंडळ, कोल्हापूर विभाग
काळ्या-पिवळीचाही आधार नाही
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर एसटी बसेस अद्यापही पूर्ण क्षमतेने आंतर ग्रामीण भागात सुरू झालेल्या नाहीत. त्यात काळ्या पिवळ्या टॅक्सीलाही परवानगी नसल्याने त्यांचाही आधार या प्रवाशांना नाही. त्यामुळे मिळेल त्या खासगी वाहनाने खेडेगावातील मंडळी प्रवास करीत आहेत.