एसटी गोत्यात; साडेचार हजार कोटींनी तोट्यात! ; आगारप्रमुखांना सुचविल्या काटकसरीच्या उपाययोजना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2019 11:35 PM2019-12-17T23:35:40+5:302019-12-17T23:38:27+5:30
एसटी महामंडळाची आर्थिक स्थिती प्रशासनाने सुधारण्यासाठी खर्चात काटकसर व बचत सुचविताना नवीन पर्याय दिले आहेत. त्याची अमंलबजावणी करा, असेही सर्व आगारप्रमुखांना सूचित केले आहे. याचा गांभीर्याने विचार करावा,
शेखर धोंगडे।
कोल्हापूर : राज्य परिवहन महामंडळ (एसटी) आर्थिकदृष्ट्या गोत्यात आले असून, सध्यस्थितीला तब्बल ४५४९.७० कोटी रुपयांचा तोटा झाला आहे. यामुळे एस.टी. प्रशासन खडबडून जागे झाले आहे. हा तोटा पाच हजार कोटींचा आकडा पार करून जावू नये यासाठी खर्चात काटकसर व बचत करा, असे फर्मान वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सर्व आगारप्रमुखांना काढले आहे.
एसटी महामंडळाची आर्थिक स्थिती प्रशासनाने सुधारण्यासाठी खर्चात काटकसर व बचत सुचविताना नवीन पर्याय दिले आहेत. त्याची अमंलबजावणी करा, असेही सर्व आगारप्रमुखांना सूचित केले आहे. याचा गांभीर्याने विचार करावा, असा असे वित्तीय सल्लागार व मुख्य लेखा अधिकारी यांनी आदेशात म्हटले आहे.
वेतनवाढीचाही मोठा आर्थिक भार!
प्रवासी वर्गाला देण्यात येणाऱ्या विविध सवलती, तोट्यातील फे-या, घटलेली प्रवासी संख्या, सातत्याने होणारा अनावश्यक खर्च, प्रशासनाचा ढिसाळ कारभार आणि शासनाकडून न मिळणारे अनुदान, तसेच २०१६ ते २०२० याकालावधीचा कामगार वेतनवाढीचा मोठा आर्थिक भारही सोसावा लागल्याने राज्य परिवहन मंडळ तोट्यात आले आहे.
अनावश्यक खर्चांवर निर्बंध आणा; उत्पन्न वाढवा
- प्रवासी वाढविण्यासाठी विविध उपक्रम राबवा,
- पॉर्इंटची अचानक तपासणी करा.
- अनावश्यक वस्तूंची खरेदी न करता गरजेच्याच वस्तू खरेदी करा. उत्पन्नातूनच खरेदीच्या रकमेची तरतूद करावी.
- अनेक विभाग संगणकीकृत केल्यामुळे मनुष्यबळ, पैशांची बचत होते का? याचा आढावा घ्या.
- अतिकालिक जादा भत्ता असलेल्या चालक-वाहकांचा वापर गरजेनुसारच करा.
- पहारेकऱ्यांच्या रिक्त जागा खासगी ठेक्याद्वारे भरण्याचा विचार व्हावा.
- अनावश्यक डिझेल भरू नका, रोजच्या इंधनाचा ताळमेळ ठेवा, वेळोवेळी पंप दुरुस्त करा.
- टायरमधील हवा तपासा व टायरवरील खर्च आटोक्यात आणा, इमारत दुरुस्ती, रंगकाम, आदी कामे थांबवा, रिकाम्या सदनिका वापरात आणा, येथे अधिकारी, कर्मचाऱ्यांना राहण्यास सक्ती करा, स्टेशनरी, झेरॉक्सचा खर्च वाचवा, व्यापारी संकुलाच्या वेळेत निविदा काढून लवकर वापरात आणा.
- व्यापारी आस्थापनाच्या जागेचे भाडे, पोस्टल मेल, पोलीस वाहन आणि अन्य प्रलंबित वसुली करून न्यायालयीन प्रकरणे टाळून खर्चांवर मर्यादा आणा.