मालवाहतुकीतून एसटी मालामाल, चालक मात्र कंगाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2021 04:18 AM2021-05-29T04:18:54+5:302021-05-29T04:18:54+5:30
कोल्हापूर : एसटी महामंडळाने प्रवासी वाहतूक बंद झाल्यामुळे पर्यायी मार्ग म्हणून मालवाहतूक सुरू केली आहे. त्यातून महामंडळाला चांगले उत्पन्नही ...
कोल्हापूर : एसटी महामंडळाने प्रवासी वाहतूक बंद झाल्यामुळे पर्यायी मार्ग म्हणून मालवाहतूक सुरू केली आहे. त्यातून महामंडळाला चांगले उत्पन्नही मिळत आहे. मात्र, वेळेत माल उतरून न घेणे, पुन्हा मालवाहतुकीसाठी ऑर्डर न मिळणे अशा अनेक कारणामुळे तेथेच एक ते तीन दिवसांपर्यंतचा मुक्काम करावा लागत आहे. या काळातील सर्व खर्च चालकांना स्वत:च्या खिशातून करावा लागत आहे.
कोरोनाच्या पहिल्या लाटेपासून राज्य परिवहन महामार्ग महामंडळ (एसटी) ने प्रवासी वाहतूक थांबल्यानंतर उत्पन्नाचा दुसरा मार्ग म्हणून राज्यात मालवाहतुक सुरू केली. त्याला जनतेकडूनही चांगला प्रतिसाद मिळत आहे. कोल्हापूर विभागाचा विचार करता, विभागाने ५० बसेसचे रूपांतर मालवाहतूक ट्रकमध्ये केले असून त्याकरीता ६० चालकांची यावर आलटून पालटून ड्युटी लावली आहे. या सेवेतून महामंडळाला गेल्या ४५ दिवसांत प्रत्येकी एक लाख रुपयांचे सरासरी उत्पन्न िमिळाले आहे.
गेल्या दीड महिन्यात तब्बल ४५ लाखांची कमाई
एसटीच्या कोल्हापूर विभागातील अकरा आगारांतून एकूण मागणीप्रमाणे एकूण ५० प्रवासी बसेसचे रूपांतर मालवाहतूक ट्रकमध्ये केले आहे. त्यास उद्योग, व्यावसायिकांकडून मागणी आहे. त्यातून प्रत्येक आगाराला दिवसाकाठी ५ ते १० हजारांचे उत्पन्न मिळते. या वाहतुकीकरीता २०० किमी अंतरापर्यंत एकच चालक दिला जातो. त्यापुढील अंतर असेल तर दुसरा चालक सहायक म्हणून दिला जातो. यातून ४५ दिवसांत प्रत्येकी सरासरी एक लाख रुपयाचे उत्पन्न कोल्हापूर विभागास मिळाले आहे.
उत्पन्न - ४५ लाख
चालक -६०
रूपांतरीत मालवाहतूक एसटी ट्रक -५०
परतीचा मालवाहतुक मिळेपर्यंत तेथेच मुक्काम
या एसटी ट्रकवर कर्तव्यासाठी गेलेल्या चालकांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. २०० किमीपर्यंत एकट्यानेच चालकांना हे वाहन सुरक्षितरीत्या इप्सित स्थळी पोहचावयचे असते. या दरम्यान कोठे चाक पंक्चर अथवा घाटामध्ये वाहन सरकू अथवा अडचणीतून मार्ग काढताना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते.
ॲडव्हान्स मिळतो, पण पगारातून होतो कट
- मालवाहतुकीकरीता चालक म्हणून जाणाऱ्या चालकांना कर्तव्यावर असताना माल पोहचविल्यानंतर तेथे माल उतरून घेण्यास कोण उपलब्ध झाले नाही तर दोन दोन दिवस तेथेच मुक्काम करावा लागतो. या काळात जेवण, नाश्ता, चहा असा सर्व खर्च स्वत:च्या खिशातून करावा लागतो.
-या खर्चासाठी ॲडव्हान्स घेतल्यानंतर तो पगारातून कट केला जातो. त्यामुळे एखाद्या चालकांला अशा चार ड्युट्या लागल्या तर त्याचे किमान चार हजार रुपये असेच जातात.
- पगार किती हातात येणार याचीच चिंता चालकाला लागून राहते. शिवाय पगारही वेळेत होत नाही. अशावेळी उधार उसनवार करून अनेकांना हा खर्च करावा लागत आहे. महामंडळ मात्र, मालवाहतुकीतून केवळ उत्पन्न मिळवत आहे.
- चालकांना कोणतीही सुविधा देण्यास तयार नाही. प्रत्येक वेळी चालकांना परिपत्रकात असेच आले आहे. त्यामुळे सुविधा मिळणार नाहीत. अशाच परिस्थितीत काम करावे लागेल असे अधिकारी सुनावत आहेत.
चालक म्हणतात
आम्हाला प्रवासी वाहतूक करण्याचा अनुभव आहे. मात्र, महामंडळ आम्हाला मालवाहतूक करायला सांगते. अनेकदा घाटामध्ये, अडचणीच्या रस्त्यावर सहायक नसल्याने बस सरकणे, अपघात होणे, पंक्चर होणे, ॲक्सल तुटणे आदी समस्यांना एकट्याने तोंड द्यावे लागते. आम्ही दोन चालक द्या म्हणून मागणी करीत आहोत. पण महामंडळाचे अधिकारी परिपत्रकात एकच चालकाला परवानगी असे सांगत आहे.
- एक चालक
मालवाहतुकीकरीता चालकांना दिवसाला चारशे किमी अंतर पार करून परजिल्ह्यात जावे लागते. अशावेळी माल वेळेत उतरविला न गेल्याने दोन दोन दिवसांचा मुक्काम चालकाला करावा लागत आहे. या काळातील खर्च चालकाला करावा लागतो. त्याकरीता ॲडव्हान्स देण्याची पद्धत आहे. मात्र, ते पगारातून कट केले जातात. हा अन्याय आहे.
- एक चालक
कोट
चालकांना प्रवासी वाहतुकीचा अनुभव असताना त्यांना मालवाहतुकीकरीता कर्तव्य दिले जात आहे. २०० किमीपर्यंत एकाच चालकाला ही मालवाहतुकीची बस इप्सित स्थळापर्यंत पोहचवावी लागते. या काळात अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते. तेथील खर्चही महामंडळाने चालकांना द्यावा. दिवसाला ३०० रुपये भत्ता द्यावा व सुविधाही पुरवाव्यात .अशी मागणी संघटनेतर्फे केली आहे. पण अधिकारी परिपत्रकानुसारच काम करीत आहेत.
- उत्तम पाटील, अध्यक्ष, महाराष्ट्र एसटी कामगार संघटना, कोल्हापूर विभाग