एस.टी. कर्मचारी ‘कासवा’च्या प्रेमात
By admin | Published: February 16, 2015 12:27 AM2015-02-16T00:27:08+5:302015-02-16T00:29:20+5:30
हातात कासवाची अंगठी : कोल्हापूर आगारातील चित्र
प्रदीप शिंदे- कोल्हापूर -कासव पाळल्याने घरामध्ये सुख-समृद्धी येते, अशी अंधश्रद्धा सगळीकडे पसरली आहे. सर्वांनाच घरी कासव पाळणे काही शक्य नसल्याने, कासवाच्या प्रतिकृतीची अंगठी घालण्याची फॅशन सध्या सर्वत्र सुरू आहे. याच कासवाच्या अंगठीच्या प्रेमात एस. टी. महामंडळाचे कर्मचारी मोठ्या प्रमाणात पडल्याचे चित्र सध्या कोल्हापूर आगारात दिसत आहे.
एस.टी. महामंडळाकडे सध्या अपुऱ्या असलेल्या कर्मचाऱ्यांपैकी अनेकजण वाढत्या स्पर्धेच्या युगात चिंताग्रस्त आहेत. अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे पुरेशा सुट्या नाहीत. महामंडळाचे उत्पन्न कमी होत असल्याने अधिकाऱ्यांवर असलेल्या दडपणामुळे अनेकजण चिंताग्रस्त आहेत. काही लोक याच चिंताग्रस्त कर्मचाऱ्यांचा फायदा घेऊन त्यांच्या अंधश्रद्धेला खतपाणी घालत आहेत.
या प्रकारामुळे महामंडळाचे काही कर्मचारी या अंधश्रद्धेला बळी पडले आहेत. बळी पडलेल्या कर्मचाऱ्यांच्या हातातील अंगठी पाहून अनेकांना त्याबाबत आकर्षण वाटू लागले. काही अधिकाऱ्यांनीसुद्धा अशी अंगठी तयार करून घातलेली पाहून अनेक कर्मचारीही या अंगठीच्या प्रेमात पडल्याचे चित्र सध्या एस. टी. महामंडळाच्या कोल्हापूर आगारात दिसून येत आहे. मात्र, ज्यांनी अंगठी घातली आहे, त्यांना अंगठीमुळे काय फरक पडला, असे विचारले असता, त्यांना ठोस सांगता येत नाही.
फॅशन म्हणून अंगठी
ही अंगठी घातल्याने धनप्राप्तीसह मनशांती मिळत असल्याच्या समजातून अनेकजण चांदीची व सोन्याची अंगठी बोटांत घालतात. एकाने घातलेली अंगठी पाहून दुसऱ्यानेही लगेच तशीच अंगठी करून घातली आहे. कपड्यांची, गाड्यांची जशी फॅशन येते त्याचप्रमाणे महामंडळातीलअनेक कर्मचाऱ्यांच्या बोटांमध्ये ही अंगठी दिसू लागली आहे. येथील कर्मचारांना विचारले असता, काहींच्या मते एकाच्या हातातील अंगठी चांगली दिसते हे पाहून आम्ही अंगठी विकत घेतली आहे. साधारणपणे ५०० रुपयांच्या पुढे या अंगठीची किंमती आहे.
कासव जवळ बाळगल्याने धनप्राप्ती होते, अशी अंधश्रद्धा लोकांच्या मनात आहे. सर्वांनाच काही कासव पाळणे शक्य होत नाही. त्यामुळे त्यांचे प्रतीक म्हणून अनेकजण कासवाच्या आकाराची अंगठी हातात घालतात. समाजातील अनेक अंधश्रद्धापैकी ही एक अंधश्रद्धा होय. जर कासव जवळ बाळगून प्रश्न सुटत असते तर सरकाराने प्रत्येकाला कासव पाळण्यास सांगितले असते. सुशिक्षित व अशिक्षित असे अंधश्रद्धेचे दोन भाग आहेत. अंधश्रद्धा ही व्यसनासारखी आहे. ती कमी करण्यासाठी वैज्ञानिक दृष्टिकोनाचा जोड दिला पाहिजे.
- के. डी. खुर्द, ‘अंनिस’चे ज्येष्ठ कार्यकर्ते