एसटी काही प्रमाणात सुरू, रेल्वे ठप्पच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2021 04:25 AM2021-07-27T04:25:57+5:302021-07-27T04:25:57+5:30
कोल्हापूर : पुरामुळे गेल्या चार दिवसांपासून एसटीसह खासगी बससेवा अल्प प्रमाणात सोमवारी सायंकाळपासून सुरू झाली आहे. मात्र, रेल्वे सेवा ...
कोल्हापूर : पुरामुळे गेल्या चार दिवसांपासून एसटीसह खासगी बससेवा अल्प प्रमाणात सोमवारी सायंकाळपासून सुरू झाली आहे. मात्र, रेल्वे सेवा सलग चौथ्या दिवशी पूर्णपणे ठप्प झाली आहे.
गेल्या चार दिवसांपासून पंचगंगा नदीसह अन्य नद्यांना महापूर आल्यामुळे राष्ट्रीय महामार्गासह अंतर्गत राज्य मार्ग बंद झाले होते. त्यामुळे रेल्वेसह एस.टी. व खासगी बससेवा बंद झाली होती. सोमवारी दुपारपर्यंत या मार्गावरील पुराचे पाणी ओसरले. त्यानंतर सायंकाळी खासगी बससेवा काही प्रमाणात सुरू झाली. त्यामुळे कोल्हापुरात अडकलेल्या प्रवाशांना काही प्रमाणात दिलासा मिळाला.
इचलकरंजीहून एस.टी.ची पुणे, मुंबई सेवा सुरू
इचलकरंजीहून सोमवारी सकाळपासून पुणे, मुंबईकडे पाच, तर मध्यवर्ती बसस्थानकातून कोल्हापूर-कागल, कोल्हापूर-गारगोटी, कोल्हापूर-गडहिंग्लज सेवा काहीअंशी सुरू झाली. सर्वच मार्गावरील रस्ते आणि पूरपरिस्थितीचा आढावा घेऊन मंगळवारपासून सेवा पूर्ववत सुरू केली जाणार आहे, अशी माहिती विभागीय वाहतूक अधिकारी शिवराज जाधव यांनी दिली.
तत्काळ २५ खासगी बसेस धावल्या
गेल्या तीन दिवसांपासून बंद असलेली खासगी आराम बस सेवा सोमवारी राष्ट्रीय महामार्ग खुला झाल्यानंतर सुरू झाली. मुंबईसाठी १५, तर पुणेसाठी ५ आणि नाशिक, औरंगाबाद, सोलापूरसाठी ५ अशा एकूण २५ बसेस रात्री कोल्हापुरातून सोडण्यात आल्याची माहिती कोल्हापूर जिल्हा खासगी आरामबस असोसिएशनचे अध्यक्ष सतीशचंद्र कांबळे यांनी दिली.
रेल्वे सेवा सलग चौथ्या दिवशी ठप्प
रुकडीजवळील रेल्वे पुलावर पुराचे पाणी आल्यामुळे चार दिवसांपासून रेल्वे सेवा ठप्प झाली. त्यामुळे कोल्हापूर स्थानकातून धावणाऱ्या आठही रेल्वे सलग चौथ्या दिवशी रद्द करण्यात आल्या, अशी माहिती स्थानक प्रमुख ए. आय. फर्नांडिस यांनी दिली.