एस.टी. प्रवासात महिलेचे साडेसहा तोळे सोने लंपास, बॅगमधील दागिन्यांचा डब्बा हातोहात लांबवला
By तानाजी पोवार | Published: September 3, 2022 03:12 PM2022-09-03T15:12:10+5:302022-09-03T15:13:48+5:30
गावी घरी पोहचल्यानंतर बॅग उघडून पाहिली असता हा चोरीचा प्रकार लक्षात आला
कोल्हापूर : गणपती सणानिमीत्त शाहूवाडी गावी एस.टी. बसमधून जाणाऱ्या महिला प्रवाशाच्या बॅगमधील सुमारे साडेसहा तोळे सोन्याचे दागिने असलेला डब्बा अज्ञात चोरट्याने हातोहात लांबवला. याबाबत कविता विष्णू देसाई (वय ३५ रा. पाचगाव, ता. करवीर) यांनी शाहुपूरी पोलीस ठाण्यात चोरीची तक्रार नोंदवली. ही घटना मंगळवारी (दि.३० ऑगस्ट) घडली.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, कविता देसाई ह्या पाचगाव येथे राहतात. त्या मंगळवारी आपल्या दोन मुलासह कोल्हापूर मध्यवर्ती बसस्थानक येथून एस.टी. बसने शिराळे तर्फ मलकापूर गावी प्रवास करत होत्या. त्यावेळी त्यांच्या ट्रॅव्हलींग बॅग मध्ये कपडे व कपड्यामध्ये स्टीलच्या डब्यात अडीच तोळ्याचा सोन्याचा पट्टा, दिड तोळ्याचा लक्ष्मी हार, दिड तोळयाचा नेकलेस, तीन ग्रॅमची ठुशी, रिंगा, सोन्याची नथ, तीन ग्रॅमचे पैजन असा सुमारे साडेसहा तोळ्याचे सोन्याचे दागिने याशिवाय आधारकार्ड, आर्मी कॅन्टीन कार्ड, एटीएम कार्ड असा सुमारे ३ लाख ११ हजार रुपये किंमतीचा ऐवज होता.
प्रवासात अज्ञात चोरट्यांने त्यांच्या ट्रॅव्हलींग बॅगमधील सोन्याचे दागिने असलेला डब्बा चोरुन नेला. गावी घरी पोहचल्यानंतर बॅग उघडून पाहिली असता हा चोरीचा प्रकार लक्षात आला. याबाबत त्यांनी शुक्रवारी सायंकाळी शाहूपुरी पोलीस ठाण्यात चोरीची तक्रार दिली.