एसटी कर्मचाऱ्यांची पी.एफ., ग्रॅज्युईटीची ८०० कोटी रुपयांची रक्कम थकली
By संदीप आडनाईक | Published: April 21, 2023 06:08 PM2023-04-21T18:08:57+5:302023-04-21T18:09:56+5:30
मदतीचा सरकारचा दावा खोटा असल्याचा श्रीरंग बरगे यांचा आरोप
कोल्हापूर : एसटी बँक, भविष्य निर्वाह निधी व उपदान अशी मिळून एसटी कर्मचाऱ्यांची ९६० कोटी रुपयांची देणी थकली आहेत, मदतीची परिपत्रके काढली जात असून प्रत्यक्षात मात्र निधी दिला जात नाही. त्यामुळे एसटीला मदत करीत असल्याचा सरकारचा दावा खोटा व दिशाभूल करणारा असल्याचा आरोप महाराष्ट्र एस. टी. कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी केला आहे.
कोल्हापूर जिल्हा दौऱ्यावर आले असता बरगे यांनी शुक्रवारी ही माहिती पत्रकारांना दिली. एसटी कर्मचाऱ्यांच्या संपकाळात कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी सरकारकडून चार वर्षे निधी देण्याचे न्यायालयाने नेमलेल्या त्रिसदस्यीय समितीने न्यायालयात मान्य केले होते. पण गेले अकरा महिने सरकारकडून अपुरा निधी येत असल्याने एसटी कर्मचाऱ्यांची ९६० कोटी रुपयांची देणी थकवली आहेत. जमा खर्चाच्या मागवलेल्या तपशीलानुसार अकरा महिन्याच्या कालावधीत १६०० कोटी रुपयांची तूट असल्याचे एसटीने सरकारला कळविले होते, मात्र ही तफावत रक्कम अजूनही मिळालेली नाही, असाही आरोप त्यांनी केला.
कोरोना आणि संपामुळे एसटीचे उत्पन्न कमी झाले. कर्मचाऱ्यांनी घेतलेल्या कर्जाच्या वसुलीची एसटी को-ऑफ बँकेची अंदाजे १६० कोटी रुपये इतकी रक्कम महामंडळाने बँकेकडे डिसेंबर २०२२ पासून भरणा केलेली नसून त्याचा फटका बँकेला बसत आहे. हीच रक्कम बँकेने गुंतवली असती तर त्यावर एक कोटी पंचाहत्तर लाख रुपयांपेक्षा जास्त व्याज बँकेला मिळाले असते. पण ते बुडाले असून त्याची झळ बँकेला सोसावी लागली आहे.
भविष्य निर्वाह निधी आणि उपदान या दोन्ही रक्कमांचा एसटी कर्मचाऱ्यांचा स्वतंत्र ट्रस्ट असून वेतनातून कपात केलेल्या पी.एफ. आणि ग्रॅच्युईटीच्या रक्कमेचा हिस्सा एसटीने या ट्रस्टकडे भरणा केलेला नाही. सप्टेंबर २२ पासून अंदाजे ८०० कोटी रुपये इतकी रक्कम न भरल्याने गुंतवणुकीनंतर त्यावर मिळणारे अंदाजे चाळीस कोटी रुपये व्याज बुडाले आहे. यामुळे ट्रस्टचे परिणामी कर्मचाऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. या सर्व प्रकाराला सरकार जबाबदार आहे, असा आरोप बरगे यांनी केला आहे. महिन्याला येणारी तूट भरून काढण्यासाठी तफावतीची रक्कम सरकारने तात्काळ दिली पाहिजे अशी मागणीही बरगे यांनी केली.