एस.टी. महामंडळामध्ये सुरक्षितता मोहीम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2020 10:40 AM2020-01-09T10:40:35+5:302020-01-09T10:41:45+5:30
राष्ट्रीय सुरक्षा परिषदेच्या निर्देशानुसार व राज्य शासनाच्या मार्गदर्शनाखाली दरवर्षीप्रमाणे यंदाही कोल्हापूर विभागातर्फे ११ ते २५ जानेवारी २०२० दरम्यान सुरक्षितता मोहीम राबविली जाणार आहे. या मोहिमेदरम्यान चालकांचे प्रबोधन, प्रशिक्षण, आरोग्य तपासणी, वाहन परवाना तपासणी, गाड्यांची तांत्रिक तंदुरुस्ती अशा अनेक बाबींवर भर दिला जाणार आहे.
कोल्हापूर : राष्ट्रीय सुरक्षा परिषदेच्या निर्देशानुसार व राज्य शासनाच्या मार्गदर्शनाखाली दरवर्षीप्रमाणे यंदाही कोल्हापूर विभागातर्फे ११ ते २५ जानेवारी २०२० दरम्यान सुरक्षितता मोहीम राबविली जाणार आहे. या मोहिमेदरम्यान चालकांचे प्रबोधन, प्रशिक्षण, आरोग्य तपासणी, वाहन परवाना तपासणी, गाड्यांची तांत्रिक तंदुरुस्ती अशा अनेक बाबींवर भर दिला जाणार आहे.
कोल्हापूर विभागातर्फे प्रवाशांमध्ये मोहिमेदरम्यान सुरक्षित प्रवासाबद्दल विश्वास वृद्धिंगत करणे, तसेच राज्य परिवहन कर्मचाऱ्यांंमध्ये वाहतुकीच्या जबाबदारीची जाणीव निर्माण करणे. सुरक्षित वाहतुकीसाठी घालून दिलेल्या कार्यपद्धती पाळण्यावर भर देण्याबाबत, तसेच राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसना अपघात होणार नाहीत याबाबत योग्य ती काळाजी सदैव घेणे हा या सुरक्षितता मोहिमेचा उद्देश आहे.
या कालावधीत विभागातील सर्व आगारांमध्ये चालक-वाहकांची आरोग्य तपासणी, नेत्र तपासणी शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे. यासह ताणतणाव व्यवस्थापन, व्यसनमुक्ती, इत्यादी विषयांवर व्याख्यानांचे आयोजन करून कर्मचाऱ्यांंना प्रबोधन करण्यात येणार आहे.
सुरक्षित सेवेच्या माध्यमातून प्रवाशांच्या मनात एसटीबद्दल विश्वासार्हतेची भावना निर्माण झाली आहे. या विश्वासाला बळकटी देण्याच्या उद्देशाने एस. टी. महामंडळामध्ये दरवर्षी जानेवारी महिन्यामध्ये सुरक्षितता मोहीम राबविण्यात येते.
- रोहन पलंगे,
विभाग नियंत्रक कोल्हापूर विभाग