एसटी, कवाळे गँगच्या गुंडांची धरपकड
By admin | Published: March 30, 2016 01:32 AM2016-03-30T01:32:57+5:302016-03-30T01:33:45+5:30
पोलिस कारवाई : स्वप्निल तहसीलदारची पोलिसांविरोधात मारहाणीची तक्रार; न्यायालयात रवानगी
कोल्हापूर : एसटी व कवाळे गँगमध्ये झालेल्या राड्याप्रकरणी राजारामपुरी पोलिसांनी अटक केलेल्या एसटी गँगचा म्होरक्या स्वप्निल तहसीलदार (वय ३०) याने पोलिसांनी आपणाला रात्रभर मारहाण केल्याची तक्रार प्रथमवर्ग न्यायाधीश आर. डी. डांगे यांच्याकडे केली. न्यायालयाच्या आदेशानुसार पोलिसांनी सीपीआर रुग्णालयामध्ये त्याची वैद्यकीय तपासणी करून सीलबंद अहवाल न्यायालयास सादर केला. अहवाल पाहून न्यायालयाने गुंड तहसीलदार याची बिंदू चौक कारागृहात रवानगी केली. संशयित साईराज दीपक जाधव (२६), जोकर ऊर्फ शुभम दिनेश देवगिरेकर (१९, दोघे रा. राजारामपुरी) यांना ४ एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. दोन्ही गँगकडून परस्परविरोधी फिर्यादी दाखल केल्या आहेत. दोन्ही गँगमधील अन्य संशयितांची रात्री उशिरापर्यंत धरपकड सुरू होती.
राजारामपुरीतील वर्चस्ववादातून सोमवारी, रंगपंचमीदिवशी कवाळे गँगचे संदीप कवाळे, गणेश मोरे, नितीन दाभाडे, संग्राम कवाळे, प्रवल कारेकर हे मोटारसायकलीवरून राजारामपुरी मुख्य रस्त्यावरून जाताना मारुती मंदिरासमोर एसटी गँगचा मुख्य सूत्रधार स्वप्निल तहसीलदार, साईराज जाधव, विठ्ठल सुतार, तुषार डवरी, राकेश कारंडे, रामचंद्र सावरे यांनी पूर्ववैमनस्यातून हल्ला करून त्यांना गंभीर जखमी केले. संग्राम कवाळे याच्या मोटारसायकलीची तोडफोड केल्याचे नितीन दाभाडे याने पोलिसांना सांगितले. या हल्ल्यानंतर दोन्ही गँगकडून नंग्या तलवारी नाचवीत प्रचंड दहशत माजविण्यात आली होती. पोलिस निरीक्षक अमृत देशमुख यांनी संशयित आरोपी स्वप्निल तहसीलदार, साईराज जाधव, शुभम् देवगिरेकर यांना सोमवारी (दि. २८) रात्रीच अटक केली. त्यानंतर दोन्ही गँगकडून परस्परविरोधी फिर्यादी दाखल केल्या. पोलिसांनी दोन्ही गँगच्या कार्यकर्त्यांची रात्री उशिरापर्यंत धरपकड सुरू केली होती. कवाळे गँगच्या दोघा तरुणांना मंगळवारी रात्री अटक केली. संशयित आरोपी सोमेश अविनाश लावंड (वय २१), आकाश तानाजी कवाळे (२१, दोघे रा. मातंग वसाहत, राजारामपुरी) अशी त्यांची नावे आहेत.
