रत्नागिरीसह जिल्हा अंतर्गत एसटीची बससेवा बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2021 04:16 AM2021-07-23T04:16:00+5:302021-07-23T04:16:00+5:30
कोल्हापूर : गेल्या दोन दिवसांपासून पावसाचा जोर वाढल्याने जिल्ह्यातील नद्यांना पूर आला आहे. त्यामुळे गुरुवारी सकाळपासून रत्नागिरी-कोल्हापूर राष्ट्रीय ...
कोल्हापूर : गेल्या दोन दिवसांपासून पावसाचा जोर वाढल्याने जिल्ह्यातील नद्यांना पूर आला आहे. त्यामुळे गुरुवारी सकाळपासून रत्नागिरी-कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गासह जिल्ह्यातील अंतर्गत एसटीची बस सेवा बंद करण्यात आली आहे.
गेल्या दोन दिवसांच्या दमदार पावसामुळे जिल्ह्यातील पंचगंगा, कानसा, कुंभी-कासारी आदी नद्यांना पूर आला आहे. त्यामुळे या नद्यांवरील बंधारे पूर्णत: पाण्यात गेले आहेत. त्यामुळे कोल्हापूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गही येल्लूर गावाजवळ पाणी आल्यामुळे बंद आहे. तर निलजी बंधाराही वाहतुकीसाठी बंद केला आहे. मालेवाडी ते सोंडोली कानसा बंधाऱ्यावर वारणा नदीचे पाणी आल्यामुळे या मार्गावरील वाहतूक बंद करून ती विरळे जांभूर मार्गे वळविण्यात आली आहे. कळे (ता. करवीर) येथील किरवे येथेही रस्त्यावर पाणी आल्याने गगनबावडाकडील वाहतूकही बंद झाली आहे. कसबा बीड येथील महे पूलही पाण्याखाली गेल्याने या मार्गावरील एसटीची बससेवा तूर्तास बंद करण्यात आली आहे, अशी माहिती एसटी महामंडळाच्या सूत्रांनी दिली.