एसटीला रोज मारला जातो स्टार्टर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2021 04:17 AM2021-06-03T04:17:28+5:302021-06-03T04:17:28+5:30
कोल्हापूर : कोरोना लाॅकडाऊनमुळे एसटी बंद असली तरी रोज स्टार्टर मारला जात आहे. या कालावधीत बंद असलेल्या बसेसची आतून ...
कोल्हापूर : कोरोना लाॅकडाऊनमुळे एसटी बंद असली तरी रोज स्टार्टर मारला जात आहे. या कालावधीत बंद असलेल्या बसेसची आतून व बाहेरून स्वच्छता करणे, गिअर, क्लचप्लेट, ॲक्सिलेटर, स्टिअरिंग, क्लच राॅड, जाॅइंट व्हील, व्हील अलायंमेंट, ग्रीसिंग, ऑइलिंग करणे, टायरमधील हवा तपासणी करणे आदी दुरुस्ती देखभाल केल्यामुळे कोल्हापूर विभागातील ७८० बसेस प्रवाशांच्या सेवेकरीता सज्ज आहेत. विशेष म्हणजे या बसेस आगारांमध्येच फिरवून त्यांची चाचणी केली जात असल्यामुळे त्या सुस्थितीत आहेत.
कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे राज्यात गेल्या दीड महिन्यांपासून लाॅकडाऊन सुरू आहे. या कालावधीत केवळ अत्यावश्यक सेवेतीलच एसटी बस रस्त्यावर आहेत. मोजक्याच फेऱ्यांमुळे अनेक गाड्या एकाच जागेवर उभ्या केल्या तर त्या बंद पडण्याचा धोका अधिक आहे. पुढील होणारा अनावश्यक खर्च व बंद बसेसमुळे नादुरुस्तीचे प्रमाण वाढू शकते. ही बाब जाणून कार्यशाळेसह आगारातील यांत्रिक कर्मचाऱ्यांनी विशेष दक्षता घेतली आहे. कोल्हापूर विभागात येणाऱ्या ताराबाई पार्क कार्यशाळेसह अकरा आगारांत तीन शिफ्टमध्ये काम करून कर्मचाऱ्यांनी या सर्व बसेस कधीही स्टार्टर मारल्यानंतर तत्काळ प्रवाशांच्या सेवेकरीता सज्ज ठेवल्या आहेत. फेऱ्याच बंद असल्यामुळे वाहनांची झीज कमी होत आहे. सध्या कार्यशाळेसह सर्व आगारात पावसाळी दुरुस्ती देखभालाची कामे सुरू आहेत.
प्रत्येकी तीन दिवसांनी तपासणी
मोजक्याच फेऱ्या होत असल्याने बस आलटून पालटून वापरल्या जात आहेत. वीस बस या आठवड्यात वापरल्या तर त्याच्या पुढील वीस बस असे क्रमाने वापरल्या जातात. याशिवाय प्रत्येक बसची दर तीन दिवसांनी बॅटरीसह स्टार्टर, टायर, ग्रीसिंग, गीअर, क्लचप्लेट, ॲक्सिलेटर, स्टिअरिंग, क्लच राॅड, जाॅइंट व्हील, व्हील अलायंमेंट आदींची रॅम्पवर घेऊन तपासणी केली जात आहे.
रोज स्टार्टर
प्रत्येक गाडी आठ ते दहा तास बंद ठेवल्यानंतर बॅटरी चार्ज होत नाही. त्यामुळे सुस्थितीत असूनही केवळ स्टार्टर लागत नाही म्हणून ही गाडी आगारात ठेवावी लागते, असे होऊ नये, याकरीता प्रत्येक बसेस आठ ते दहा तासानंतर त्या सुरू करून व ठरविक अंतर चालवूनही पाहिल्या जातात.
पावसाळ्यासाठी सज्जता
पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर अनेक बसेस गळत असतात. मोडक्या खिडक्यामुळे पाणी आत येते, पुढील काचेला वायपर नसणे आदी बाबींची तपासणी केली जात आहे. काचेला रबराचे आतून पॅकिंग देणे, बसच्या आतील व वरच्या बाजूला कमकुवत झालेली पत्रा शीट पॅचवर्क करणे आदी कामे पावसाळ्यासाठी सज्जता म्हणूनही केली जात आहेत.
वर्षातील सहा महिने नुकसानीत
कोल्हापूर आगार ७८० बसेसच्या माध्यमातून दिवसाकाठी सुमारे ६० लाख, तर वर्षाकाठी सव्वा दाेनशे कोटी रुपयांचे उत्पन्न मिळते. मात्र, गेल्या वर्षी कोरोना संसर्गाची लाट आली. त्यामुळे एसटीची बस वाहतूक सहा महिनेच सुरू राहिली. त्यामुळे या कालावधीत उत्पन्न कमी झाले. हे उत्पन्न निम्यावर म्हणजेच ११० कोटी रुपयांवर आले आहे. या कालावधीत उत्पन्न घटल्यामुळे पगार, दुरुस्ती देखभाल खर्च संचित निधीमधून झाला.
दुरुस्ती देखभाल खर्च कमी झाला
वर्षातील सहा महिनेच बस धावल्यामुळे त्यांची टायर झीज, इंजिन झीज, ऑइल आदी कमी लागले. पर्यायाने देखभालीसाठी खर्च कमी झाला. त्यामुळे २०१९-२० च्या तुलनेत यंदा खर्च कमी झाला आहे.
कोट
लाॅकडाऊन काळात बसेसची सुसज्जता ठेवण्यावर भर दिला आहे. प्रत्येक बसला स्टार्टर मारणे, तीन दिवसांनी सर्व तपासणी करणे आदी कामे कर्मचाऱ्यांनी केल्यामुळे विभागातील सर्व बस सज्ज आहे. या बस पूर्ण लाॅकडाऊन उतरल्यानंतर प्रवाशांच्या सेवेकरीता पूर्ण तंदुरुस्त आहेत.
सुनील जाधव, यंत्र चालन अभियंता, कोल्हापूर विभाग