केएमटीसह एस.टी.ची बससेवा ठप्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2021 04:21 AM2021-07-25T04:21:03+5:302021-07-25T04:21:03+5:30
शहराची वाहिनी म्हणून के.एम.टी.च्या बसेसना शहरवासीय प्राधान्य देत आहेत. कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेनंतर केवळ १५ बसेस शहरातील विविध मार्गावर ...
शहराची वाहिनी म्हणून के.एम.टी.च्या बसेसना शहरवासीय प्राधान्य देत आहेत. कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेनंतर केवळ १५ बसेस शहरातील विविध मार्गावर कार्यरत आहेत. त्यातून दिवसाकाठी के.एम.टी.ला ९० हजारांचे उत्पन्न मिळत आहे. मात्र, गेल्या दोन दिवसांत शहरातील बहुतांशी भागात पुराचे पाणी आले आहे. त्यामुळे हे मार्ग बंद झाले आहेत. त्यामुळे या सर्व बसेस गेल्या दोन दिवसांपासून बंद ठेवण्यात आल्या आहेत.
एस.टी.च्या कोल्हापूर विभागातून रोज ३५० हून अधिक बसेस जिल्ह्यासह राज्यातील विविध शहरांत मार्गक्रमण करतात. मात्र, गेल्या चार दिवसांपासून पावसाने सर्वत्र जोर पकडला आहे. त्यात गेल्या दोन दिवसांपासून पंचगंगा नदीसह इतर नद्यांनाही पूर आला आहे. त्यामुळे जिल्ह्यासह राज्यातील इतर जिल्ह्यांत होणारी वाहतूक बंद झाली आहे. काल (दि. २३) पर्यंत पुणे, सातारा, सांगलीकडे जाणारी वाहतूक काहीअंशी सुरू होती. मात्र, राष्ट्रीय महामार्गावर पुराचे पाणी आल्यामुळे कोल्हापुरातून बाहेर जाणारी वाहतूक पूर्णत: बंद करण्यात आली. त्यामुळे एस.टी.च्या कोल्हापूर विभागातून होणारी सर्व प्रवासी वाहतूक ठप्प झाली. गेल्या दोन दिवसांत या विभागाचे ७० लाखांचे नुकसान झाले आहे. एस.टी. च्या ७०० पैकी ३५० हून बसेस रस्त्यावर दोन दिवसांपूर्वी धावत होत्या. मात्र, त्या शुक्रवारपासून पूर्णत: बंद करण्यात आल्या आहेत. पूरपरिस्थिती पूर्ववत होताच ही सेवा पुन्हा सुरू केली जाणार आहे.