आरोपी तहसीलदार, जाधव, देवगिरेकर यांना मंगळवारी दुपारी प्रथमवर्ग न्यायाधीश डांगे यांच्यासमोर हजर केले. पोलिस उपनिरीक्षक अण्णाप्पा कांबळे यांनी संशयित हे सराईत गुन्हेगार असून, ते टोळीचे सूत्रधार आहेत. त्यांना सात दिवसांची पोलिस कोठडी मिळावी, अशी विनंती केली. त्यावर न्यायाधीश डांगे यांनी आरोपींना ‘तुम्हाला काही सांगायचे आहे का?’ अशी विचारणा केली. त्यावर गुंड तहसीलदारने राजारामपुरी पोलिसांनी आपल्याला मारहाण केल्याची तक्रार केली. तसेच आरोपीचे वकील पाटील यांनी स्वप्निल तहसीलदार हा सोमवारी रात्री रुईकर कॉलनी येथील त्याची आजी सुरेखा शहा यांच्या घरी होता. शाहूपुरी पोलिसांनी छापा टाकला असता तो पळून गेल्याचे पोलिसांनी सांगितले. राजारामपुरीमध्ये हल्ला झाला, त्याठिकाणी तहसीलदार होता, असे राजारामपुरी पोलिसांचे म्हणणे आहे. एकाच वेळी दोन ठिकाणी एकच व्यक्ती कशी काय जाऊ शकते, असा मुद्दा पुढे करीत तहसीलदारला पोलिसांनी या गुन्ह्यात गोवले असल्याचे सांगून त्याची जामिनावर मुक्तता करा, असा युक्तिवाद केला.
‘सीपीआर’चा वैद्यकीय अहवाल
न्यायालयाच्या आदेशानुसार गुंड स्वप्निल तहसीलदार याची ‘सीपीआर’मध्ये वैद्यकीय तपासणी करण्यात आली. यावेळी स्वप्निलच्या दोन्ही हातांच्या पंजावर, पायावर व पाठीवर काठीचे वळ दिसून आले. वैद्यकीय अधिकारी प्रमोद भोई यांनी सीलबंद वैद्यकीय अहवाल पोलिसांतर्फे न्यायालयास सादर केला.
पोलिस ठाण्यातही रुबाब
‘एसटी’ गँगचा सूत्रधार स्वप्निल तहसीलदार, साईराज जाधव यांना राजारामपुरीतील कोठडीमध्ये ठेवले होते. मंगळवारी सकाळी वृत्तपत्रांचे छायाचित्रकार त्यांचे फोटो काढण्यासाठी गेले असता त्यांनी स्वत:हून पुढे येत फोटोसाठी पोज दिली. यावेळी पोलिसांसमोरच ते रुबाब ठोकत होते. तहसीलदारला ‘सीपीआर’मध्ये वैद्यकीय तपासणीसाठी आणले असता त्याच्या आई, पत्नी व पन्नासपेक्षा जास्त साथीदारांनी त्याची भेट घेतली.
एसटी गँगच्या अमोल प्रभाकर शिंदे (वय २४, रा. यादवनगर) याने दिलेल्या फिर्यादीमध्ये मोटारसायकलवरून राजारामपुरीकडे रुग्णालयात जात असताना यातील संशयित आरोपी गणेश बुचडे, प्रवल कारेकर, राज कवाळे, सोमेश (पूर्ण नाव नाही), आकाश कवाळे (सर्व रा. मातंग वसाहत) यांनी अडवून साया कोठे आहे, अशी विचारणा करून पाठीत तलवारीचे दोन वार केले. त्यानंतर ते पळून गेले.
कवाळे गँगच्या प्रवल दीपक कारेकर (२३, रा. राजारामपुरी २ गल्ली) याने फिर्यादीमध्ये मी व मित्र ओंकार जाधव दुपारी जेवण करण्यासाठी हॉटेल दख्खन येथे गेलो होतो. याठिकाणी प्रसन्न आवटे, अनिकेत व त्याचा मित्र जोकर मद्यप्राशन करीत होते.
ओंकारचा मोबाईल अचानक गायब झाल्याने त्याने प्रसन्न आवटे यांना मोबाईल चेष्टेत घेतला आहे काय, असे विचारले असता त्यांना राग आल्याने वादावादी केली.
हॉटेलमधून जेवण करून मोटारसायकलवरून मी, मित्र संदीप कवाळे, ओंकार जाधव, सुमित सिंग जात असताना आरोपी साईराज जाधव, रॉबर्ट डिओ मोसावाला, प्रसन्न आवटे, अनिकेत, जोकर, सनी असे आठ ते दहाजण हातांमध्ये तलवारी, लोखंडी पाईप घेऊन आले. त्यांनी थेट आमच्यावर हल्ला चढविला.