एस.टी. कर्मचाऱ्यांचा 'बंद'ला संमिश्र प्रतिसाद

By admin | Published: December 18, 2015 12:49 AM2015-12-18T00:49:44+5:302015-12-18T01:19:40+5:30

'इंटक'चा बेमुदत संप : दुपारी वाहतूक पूर्ववत; प्रवासी खोळंबले; आंदोलनकर्त्यांवर कारवाई

S.T. A composite response to employees' bandh | एस.टी. कर्मचाऱ्यांचा 'बंद'ला संमिश्र प्रतिसाद

एस.टी. कर्मचाऱ्यांचा 'बंद'ला संमिश्र प्रतिसाद

Next

कोल्हापूर : राज्यातील महाराष्ट्र एस. टी. कर्मचाऱ्यांना २५ टक्के पगारवाढ द्यावी, या मागणीसाठी महाराष्ट्र एस. टी. वर्कर्स, काँग्रेस (इंटक)चे सभासद गुरुवारी मध्यरात्रीपासून बेमुदत संपावर गेले. आंदोलनकर्त्यांनी सकाळी आठ वाजता मध्यवर्ती बसस्थानक परिसरात एस. टी. गाडी अडविण्याच्या प्रयत्न केल्याने पोलिसांनी कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले; तर कागल, गडहिंग्लज, गारगोटी आगारांमधील वाहतूक काही काळ पूर्णपणे बंद ठेवल्याने प्रवाशांना ताटकळत थांबावे लागले. मात्र, दुपारी एकनंतर सर्व मार्गांवरील वाहतूक सुरळीत सुरू झाली.
महाराष्ट्र एस. टी. महामंडळातील कर्मचाऱ्यांना अन्य महामंडळे व राज्यातील शासकीय कर्मचाऱ्यांपेक्षा अत्यंत कमी पगार आहे. परिणामी एस.टी.चे बहुसंख्य कर्मचारी कर्जबाजारी झाले आहेत. त्यामुळे औद्योगिक कलह कायदा १९४७ मधील तरतुदींनुसार कामगार करार २०१२-१६ रद्द करून एम.एस.ई.बी.प्रमाणे एस.टी. कर्मचाऱ्यांना २५ टक्के पगारवाढ देण्यात यावी, या मागणीसाठी राज्यातील सर्व एस.टी. वर्कर्स काँग्रेस (इंटक)चे सभासद गुरुवारी मध्यरात्रीपासून बेमुदत संपावर गेले आहेत.
गुुरुवारी सकाळी मध्यवर्ती बसस्थानकाच्या प्रवेशद्वारासमोर काँग्रेस कार्यकर्ते एकत्र जमले. यावेळी घोषणाबाजी करून बसस्थानकातून बाहेर जाणाऱ्या एस.टी. बस अडविण्याचा प्रयत्न काही कार्यकर्ते करीत होते. त्यांना महामंडळाचे अधिकारी ‘तुम्ही संप करा; मात्र प्रवाशांना वेठीस धरू नका,’ अशी विनंती करीत होते. मात्र, कार्यकर्ते काही ऐकण्याचा मन:स्थितीमध्ये नव्हते. यामुळे कार्यकर्ते व अधिकारी यांच्यामध्ये वाद झाला. परिस्थिती हाताबाहेर जात आहे, हे लक्षात येताच याची कल्पना पोलीस प्रशासनाला देण्यात आली. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून सकाळी आठ ते नऊपर्यंत मध्यवर्ती बसस्थानकातील वाहतूक बंद ठेवण्यात आली होती. दरम्यान, शाहूपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस मोठा फौजफाटा घेऊन मध्यवर्ती बसस्थानकात दाखल झाले. यावेळी गाडी अडविणाऱ्या सुमारे पन्नास कार्यकर्त्यांना त्यांनी ताब्यात घेतले.
