एसटी कर्मचाऱ्याची मुलगी झाली डॉक्टरेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2019 06:40 PM2019-03-19T18:40:41+5:302019-03-19T18:41:58+5:30
आदिती बरगे हिला आज पीएचडी प्रदान करण्यात आली.
मुंबई : कोल्हापूर जिल्ह्यातील अर्जुनवाडा सारख्या खेडेगावातून मुंबईत नोकरीसाठी आलेल्या एसटीच्या एका कर्मचाऱ्याच्या मुलीने डॉक्टरेट मिळविली आहे.
आदिती बरगे हिला आज रसायन तंत्रज्ञान संस्था माटुंगा, मुंबई येथे संस्थेचे कुलपती पद्मविभूषण डॉ. रघुनाथ माशेलकर, कुलगुरू पद्मश्री डॉ. जी. डी. यादव, पीरामल एन्टरप्राईझ लिमिटेडचे अध्यक्ष अजय पीरामल यांच्या उपस्थितीत शानदार दीक्षांत समारंभामध्ये केमिकल इंजिनियरींग मधील औद्योगिक क्षेत्रातील दूषित पाणी उपचार या विषयावरील डॉक्टरेट प्रदान करण्यात आली.
श्रीरंग बरगे ३५ वर्षांपूर्वी कर्मचारी म्हणून एसटी महामंडळात रुजू झाले. त्यांना दोन मुली. त्यापैकी या दुसऱ्या मुलीने आपलं पदवी, पदव्युत्तर शिक्षण पूर्ण करून रासायनिक अभियांत्रिकी या विषयामध्ये पदवी प्राप्त करून डॉक्टरेट मिळवली आहे.
अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये नोकरी करीत असताना आपल्या मुलींना दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी बरगे हे पहिल्यापासूनच आग्रही होते. आज आदितीने केमिकल इंजिनियरींगमध्ये डॉक्टरेट पदवी स्वीकारल्या नंतर आपल्या यशामध्ये आपले मार्गदर्शक डॉ. प्रकाश वैद्य यांच्याबरोबरच आपल्या आईवडिलांचा मोलाचा वाटा आहे, असे उद्गार काढले आहेत.