Kolhapur: आठ तोळे दागिन्यांवर एसटी चालकानेच मारला डल्ला, सातारा जिल्ह्यातील चालकास अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2024 11:48 AM2024-11-27T11:48:32+5:302024-11-27T11:49:22+5:30

चालकाची लबाडी उघडकीस आली

ST driver killed Dalla over eight tola jewellery in Kolhapur, driver arrested in Satara district | Kolhapur: आठ तोळे दागिन्यांवर एसटी चालकानेच मारला डल्ला, सातारा जिल्ह्यातील चालकास अटक

Kolhapur: आठ तोळे दागिन्यांवर एसटी चालकानेच मारला डल्ला, सातारा जिल्ह्यातील चालकास अटक

कोल्हापूर : मध्यवर्ती बसस्थानकात पोहोचलेल्या एसटीचा किरकोळ मेन्टनन्स करण्याच्या निमित्ताने प्रवाशांना खाली उतरवून एसटी वर्कशॉपकडे घेऊन गेलेल्या चालकाने सीटवरील पर्समधील अडीच लाखांचे आठ तोळे दागिने लंपास केले. हा प्रकार सोमवारी (दि. २५) पहाटे साडेतीनच्या सुमारास घडला.

याबाबत राजश्री आनंदा नलवडे (वय ४०, सध्या रा. ठाणे, मूळ रा. राशिंग, ता. हुक्केरी, जि. बेळगाव) यांनी फिर्याद देताच पोलिसांनी चार तासांत छडा लावून दागिने चोरणाऱ्या एसटी चालकास अटक केली. सुधीर लक्ष्मण शिंदे (वय ४२, रा. समर्थगाव, पोस्ट अतित, जि. सातारा) असे अटकेतील चालकाचे नाव आहे.

शाहूपुरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री ठाण्याहून सुटलेली एसटी सोमवारी पहाटे तीनच्या सुमारास कोल्हापुरात मध्यवर्ती बसस्थानकात पोहोचली. पुढे बेळगावला जाण्यापूर्वी चालक सुधीर शिंदे याने एसटीचा किरकोळ मेन्टनन्स करण्याचे कारण सांगून सर्व प्रवाशांना खाली उतरवले. त्यानंतर वर्कशॉपच्या दिशेला जाऊन काही वेळाने ते परत आले.

एसटीत बसताच फिर्यादी राजश्री नलवडे यांनी पर्स तपासली. त्यावेळी पर्समधील दागिन्यांची एक डबी चोरीला गेल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी एसटी थांबवून पोलिसांना बोलवले. बसची झडती घेण्याची विनंती केली. सोन्याचा हार, कुड्या, वेल, कानातील दागिने अशा आठ तोळे दागिन्यांची चोरी झाल्याची फिर्याद दिली.

चालकाची लबाडी उघडकीस आली

पोलिसांनी एसटीतील प्रवासी आणि वर्कशॉपमधील कर्मचाऱ्यांकडे चौकशी केली. वर्कशॉपमध्ये एसटी पोहोचल्याच्या नोंदी मिळाल्या नाहीत. कर्मचाऱ्यांनी एसटी दुरुस्तीचे काही कामही केले नव्हते. चालकाकडे चौकशी केल्यावर त्याच्या बोलण्यात विसंगती आली. पोलिसी खाक्या दाखवताच त्याने पर्समधील दागिन्यांची डबी चोरल्याची कबुली दिली. या सर्व प्रकारात प्रवाशांचा मात्र खोळंबा झाला. न्यायालयात हजर केल्यानंतर त्याची पोलिस कोठडीत रवानगी झाली. त्याने यापूर्वीही अशा प्रकारे चोऱ्या केल्या असाव्यात, असा पोलिसांचा अंदाज आहे.

Web Title: ST driver killed Dalla over eight tola jewellery in Kolhapur, driver arrested in Satara district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.