आंदोलनाचा धसका घेऊन कागल, गडहिंग्लज, चंदगड आगारांतील गाड्या दुपारपर्यंत पूर्णपणे बंद ठेवल्या होत्या. त्यामुळे या ठिकाणच्या बसस्थानकांत प्रवासी अडकून पडले होते. तसेच दुपारी दोनपर्यंत मध्यवर्ती बसस्थानकात अनेक प्रवासी खोळंबून राहिले होते.
पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेऊन दुपारी सोडून दिले. आंदोलनात ‘इंटक’चे राज्याचे उपाध्यक्ष बंडोपंत वाडकर, विभागीय सचिव आप्पासाहेब साळुंखे, विजय सणगर, रूपाली पाटील, सारिका पाटील, सुरेश गवळी, बजरंग चव्हाण, सुनंदा काळे या प्रमुख कार्यकर्त्यांसह सर्व सभासद आंदोलनात सहभागी झाले होते.
चंदगडला ८२ बसफेऱ्या रद्द
या संपात चंदगड आगारातील वाहक व चालकांच्या सहभागामुळे तालुक्यातील ८२ बसफेऱ्या बंद झाल्या. त्यामुळे ८५०० किलोमीटर अंतर धावणाऱ्या बसेस गुरुवारी दिवसभर आगारात थांबून होत्या. त्यामुळे सुमारे सव्वा लाखाचे नुकसान झाले. संपात जिल्हा उपाध्यक्ष अर्जुन लोंढे, सचिव कपिल मुंडे, तालुकाध्यक्ष श्रीरंग नागरगोजे, कार्याध्यक्ष गोविंद मासरणकर, आदींसह ‘इंटक’चे कर्मचारी सहभागी झाले होते.
इचलकरंजीत दोन लाखांचा तोटा
संपामुळे इचलकरंजी आगाराची बस वाहतूक विस्कळीत झाली. एस.टी.च्या दीडशे फेऱ्या रद्द कराव्या लागल्यामुळे दोन लाख रुपयांचा तोटा झाला आहे. एस.टी.वर्कर्स कॉँग्रेसच्या कामगार कार्यकर्त्यांनी येथील शहापूर एस.टी. आगारावर पहाटे चार वाजता निदर्शने केली. दिवसभर आगाराच्या प्रवेशद्वारावर धरणे आंदोलन केले. यामध्ये कामगार संघटनेचे विभागीय अध्यक्ष आनंदराव दोपारे, आगार अध्यक्ष किशोर डाके, सचिव श्रीकृष्ण खामकर, प्रल्हाद घुणके, आदी सहभागी झाले होते.
बारा लाखांचे नुकसान
इंटकने पुकारलेल्या ‘बेमुदत संपा’मुळे गुरुवारी पहिल्या दिवशी ७८७ फेऱ्या रद्द झाल्याने एस. टी. महामंडळाच्या कोल्हापूर विभागाचे सुमारे बारा लाखांचे नुकसान झाले. महामंडळातर्फे दुपारी दोनपर्यंत विविध मार्गांवरील १ हजार ५८४ फेऱ्या होतात. त्यापैकी गुरुवारी दुपारपर्यंत ७८७ फेऱ्या रद्द झाल्या. त्यामुळे ४८ हजार २५२ किलोमीटर अंतराच्या फेऱ्या रद्द केल्या. त्यामुळे कोल्हापूर विभागाचे सुमारे बारा लाखांचे उत्पन्न बुडाले.
शुकशुकाट.....
रत्नागिरी बसस्थानकात ‘इंटक’च्या संपाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याने त्या मार्गावरून येणाऱ्या गाड्या पूर्णपणे बंद होत्या. त्यामुळे नेहमी गजबजणाऱ्या संभाजीनगर, रंकाळा बसस्थानकांवर दिवसभर तुरळकच गाड्या येत होत्या. संपामुळे या मार्गावरील प्रवाशांचे चांगलेच हाल झाले. प्रवाशांनी अन्य खासगी वाहनांचा आधार घेऊन प्रवास करणे पसंत केल्याने दिवसभर या बसस्थानकांत शुकशुकाट दिसत होता. (प्रतिनिधी)

Web Title: S.T. A composite response to employees' bandh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.