‘इंटक’तर्फे एस.टी. कार्यालयासमोर निदर्शने
By admin | Published: January 12, 2017 01:12 AM2017-01-12T01:12:26+5:302017-01-12T01:12:26+5:30
विभागीय नियंत्रकाचा निषेध : मनमानी कारभाराविरोधात आंदोलन तीव्र करण्याचा इशारा
कोल्हापूर : महाराष्ट्र एस.टी. वर्कर्स काँग्रेस (इंटक) संघटनेच्या वतीने विविध आगारांतील कामगारांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत विभाग नियंत्रक नवनीत भानप यांच्याकडे तक्रारी करूनसुद्धा त्या सोडविल्या जात नाहीत. विभाग नियंत्रकांच्या मनमानी कारभाराविरोधात ‘इंटक’तर्फे बुधवारी दुपारी विभागीय कार्यालयासमोर तीव्र निदर्शने करण्यात आली.
सचिव अप्पासाहेब साळोखे म्हणाले, संघटनेच्या वतीने विभागातील कामगारांच्या विविध प्रश्नांबाबत विभाग नियंत्रक नवनीत भानप यांच्याकडे लेखी व तोंडी सूचना देण्यात आल्या होत्या. याबाबत संघटनेच्या वतीने विभाग नियंत्रक यांच्याशी चर्चाही केली आहे. मात्र यापैकी प्रश्न विभाग नियंत्रकांनी सोडविले नाहीत. विभाग नियंत्रकांच्या या मनमानी कारभाराविरोधात पहिल्या टप्प्यामधील आंदोलन आहे. प्रलंबित प्रश्न सोडविले नाहीत तर आंदोलन तीव्र करण्यात येईल. परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्याकडे तक्रार करण्यात येणार आहे.
आंदोलनात महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष बंडोपंत वाडकर, विभागीय अध्यक्ष आनंदा दोपारे, महिला संघटक सारिका शिंदे, सयाजीराव घोरपडे, राकेश कांबळे, जे. के. कोबो, प्रसाद कोळी, आशा शेटे, बाबूराव वाणी, रमेश आवटे, सागर कोळी, के. एस. रुग्गे आदी कर्मचारी उपस्थित होते.
प्रमुख मागण्या
गारगोटी आगाराचे व्यवस्थापक यांच्या मनमानी कारभाराबाबत विविध प्रश्नी वारंवार लेखी तक्रार देऊनसुद्धा त्यांच्यावर कोणतीही कारवाई झाली नाही.
कोल्हापूर आगारात कार्यरत असणाऱ्या महिला वाहकांचे रोटेशन त्यांच्या मागणीप्रमाणे करावे.
कोल्हापूर आगारातील वाहक अलोकेशनकरिता तातडीने टी.आय. देण्यात यावा.